Tuesday, March 24, 2020

हॉपरचं शहर


शहरं कायमच रिकामी असतात, आणि शहरांमधले तुम्ही कायमच एकटे असता. 
कर्फ़्यूचं केवळ निमित्त. 
शहरामधेच वाढलेल्या आणि अर्धं आयुष्य शहराशिवाय कुठेच न काढलेल्यांना हे कळायला अवघड नाही किंवा नवंही. 
एकवीस दिवस घराबाहेर पडायला मुभा नाही. ठीक आहे. हे फ़र्मान ऐकून मनाला अस्वस्थता तरीही आलीच. यायची फ़ार आवश्यकता नसूनही. 
घरात माणसं आहेत, महिन्याचं किराणा सामान भरलेलं आहे, अत्यावश्यक वस्तु मिळणार आहेत, वीज, वायफ़ाय, पाणी नियमित आहे. 
मग काय नेमका फ़रक पडणार आहे? 
शहरातले रस्ते सुनसान रहाणार, दुकानं, रेस्टॉरन्ट्स, समुद्र किनारे ओस पडणार, म्युझियम्स, आर्ट गॅल-या, लायब्र-या, थिएटर्स तर कधीच बंद झालेली आहेत, मग तसंही अशा शहरात फ़िरण्याची परवानगी मला मिळाली तरी मी काय करणार आहे? 
पण शहरात घरांमधे मुळातच एकटी, एकाकी असणारी अनेक माणसं आहेत, वृद्ध जोडपी आहेत, विद्यार्थी आहेत, आजारी आहेत, आलेली ही अस्वस्थता त्यांच्यामुळे, त्यांच्याकरता.


अमेरिकन चित्रकार एडवर्ड हॉपरच्या चित्रांमधे रिकामी शहरं आणि त्यातली एकटी, एकाकी माणसं असतात. 
हॉपरच्या नजरेला विसाव्या शतकाच्या सुरुवातीचे, माणसांनी गजबजलेले, समृद्धीने, प्रगतीने खचाखच भरलेले न्यूयॉर्क शहर कायमच रिकामे,ओसाड दिसायचे आणि त्यातली माणसे एकटी.




एकवीस दिवस मलाही माझं शहर तसंच दिसणार आहे? 
की मुळात ते जसं आहे तसं, त्याचा मुळ स्वभाव आता मला नव्याने कळणार आहे? 
कदाचित.



चित्रकार-कलावंत मग तो मुंबईतला असो, न्यूयॉर्कमधला असो, इटाली मधला असो, दिल्लीमधला असो किंवा इस्तांबुलमधला, एकविसाव्या शतकातला असो, किंवा अठराव्या, किंवा अगदी इसवीसनापुर्वीच्याही. काय वाटत असतं त्याला शहरांबद्दल? 
माझ्या मनात मुळातच ’शहर’ या संकल्पनेबद्दल फ़ॅसिनेशन आहे, त्यांचं असणं, आपल्या आत आणि बाहेरचं, मला कुतूहलाचं वाटतं. अनेकांना वाटतं. 
शहरं असतात, बनतात, मोडतात, वसतात, त्यात माणसं येतात, जातात, पुन्हा परतुन येतात, शहरं त्यांची वाट पहातात, त्यांना विसरतात, लाथाडूनही देतात. 
आणि मग चित्रकार, कलावंत, लेखक त्याबद्दल विचार करतात, लिहितात, व्यक्त होतात. त्यांच्या या अभिव्यक्तीबद्दलचं फ़ॅसिनेशन तर अनलिमिटेड आहे.  

या एकवीस दिवसांत, आणि त्यानंतरही आपण त्यांच्याबद्दल जाणून घ्यायला काहीच हरकत नाही. मला माहित आहे तेवढं मी सांगेन, बाकी सांगायला तुम्ही आहातच. सांगायला आणि ऐकायला सध्या माझ्याकडेही भरपूर वेळ आहे आणि तुमच्याकडेही आहेच.       


1 comment:

  1. Very nice. This will prompt me & many others to look
    at the city & expression of various artist etc from different point.

    ReplyDelete