Saturday, March 28, 2020

शहरं त्यांच्याकरता नसतात

शहरं त्यांच्याकरता नसतात; कधीच नव्हती. शहरांना त्यांची गरज असते, त्यांनाही शहरांची असतेच. एकमेकांना ते वापरुन घेतात, पुरेपूर. पण संकटकाळात; मग तो दंगलींचा काळ असो, पुराच्या लोंढ्याचा असो, किंवा करोनाच्या महामारीचा, शहर कधीच त्यांच्या पाठीशी उभं रहात नाही. शहर त्यांना विश्वासही देऊ शकत नाही की आम्ही तुम्हाला आसरा पुरवू, मजुरी नाही मिळाली तर पोटाला अन्न देऊ. शहर फ़क्त निर्विकारपणे त्यांचे जाणारे लोंढे बघत रहाते. पुन्हा येतीलच हे, शहर सुस्थितीत आलं की याची स्वार्थी खात्री शहरातल्या प्रत्येकाला असते.

कलेच्या इतिहासाने शहरं सोडून जाणा-या माणसांचे असे अनेक लोंढे वेगवेगळ्या कालखंडात पाहिले. १९३९ ला मरियन ऎन्डरसनने लिंकन मेमोरियलच्या पाय-यांवर उभं राहून “ट्रेन इन कमिंग..” गायलं ते अशाच शेकडो हजारो आफ़्रिकन अमेरिकनांचे लोंढे पाहून. जे उपाशीपोटी दक्षीणेकडची शहरं सोडून उत्तरेकडे निघाले होते, पोट भरायला, काम मिळवायला, जगण्याचा सन्मान मिळवायला. त्याच वर्षी त्याच लोंढ्यामधील एक असलेल्या जेकब लॉरेन्स या तरुण चित्रकाराने त्याच गदारोळात आपली ’वन वे टिकट’ ही ६० लहान टेम्पेरा पेंटींग्ज असलेली मायग्रेशन सिरिज रंगवली. त्यातले प्रत्येक चित्र प्रचंड अस्वस्थ करुन टाकणारे आहे. 


त्याही आधी १९३० मधे एलिस आयलंडवरुन ओक्लाहोमाला जाणा-या युरोपियन्सच्या लोंढ्यावर आधारित यूरोप-अमेरिकेतील वेगवेगळ्या चित्रकारांनी रंगवलेल्या आजवरच्या असंख्य चित्रांचे एक मोठे एकत्रित प्रदर्शन गेल्या वर्षीच न्यूयॉर्कच्या म्युझियम ऑफ़ मॉडर्न आर्टमधे भरवले गेले होते  “The Warmth of Other Suns: Stories of Global Displacement,”.


 १७ व्या शतकातल्या’द ग्रेट सर्ब मायग्रेशन’ वर पाजा योवानोविक या सर्बियन चित्रकाराने १८९६ मधे रंगवलेली चार भव्य तैलचित्रांची मालिका बुडापेस्टच्या मिलेनियम एक्झिबिशनचा एक भाग होती. लहान होडक्यांमधे बसून डॅन्यूब ओलांडण्याच्या प्रयत्नांमधल्या सर्ब स्थलांतरितांचे एक चित्र त्यात होते.

उपरे, हुसकावलेले, किंवा नाईलाजाने जगायला बाहेर पडणारे.. माणसांचे प्रत्येक लोंढे, मग ते १७व्या शतकातले असोत किंवा या सहस्त्रकातले सिरियन निर्वासितांचे असोत, मुंबई, दिल्लीमधले उद्याची भ्रांत पडलेल्या मजुरांचे असोत, त्यांची कथा आणि व्यथा एकच असते, जगण्याकरता, तग धरुन रहाण्याकरता मुलाबाळांना खांद्यावर बसवून, संसार खाकोटीला मारुन पायी हजारो मैल चालत जाण्यातली असहायता तीच असते.


भारतामधे फ़ाळणीच्या वेळी जीवाच्या भितीने आपापली जन्मभूमी सोडून रेषेच्या अलीकडे आणि पलीकडे सैरावैरा धावत गेलेल्या लाखो निरपराधांनी तर जीव गमावले. उरले सुरले आजही रक्ताळलेल्या आठवणींसहित जगताहेत.




आणि मग न राहवून आठवतात बंगालच्या महाभिषण दुष्काळात चित्तोप्रसादांनी काढलेली ती चित्रे. भारतीय माणसांच्या जगण्यातली विदारकता आजही तिच आहे हेच पुन्हा पुन्हा सिद्ध होत रहाते.

२०२० सालातल्या मार्च महिन्याच्या अखेरीला शहरांमधून बाहेर पडणारे हे लोंढे कधीतरी एखादा चित्रकार कॅनव्हासवर नोंदवून ठेवेलच. कला-इतिहासातील माणसांच्या लोंढ्यात अजून एक भर पडेल.


No comments:

Post a Comment