Tuesday, May 5, 2020

किलिमानूरची गोष्ट- एक


26 जून 2019
त्रिवेंद्रमला रात्रभर धो धो पाऊस होता. मुंबईवरुन आलेली असल्याने मला तिथल्या पावसाच्या अनुभवापोटी आलेलं अपरिहार्य टेन्शन; उद्या किलिमानूरला जायचा रस्ता पाणी साठल्याने वगैरे बंद तर होणार नाही? ठरवलेला टॅक्सीवाला वेळेत येईल ना? किलिमानूरला पावसाची काय परिस्थिती असेल?
सकाळी सहा वाजता टॅक्सी किलिमानूरच्या दिशेने निघाली तेव्हा पाऊस पूर्ण थांबला होता. आभाळ ढगाळलेलेच होते.  
ड्रायव्हरला किलिमानूर माहित होतं, पण तो राजवाड्यात कधीच आला नव्हता. त्यामुळे अट्टाकल फ़ाट्यावरुन किलिमानूरकरता वळल्यावर वाटेत विचारत विचारतच तो कार हाकत होता.
किलिमानूरच्या राजवाड्याचा रस्ता उतरत्या, चिंचोळ्या, आत आत वळत जाणा-या पायवाटेचा. एका बाजूला अक्षरश: अस्ताव्यस्त रान, आणि दुस-या बाजूला गर्द, सावळट हिरवी भातशेती आणि नारळीची, फ़णसाची, केळीची झाडं. ही सगळी राजवाड्याचीच जमीन आहे, आणि हे अस्ताव्यस्त रान म्हणजे अनेक शतकांपासूनची यक्षीची अस्पर्श देवराई हे रस्त्याचं प्रदीर्घ वळण संपल्यानंतर समोर आलेल्या प्राचीन, लोखंडी फ़ाटकावरील पाटीमुळे कळलं. आत एक मोकळं मैदान, अतिप्रचंड, पुरातन पिंपळाच्या झाडाचा लाल, दगडी पार.  समोर कोवळ्या पोपटी रंगातला भातशेतीचा समुद्र आणि डाव्या बाजूला समोरच किलिमानूरच्या राजवाड्याची आजवर अनेक फोटो-चित्रांमधून पाहिलेली पांढरीशुभ्र, डौलदार कमान.




किलिमानूरचा राजवाडा १० वाजता उघडतो, मी ८-३० वाजताच इथे पोचले. कारण मला राजवाडा बघायला लोक येत असतील तर ती गर्दी व्हायच्या आत शक्यतो तिथे फ़िरायचं बघायचं होतं. आणि मुख्य म्हणजे तिथे अजूनही रहाणा-या वर्मा कुटुंबियांपैकी कोणी भेटेल का हे बघायचं होतं. दोन वर्षांपूर्वी नेहरु सेंटरला झालेल्या रविवर्मांच्या लिथोग्राफ़ प्रदर्शनामधे रामावर्मांची ओझरती भेट झाली होती, पण दुर्दैवाने त्यांनी त्यावेळी दिलेलं कार्ड हरवलं होतं.
कमानीपर्यंत पोचणा-या काळ्याभोर, दगडी पाय-यांकडे जायला आम्ही वळणार तोच बाजूच्या झाडांमधे लपलेल्या बैठ्या घरातून एक उग्र चेहरा, लांब केसांच्या पांढरट काळ्या जटा, शुभ्र करवतकाठी मुंडू, उघड्या अंगावर उपरणं, आडवे गंधाचे पट्टे असा कोणत्यातरी गत शतकातून अवतरल्यासारखा दिसणारा समोर आला. माझ्याकडे पूर्ण दुर्लक्ष करत ड्रायव्हरशी काहीतरी मल्याळममधे बोलला. ड्रायवर सेंथिल कुमारचे ओह.. असे उद्गार, चेह-यावरचे निराश भाव पाहून माझ्या पोटात आता खेप फ़ुकट जाते आहे का वाटून खड्डा. पण सेंथिल सांगतो, हा म्हणतो आहे राजवाडा दहा वाजता खूला होतो.
ते ठीक आहे असं म्हणत मी त्या माणसाला माझा इथे येण्याचा उद्देश, रामावर्मांच्या नावाचा उल्लेख करत सांगते. तेव्हा तो काही वेळ गायब होऊन मग हातात फोन घेऊन आला. म्हणाला, बोला इथे- फोनवर रामावर्मा स्वत:च होते. मृदू आवाजात म्हणाले, कमानीतून आत या, पण माझी पूजा झाल्यावरच मी भेटू शकतो. तोवर तो दाखवेल तिथे बसा. काहीच हरकत नव्हती मला अर्थातच.
उग्र चेह-याचा तो माणूस आम्ही आभारदर्शक काही बोलत असताना निर्विकार चेह-याने आमच्या हातांवर लहान आकाराची खास केरळी लाल केळी ठेवतो. प्रसाद असं म्हणत.
-
कमानीच्या आत एक वेगळंच जग. अतिशय देखणं लॅन्डस्केपिंग. विशाल प्रांगण आणि त्यापलीकडे हिरव्यागार वृक्षांच्या दाटीमधे मोठ्या विस्तारावर उभी असलेली अनेक बैठी, एकमजली शुभ्र घरं.
दाट जंगलाचा बॅकड्रॉप. फ़णसाची लगडलेली झाडे, मंदार वृक्षांची रांग. त्यांचं हे नाव मला नंतर कळलं.
आवाज फ़क्त गळणा-या पानांचा आणि वा-याचा.







लाल फ़रशांची जमीन. शुभ्र रांगोळी, रुंद ओटे, लाकडी खांब, नक्षीदार, भव्य दरवाजे.. 







राजवाड्याच्या खाजगी भागात, जिथे एकेकाळी नाट्यशाला होती, तिथल्या दगडी बाकावर मी बसले. दारात बकुळीचा प्रचंड मोठा वृक्ष. खाली ओल्या, लाल फ़रशीवर बकुळ फ़ुलांचा नुसता खच पडला होता. वाटेल लागलेल्या झिमझिम पावसाचा इथे काहीच मागमूस नव्हता.

बैठ्या, पांढ-याशुभ्र इमारतींचा हा प्रचंड मोठा परिसर, लालचुटूक कौलांची, पारंपरिक केरळी शैलीतल्या बाहेरुन दगडी, आतून काळ्याभोर, शिसवीच्या, अनेक शतकांचं तेलपाणी पिऊन मृदू, तकतकीत झालेल्या लाकडी कोरीव बांधकामाची पसरट घरांचा समुह आणि सगळीकडे झाडच झाडं. साडेचारशे वर्षांच्या मूळ बांधकामात डागडुजी सोडली तर काहिच फ़ेरफ़ार नाहीत.
-
कमानीसमोरचा पिंपळाचा वृक्ष जितका जुना आहे तितकाच हा राजवाडाही. राजा रविवर्मांचे हे मातृकुल.




5 comments:

  1. Eagerly awaiting the second part...

    ReplyDelete
  2. आपणच तिथे फिरत आहोत असे वाटावे असे शब्दचित्र रेखले आहे तुम्ही.मस्त.

    ReplyDelete
  3. Chan lihita ho tumhi. Ekdam creative writing. Watata kaash me pan chitrakar jhale aste. Agdi tumchyabarobar firun sagla Rajwada pahat aslyacha bhas hot asto wachtana.

    ReplyDelete