Thursday, July 30, 2020

लॉकडाऊन आर्ट


सगळेच अचानक घरामधे अडकून पडले, आयुष्य चार भिंतींपुरतं मर्यादित झालं. प्रत्येकाची कथा वेगळी, प्रत्येकाच्या मनात भिती आणि अनिश्चितता. काळ बंदिस्त असला तरी तो स्थिर नव्हता. उलथापालथी, अस्वस्थता वातावरणात भरुन होती. अडकून पडकलेल्यांत नोकरदार, व्यावसायिक, कलाकार, लेखक, विचारवंत सगळेच. प्रत्येकाने आपापल्या कुवतीनुसार हा काळ सुसह्य करण्याचा प्रयत्न केला. मनोरंजनाच्या, छंदाच्या मदतीने कोंडी फ़ोडण्याचा प्रयत्न यातल्या काहींनी केला, काहींनी इतर मार्ग शोधले. चित्रकारांनीही आपल्या अंगभुत कलेची मदत साहजिकच घेतली. 
भोपाळला रहाणारी, भारतभवन या कलासंस्थेत एचिंग आणि पॉटरी या कलाप्रकारांमधे गेली अनेक वर्षे सातत्याने कलानिर्मिती करत असलेली चित्रकार विशाखा आपटे लॉकडाऊनच्या काळात अंधेरीला आपल्या आईवडिलांच्या घरी आहे. कोरोनाच्या संकटकाळात ते एकटे असते तर मनाला काळजी लागून राहिली असती आणि हातातल्या कामावर लक्ष एकाग्र झालं नसतं,  त्यामुळे लॉकडाऊनच्या काळात आपण मुंबईत अडकलो आहोत ते एका दृष्टीने चांगलं आहे असं तिला वाटतं. विशाखाच्या मते हा काळ अनेक बरे वाईट बदल घडवणारा आहे ज्याचे परिणाम आपल्या वागण्यावर, सवयींवर आणि प्रतिसादांवर होत आहेत आणि होत रहाणार आहेत. कलेच्या माध्यमातून विशाखा जो आशय व्यक्त करते त्याचं आयसोलेशन आणि शहरीकरण हेच मूळ आहे, पण त्याकडे आता ती वेगळ्या दृष्टीने पाहते. चित्रकला हे एकटे राहून काम करण्याचे माध्यम आहे आणि तिथे आपला स्वत:शीच संवाद असतो. फ़क्त नेहमी काम करत असताना ते एकटेपण आपण निवडलेले असते, सध्याचे एकटेपण लादले गेले आहे, त्यामुळे आयसोलेशनच्या संकल्पनेला दृश्यभाषेतले काही घटक जोडले गेले आहेत; जे सतत घरात राहण्याशी, रिकामपणाशी किंवा बाहेरच्या ओसाडपणाशी संबंधीत आहेत. इथे रहात असताना सामग्रीही मर्यादित आहेत, त्यामुळे तंत्र वेगळे झाले आहे. मर्यादित अवकाशामुळे दृश्यरचनेतही फ़रक पडेल, मानसिक बदलांमुळे कामावर होणारा परिणाम पुढेही दीर्घकाळ टिकून राहिल असे विशाखाला वाटते.

va-1, Untitled, Watercolors on handmade paper, 10 inches x 10 inches, May 2020.

यशवंत देशमुख या मिनिमलिस्ट शैलीत चित्र काढणा-या मुंबईतील चित्रकाराच्या मते लॉकडाऊनच्या या काळाकडे, कोरोनाच्या साथीकडे बघताना अनेकदा मी चित्रकार म्हणून पाहतो आहे की माणूस म्हणून अशी सरमिसळ मनात होते. माझ्यातल्या चित्रकारापेक्षा माझ्यातला मी जरा जास्त अस्वस्थ आहे असंही वाटतं. चित्रकार म्हणून मला जी प्रेरणा मिळते ती माझ्या माणूसपणातून, आजूबाजुच्या जगातूनच. या वातावरणाचा चित्रनिर्मितीवरचा परिणाम नंतर व्हायचा तो होईलच, परंतु हा काळ व्यक्ती म्हणून मला बंदिस्त, दहशतीचा, कोंडलेला वाटत आहे, त्याचा परिणाम जास्त ठळक आहे. डिजिटलायझेशनला चित्रकारांनी ब-याच आधीपासून जवळ केल्याने या काळाशी जुळवून घेणे सहज शक्य असूनही हे होते आहे. एक चित्रकार म्हणून मनात कायम असते ती सहसंवेदना नैसर्गिकपणे चित्रांमधून व्यक्त होत रहातेच आहे. नुकतीच माझ्या चित्रात एक डोळे मिटून, अंग चोरुन उभी असलेली मांजर आली, ती मला या परिस्थितीत वावरणा-या माझ्या स्वत:तून आली असावी असं वाटतं.  
Digital work on drawing by Yashwant Deshmukh

सामाजिक अंतर, देहदूरी पाळत एकमेकांपासून अंतर राखत उभी असलेली माणसे या लॉकडाऊनच्या काळात शहरात सर्वत्र दिसत आहेत. संवादाचा अभाव असलेले मानसिक अंतर माणसांमधे ब-याच आधीपासून पडले होते, त्यातच आता सामाजिक अंतराची भर पडली. परस्परांना तोंड दिसण्याचीही शक्यता आता राहिली नाही, वैयक्तिक संपर्क शून्य होऊन डिजिटल माध्यमांद्वारे गरजेपुरता संवाद साधणारी, व्हर्चुअल जगामधेच मन रमवणे भाग पडलेल्या माणसांचा हा समाज भविष्यातल्या कोरड्या, आत्ममग्न, विखुरलेल्या, विरंगी समाजाचे भितीदायक, अस्वस्थ चित्र नजरेसमोर उभे करत आहे. अशा वेळी चित्रांच्या प्रत्यक्ष जगात त्याचे प्रतिबिंब नेमके कसे पडते आहे याचा वेध घेणे गरजेचे वाटते.   
अंजुम बाथेना सिंगापोरचा तरुण चित्रकार, व्हिडिओ इन्स्टॉलेशन्स करतो. जानेवारीच्या तिस-या आठवड्यात मुंबईत एका आर्टिस्ट्स रेसिडेन्सीकरता तो आला, आणि मग इथेच अडकला. कुलाब्याला एका मित्रासोबत त्याच्या लहानशा जागेमधे त्याची रहायची सोय झाली. अंजुमने या काळात भरपूर स्केचिंग केले. व्हिडिओज घेतले. गॅलरित उभं असताना त्याच्या नजरेला दिसत होते रस्त्यावर दिवसरात्र तोंडावर मास्क लावून उभे रहाणारे पोलिस, भाज्या, फ़ळं विक्रेते, होम डिलिव्हरी करणारी मुलं, अर्धी उघडी मेडिकल शॉप्स आणि त्यातले विक्रेते, रांग लावून जीवनावश्यक वस्तु विकत घेणारे सामान्य नागरिक. आधी पाहिलेले, एरवी गजबजून वाहणारे मुंबईतले रस्ते बघता बघता सूनसान झालेले पहाण्याचा अनुभव त्याला विलक्षण वाटला. अंजुमच्या चित्रांचे प्रदर्शन सिंगापोरच्या त्याच्या आर्ट गॅलरीत शक्य होईल तेव्हा नक्कीच होईल. सिंगापोरमधे अडकलेल्या एखादा बाहेर देशाचा चित्रकार प्रवासी त्या शहराचे असेच डॉक्यूमेन्टेशन करत असेल हे नक्की.
-
हैदराबादला रहाणा-या आणि लॉकडाऊनमुळे आपलं इटालीला होणारं चित्रप्रदर्शन रद्द झाल्याने सुरुवातीला अतिशय खंतावलेल्या केदार धोंडूसारख्या चित्रकाराला आपल्या नैराश्यातून बाहेर काढण्याचे काम आजूबाजूच्या परिस्थितीने आणि अर्थातच त्याच्यामधल्या चित्रकलेने केले. केदारला जाणवलं की लोकांना कोंडीतून बाहेर पडण्याचे मार्ग हवे आहेत आणि ते मिळत नाही आहेत. घरात जरी रिकामे बसून असले तरी त्यांच्या मनात अशांती आहे, कोंडलेला असहाय राग आहे. परिस्थितीवर मात करण्याचे लोकांचे प्रयत्न केदारला आपल्या चित्रांमधून नोंदवावसं वाटलं. बाहेरचं जग उंब-याबाहेर गोठल्यावर बदललेलं मानसिक परिप्रेक्ष्य चित्रांमधून व्यक्त करण आव्हानात्मक आणि गरजेचं वाटलं. यामधे एका नव्या जगाचा शोध होता. त्याकरता केदारने आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवरुन “लोनली रेसिडेन्ट्स” हा प्रोजेक्ट सुरु केला. त्याने लोकांना आव्हान केलं- आपण रोज काय केलं हे ठळकपणे दर्शवणारं छायाचित्र पाठवा. मग त्याने या छायाचित्रांवरुन स्केचेस केली. गोवा, बेंगळुरु, मुंबई, दिल्ली, ओदिशा, अगदी लंडन, न्यूयॉर्क अशा अनेक शहरांतून त्याला प्रतिसाद मिळाला.
Pencil sketch by K.Dhondu

केदारच्या स्केचेसमधून कुटुंबांमधला एकाकीपणा दिसतो, गजबज दिसते, मर्यादित अवकाश दिसतो, रिकामे कोपरे दिसतात आणि अर्थातच नव्या दिनचर्येशी जमवून घेण्याचा प्रयत्न करणारी. त्यात कुकरमधला केक करणा-या, घरकामात बुडवून घेतलेल्या, नृत्यात मन रमवणा-या, भरतकाम करणा-या, मुलांना गोष्टी सांगणा-या स्त्रिया आहेत, भाजी कापून देणारे, भांडी घासणारे पुरुष आहेत. शून्य नजरेने खिडकीत बसून असलेलेही आहेत. 
घरामधे अडकून रहावं लागणं म्हणजे तुरुंगात बंदिवास होणं नाही, ही एक संधी आहे स्वत:ला शोधण्याची, घरातल्या आपल्याच असलेल्या जगातला, कुटुंबियांमधला संवादबिंदू नव्याने जागवण्याची ही जाणीव केदारने आपल्या प्रोजेक्टद्वारे करुन दिली.
-
सगळं जग एकाचवेळी या लॉकडाऊनचा सामना करत असलं तरी भारतातला लॉकडाऊन अनेक अर्थांनी वैशिष्ट्यपूर्ण होता, त्याला वेगवेगळे आयाम लाभले होते जे संवेदनशील मनाला दुर्लक्षता न येणारे होते. शहरांमधून बाहेर पडणारे मजुरांचे तांडे, कष्टकरी वर्गाचे आपापल्या गावांच्या दिशेनं जीवाच्या भितीपोटी, तगून रहाण्याच्या धडपडीपोटी सुरु झालेलं स्थलांतर मनाला भयंकर अस्वस्थ करणारं होतं. रस्त्यांवरुन, हायवेवरुन अथांग, अथक वाहणारा हा जनांचा प्रवाह एकाच दिशेने जात होता, आपल्या घराच्या दिशेने. तुटक्या चपला, खांद्यावर गाठोडी, कडेवर कच्चीबच्ची आणि पोटात भूक घेऊन आजवरची सगळी आर्थिक, मानसिक, शारिरीक पुंजी पणाला लावून हे कष्टकरी चालत होते. स्वतंत्र भारताने आजवरच्या काळात कधीही न अनुभवलेलं हे विदारक दृश्य. जतीन दास सारख्या साम्यवादी विचारसरणीच्या चित्रकाराला त्याची आपल्या चित्रांमधून दखल घ्यावी वाटणं हे अत्यंत नैसर्गिक. लॉकडाऊनच्या काळातल्या मजुरांच्या या मन विषण्ण करणा-या स्थलांतरावर जतीनदांनी केलेली शाईची चित्रे काळीज हलवून टाकणारी आहेत. दिल्लीतल्या आपल्या घरात बंदीस्त असताना त्यांच्याकडचा शाईचा, कागदाचा साठा संपला, आपल्या स्टुडिओमधे जाऊन काम करणंही शक्य नव्हतं त्यांना, त्यावेळी घरात सापडतील त्या पाठको-या कागदांवर त्यांनी आपली चित्र काढणं सुरु ठेवलं.
“आपल्या देशाच्या प्रत्येक प्रगतीकरता पायाभूत ठरलेल्या या श्रमजिवी लोकांच्या बाजूने आज आपण उभं रहाणं गरजेचं आहे. गांधीजी म्हणाले होते, आपल्या खेड्यांमधे आपली पुनर्गुंतवणूक होणे गरजेचं आहे- आपल्या मुळांशी, ग्रामीण संस्कृतीशी, शेतीशी, कलेशी आणि कौशल्याशी पुन्हा जोडले जाणं गरजेचं आहे. या स्थलांतरितांपैकी निम्मेजण पुन्हा शहराकडे परतून येण्याची शक्यता नाही. भेदरुन गेलेली लोकं आहेत ती. शहरांनी त्यांना वापरुन घेतलं आणि त्यांना गरज होती तेव्हा दुर्लक्ष केलं. आपल्याला चिंता आहे आपल्या इकॉनॉमीवर याचा काय परिणाम होईल, मला ही चिंता आपल्या निर्दयी विचारपद्धतीची निदर्शक वाटते.” - जतीन दासांनी त्यांच्या परखड, संवेदनशील स्वभावाला अनुसरुन केलेल्या या विधानाला साजेशी ही चित्र आहेत. कोरोनाच्या साथीमधे समाजातील श्रमजीवी स्तराकडे झालेले दुर्लक्ष ही भारतीय जनमानसातील करुणा लयाला गेल्याचे चिन्ह आहे, याकडे ते त्यांच्या चित्रांमधून लक्ष वेधू पहातात. चालत असताना उन्हाचा तडाखा, पोटातली भुक असह्य झाल्याने जागीच कोसळणारी, मृत्यूमुखी पडणारी, रस्त्याच्या कडेला मुल जन्माला घालून पुन्हा पुढे वाटचाल करणारी, ट्रकच्या धक्क्याने कोलमडलेली, दुस-याच्या हातातले खाद्यपदार्थ हिसकावू पहाणारी, मुकाट पाण्याचे घोट गिळणारी, आपल्याला घेऊन जाणा-या वाहनाची आशाळभुतपणे वाट पहाणारी, रेल्वेचे फ़लाट, बसच्या थांब्यांवर घोळक्याने दिवस-रात्र बसून रहाणारी लोकं जतीनदासांच्या चित्रांमधे आहेत. अशा दोनशे चित्रांचे बाड त्यांच्यापाशी आहे. त्याचं प्रदर्शन होईल का त्यांना माहित नाही, पण जास्तीत जास्त लोकांनी ती पहावीत, त्यांच्या स्मरणातून ती कधीच जाऊ नयेत असं त्यांना वाटतं. चित्र काढत असताना स्वत:च्या मनाचा, विचारांचा जो प्रवास झाला तो त्यांना महत्वाचा वाटतो.




मुक्काम काय आहे, तो कधी येईल हे सांगता येणार नाही, जसा या श्रमजीवींनाही तो माहित नाही, एक समाज म्हणून, व्यक्ती म्हणून आपल्याला आपल्या जीवनमूल्यांची पुन्हा एकदा पडताळणी करणं गरजेचं आहे हे ही चित्रे पहाताना लक्षात येतं.
अनेकांनी आपापलं उत्तरदायित्व स्विकारुन या असहाय जीवांना जमेल तशी मदतही करायला सुरुवात केली. स्वीटी जोशी ही मुंबईला रहाणारी तरुण, प्रयोगशील चित्रकार त्यापैकीच एक. आपली स्वत:ची वैयक्तिक कलासाधना बाजूला ठेवून समाजाच्या प्रती असलेले आपले योगदान देणे तिने जास्त महत्वाचे मानले. खरं तर लॉकडाऊनच्या काळाच्या आधी तब्बल आठ वर्षांनी जहांगीरमधे होणा-या आपल्या चित्र-प्रदर्शनाच्या तयारीमधे स्वीटी पूर्णपणे गढलेली होती, रंगवून तयार असलेली चित्रे फ़्रेमिंगकरता दिली होती, इन्व्हिटेशन्स पाठवून झाली होती आणि अकस्मात सगळं जग स्तब्ध झालं. यामुळे एक मोठा मानसिक धक्का सुरुवातीला बसलाच, पण त्यातून सावरल्यावर स्वीटीने चित्रांच्या निमित्ताने दीर्घकाळ आपल्या आत लावलेली नजर आपल्या बाहेरच्या जगावर केंद्रित केली. तिथे ज्या घडामोडी होत होत्या त्या व्यथित करणा-या होत्या. संवेदनशील कवयित्रीही असलेल्या स्वीटीला आपल्या घराजवळच असलेल्या हायवेवरुन जबरदस्ती स्थलांतर लादल्या गेलेल्या असहाय मजुरांच्या अविरत लोंढ्याने मुळापासून हादरवलं. जमेल तशी आर्थिक, अन्नाची मदत ती त्यांना करत राहिली, पण तिच्यातल्या चित्रकारालाही फ़ार काळ स्वस्थ बसवणार नव्हतेच. या सगळ्या घटना आपल्या कलेत नोंदवल्या जायलाच हव्यात, त्याच्या खूणा आपल्या कलेवर उमटवायलाच हव्यात, आपली स्वकेंद्रित कलानिर्मिती परिघाबाहेर विस्तारण्याचा हा क्षण आहे हे तिला जाणवलं. त्यातूनच स्वीटीने या स्थलांतरित मजुरांचा कष्टमय प्रवास  केंद्रस्थानी असलेल्या अनेक व्हिडिओ फ़िल्म्स केल्या.


-
चित्रकलेच्या क्षेत्राला गेली अनेक वर्षे आर्थिक मंदीने घेरले असतानाच हे कोरोनाचे महासंकट कोसळल्याने अनेक तरुण, उमेदीचे परंतु अननुभवी चित्रकार भांबावून गेले. भविष्यातील आर्थिक संकटाने धास्तावले. अनेकांनी स्टुडिओची भाडी परवडत नाहीत त्यामुळे स्थलांतराचा मार्ग निवडला. प्रदर्शने शक्य नाहीत, चित्रांची विक्री करण्याचे नवे मार्ग शोधून काढणं प्रत्येकालाच शक्य नाही, अशा वेळी कलेकडे निव्वळ आर्थिक गुंतवणुक या दृष्टीने पहाणारे दलाल संधीचा फ़ायदा उठवायला फ़ुटकळ किंमतीमधे चित्रांची मागणी करत आहेत. या अडचणीच्या काळात आर्ट गॅल-या, चित्रकला समुह, संस्था किंवा ज्येष्ठ, सुस्थितीतील, नावाजलेल्या चित्रकारांचा भक्कम आधार त्यांच्या पाठीशी आहे का?
संजय सावंत हा मुंबईस्थित चित्रकार, मिश्र माध्यमांमधे काम करणारा प्रयोगशील, उत्साही कलावंत. तो या सगळ्याकडे जागरुकपणे बघतो.  त्याच्या मते असं मार्गदर्शन करणारा एकही प्रातिनिधिक कलामंच दुर्दैवाने कार्यरत नाही, मात्र वैयक्तिक पातळीवर अनेकजण मदतीचा हात पुढे करत आहेत. आर्ट स्कूलमधे विद्यार्थ्यांकरता मॉडेलिंग करणा-या, कंत्राटी पद्धतीवर काम करणा-या स्त्रिया लॉक डाऊनच्या काळात बेरोजगार झाल्या, अनेकींवर रस्त्यावरील भंगार, कचरा गोळा करुन उदरनिर्वाह करण्याची वेळ ओढवली. संजयने खाजगी चित्रकला समुहांमार्फ़त त्यांच्याकरता आर्थिक मदत गोळा केली. स्थलांतरित होणा-या श्रमजिवींकरताही तो सातत्याने मदतशील होता.  चित्रकाराच्या संवेदनेचा परिघ रुंदावण्याची, स्वत:च्या कोषाबाहेर पडण्याची ही संधी कलावंतांसमोर आहे, या विपरित परिस्थितीवर मात करण्याकरता कलावंताने आपली आजवरची कलेतून मिळालेली मानसिक ताकद पणाला लावायला हवी, खचून जाऊ नये या मताचा संजय आहे. संजय अमूर्त चित्रशैलीत काम करतो, त्याच्या मते या काळाचा परिणाम चित्रकलेवर निश्चित होईल, कारण एक व्यक्ती म्हणून आपल्या प्रत्येकातच हा काळ उलटून गेल्यावर जे बदल होणार आहेत ते दीर्घ आणि सखोल असतील. त्याचे परिणाम हळूहळू जाणवतील, कलेतही ते तसेच उमटत रहातील.
कला ही आत्ममग्न असते, चित्रकार त्याच्या विश्वात असतो अशा त-हेच्या समजुतींना कायमचा छेद देणारे हे विचार आहेत.


चित्रकारांच्या संवेदनेचा परिघ रुंदावणे आणि त्याचा परिणाम चित्रशैलीवर होणे ही गोष्ट शुभा गोखले या सातत्याने वैविध्यपूर्ण कलाप्रयोग करणा-या चित्रकर्तीच्या बाबतीतही घडून आली आहे. शुभाच्या पेंटींग्जची प्रेरणा बरीचशी तिचं व्यक्तिगत आयुष्य, अनुभव, नातेसंबंध आणि निरिक्षणांतून येतं, लॉक डाऊनच्या काळात प्रथमच तिच्या चित्रांमधे तिच्या व्यक्तिगत परिघाबाहेरची माणसे, त्यांचं जीवन डोकावलं.
Shubha Gokhale-Medium is oils on canvas

रोजच्या जीवनात ज्यांच्याशी संबंध येतो ते कारिगर- चांभार, रफ़ूवाला, रद्दीवाला, चावीवाला, बॅग रिपेअरवाला, फ़्रेमवाला, दागिने बांधणारा पटवा असे अनेकजण तिच्या पेंटींग्जच्या केंद्रस्थानी आले. हातावर पोट असणारी ही सगळीच लॉकडाऊनच्या काळात कशी गुजराण करत असतील हा विचार स्केचिंग करताना सातत्याने मनात होता, भिती आणि अनिश्चितताही होती, रंगांची, कागदांची कमतरता होती, या सगळ्याचा परिणाम अभिव्यक्तीवर होणं अपरिहार्य आहे, त्यातूनच काही नवे प्रयोग झाले असं शुभा सांगते. श्रमजिवींचे बेघर, बेरोजगार होणे, हातातले काम गेल्यावर, हाताला कामच न उरल्यावर आलेली रिकामपणाची, सुन्नपणाची भावना तिच्या चित्रांमधल्या व्यक्तिरेखांतून प्रतित होते. ही सुरुवात आहे, चित्रे आणखी बदलत जातील, आजवर न अनुभवलेले जीवन त्यातून व्यक्त होत राहील याची तिला खात्री वाटते. आजूबाजूच्या गढुळलेल्या वातावरणात रंगांच्या सहवासात रहाणं, सोशल मिडियावर सकारात्मकता आणणारी चित्रं पोस्ट करणं हेही तिला महत्वाचं वाटतं.

चित्र काढून घर चालवणा-या कलावंतांचं या काळात खरंच अवघड आहे, पण कला-प्रदर्शने, चित्रांची विक्री पुढील काळात अधिक जोमाने होईल ही आशा मनाशी बाळगणं गरजेचं आहे.  कला माणसाला प्रतिकुल परिस्थितीतून बाहेर यायला निश्चित मदत करते.
-
लॉकडाऊनच्या परिणामामुळे अनेक सर्जनशील मनांना अस्वस्थतेसोबतच मानसिक निष्क्रियतेचा सामनाही करायला लागला. पुण्याचा तरुण, प्रयोगशील चित्रकार चारुदत्त पांडे स्वत:च्या या संदर्भातल्या अनुभवांबद्दल, मानसिक पातळीवरील स्थित्यंतराबद्दल सविस्तर सांगतो, “सुरुवातीच्या काळात वेळ आहे तर खूप काम करता येईल असं वाटलं, पण काही काळानंतर हातून काम घडण्याचं प्रमाण कमी होत गेलं, माझे मुळ चित्रविषय माझ्यापासून दूर जायला लागले, शहरात एरवी प्रवास करताना माणसं दिसत, ज्या स्टुडिओत कामाला जायचो ती जागा, आजूबाजूचं वातावरण, त्या भागातल्या टप-या, तिथले रोजचे नवनवीन चेहरे गायब झाले आणि माझ्या कामाला मर्यादा आल्या. सोबत विषाणुची भितीही मनात होतीच.” चारुदत्ती मुलगी अगदीच तान्ही आहे, त्यामुळे तिच्या आरोग्याची काळजी, मानसिक ताण प्रचंड होता, यामुळे चिडचिड वाढत होती. सामाजिक स्थितीही त्यात भर घालत होती. चारुदत्तने सोशल मिडियावर जाणे, बातम्या पहाणे थांबवले. आणि मग हळूहळू त्याला कामाचा सूर पुन्हा गवसायला लागला. आता जे काम हातून होईल त्यातून तो समाजाची नजर बनू इच्छितो. ज्या गोष्टी समाजाला बघायच्या नाहीत, दुर्लक्षित करायच्या आहेत, किंवा राजकारणामुळे टाळायच्या आहेत, त्यांना तो आपल्या चित्रांमधून त्यांच्या समोर आणणार आहे, आजूबाजूच्या साध्या सरळ, मध्यमवर्गीय माणसांनी लावलेल्या झडपांना छिद्रे पडायला हवीत असं चारुदत्तला वाटतं. चित्रांद्वारे सामाजिक विद्रोह घडवू पहाणा-या कला-परंपरेचा चारुदत्त आता हिस्सा आहे. लॉकडाऊनच्या काळात एका तरुण चित्रकाराच्या मानसिकतेत झालेला हा फ़रक महत्वाचा आहे.   
Charudatt Pande- Long Live:Watercolour on paper
-
Prabhakar Kolte-Oil on canvas
प्रभाकर कोलते ज्येष्ठ चित्रकार. लोकसंग्रह मोठा असल्याने एरवी त्यांच्याकडे तरुण चित्रकारांचा, परिचितांचा कायम राबता असतो, लॉक डाऊनच्या काळात सुरुवातीला प्रत्यक्ष संवादाची अतिशय उणीव भासली मात्र नंतर वाचन, लेखन याकडे लक्ष पुरवायची संधी मिळाली असे कोलतेसरांना वाटतं. मात्र कोरोनाच्या भितीने घरात दडून रहाणे नैसर्गिक नाही, बाहेर पडून आपले नेहमीचं रुटीन, फ़िरणं, गाठी-भेटी पुन्हा सुरु होणं अत्यंत गरजेचं आहे, त्याकरता गरजेचे असणारे योग्य नियम पाळून, काळजी घेऊन हे करता येईल असं त्यांना वाटतं. कलाजगतावर आर्थिक संकटाचा काळा ढग आहे हे निश्चित, वेळ लागेल मात्र त्यातून ते निश्चित सावरतील याची त्यांना खात्री आहे. कलेचं माणसाच्या आयुष्यातलं स्थान अढळ आहे, मनाचा समतोल राखण्याकरता कलेची फ़ार मोठी मदत होते त्यामुळे लॉकडाऊनच्या काळातही चित्रकारांनी कलेची साधना सातत्याने करत रहायला हवी हे कोलतेंनी आवर्जुन सांगीतलं.

-

प्रकाश वाघमारे या अमूर्त शैलीत चित्र काढणा-या, साहित्यात रुची असणा-या चित्रकाराने या काळात आपल्या निसर्गप्रेमाला, छायाचित्रकलेच्या छंदाला आणि लिहिण्याच्या आवडीला मुक्त वाट करुन दिली. प्रकाशचा स्टुडिओ बोरिवलीला नॅशनल पार्कच्या अगदी जवळ, स्टुडिओबाहेर दाट झाडं, पक्षी, नदी असा मुंबईत दुर्मिळ असणारा नजारा असतो. प्रकाशच्या मते या काळात समाजात अनेक स्तरांमधे पसरलेली अस्वस्थता आपल्याही आत झिरपणे हे अगदी साहजिक आहे. या निमित्ताने एक कलाकार म्हणून, व्यक्ती म्हणून आपलं समाजाकरता नेमकं काय योगदान आहे याचाही नव्याने विचार झाला. 
हा काळ कलाजगताला व्यावसायिकदृष्ट्या अतिशय कोलमडवून टाकणारा आहे आणि त्यातून सावरायला दीर्घ काळ जावा लागेल. कलाकारामधे आंतरिक उर्जा आणि कणखरपणा असतो, मात्र त्याचा कस लागण्याची संधी फ़ार क्वचित मिळते, ती या निमित्ताने मिळाली असं प्रकाशला वाटतं.


पुण्याला रहाणारे शरद आणि सुचिता तरडे हे अनुभवी चित्रकार दांपत्यही क्वारंटाईनच्या अनुभवातून गेले आहेत. दिल्लीला भरलेल्या त्यांच्या चित्रांचं प्रदर्शन आटपून येत असतानाच लॉकडाऊन घोषित झाला. परतीच्या प्रवासात नेहमीसारखी गर्दी नव्हती, आजूबाजुचा संपूर्ण शुकशुकाट, निर्मनुष्यता त्यांना धक्कादायक वाटली. क्वारंटाईनच्या काळात तरडेंनी आपल्या जाणीवपूर्वक नवे-जुने चित्रकार, परिचितांशी फोनवरुन सातत्याने संपर्क ठेवला. आपल्या गतायुष्यात डोकावून पहायची संधी घेतली. जुनी पत्रे, स्केचेस कपाटातून काढून पुन्हा एकदा नजरेखालून घातली. हा कालावधी त्यांनी स्वत:शी आणि इतरांशी संवाद साधण्यात घालवला. अमूर्त चित्रकलेविषयी लोकांच्या मनात अनेक गोंधळ, प्रश्न असतात त्यामुळे या काळात अमूर्त चित्रकलेविषयीचे व्हिडिओज, इतर चित्रकारांची चित्रे, त्यावरची आपली टिपणी शरद तरडे फ़ेसबुकवर पोस्ट करत राहिले. सुचिताने या काळात कापडाच्या रंगीत तुकड्यांच्या गोधड्या शिवण्याचा छंद जोपासला. या काळात प्रत्येक माणूस स्वत:कडे वेगळ्या दृष्टीकोनातून पहायला लागला आहे, आपल्याला काय करायचे आहे याचं त्यांना नव्याने भान आलं आहे असे तरडेंना वाटतं. 

या सगळ्या चित्रकारांनी लॉकडाऊनच्या काळात जे काही केलं, किंवा केलं नाही, जो विचार केला, जे सांगीतलं ते तुमच्या आमच्या मनातल्या विचारांपेक्षा, भावनांपेक्षा फ़ार काही वैशिष्ट्यपूर्ण नाही, आपल्या मनात साचलेला त्रागा, नैराश्य, भिती आणि आशेचा किरणच त्यांच्या कथनातून व्यक्त झाला आहे. मग नेमकं वेगळं असं काय आहे यात ज्यामुळे त्याची इतक्या सविस्तरपणे नोंद घ्यावीशी वाटली? तर ते वैशिष्ट्य, तो वेगळेपणा आहे या कलावंतांनी आपल्या मनातल्या साचलेल्या सगळ्या नकारात्मक भावनांना, नैराश्याला वाट कशी करुन दिली, आपल्या विचारांना, संवेदनशीलतेला अभिव्यक्त कसं केलं, आपल्याला अचानक मिळालेल्या या अवधीचं, थांबलेल्या काळाच्या गतीचं त्यांनी नेमकं काय केलं हे पहाण्यात. त्यांनी याचं रुपांतर कलेत केलं.
कला- जी मानवाला आजवरच्या प्रत्येक चांगल्या वाईट कालखंडात सोबत पुरवत राहिली, उर्जा देत राहिली, प्रेरणेचा स्त्रोत बनत राहिली. माणसाची पहिली अभिव्यक्ती, त्याचे व्यक्त होणं घडलं ते कलेच्या माध्यमातून. कला ही आदीम प्रेरणा आहे जी प्रत्येक क्षणी, प्रत्येक पावलाला माणसाला पुढे जायची, जगायची जाणीव करुन देते, तणावाचा निचरा करते, साचलेल्याला प्रवाहित करते, कसं जगायचं याचं भान देते, तोल सावरते, जगणं सुंदर करते.
आणि सर्वात महत्वाचं कला, विशेषत: चित्रकला इतिहासाची नोंद करते. संकटकाळावर मात करणा-या मानवी जीजिविषु वृत्तीची प्रत्येक खूण चित्रांच्या, कलेच्या इतिहासावर उमटलेली आजवर जगाने पाहिली आहे. महाभयंकर साथीचे रोग, संहारक महायुद्धे, प्रलय, भुकंप, वणवे, दुष्काळ.. मानवजातीवर ओढवलेला प्रत्येक जीवनमरणा संघर्ष चित्रकलेच्या इतिहासात कोरला गेला आहे. पाब्लो पिकासोची गेर्निका, चित्तोप्रसादांची बंगालच्या भीषण दुष्काळातली एचिंग्ज याची साक्षी आहेत.
आजही, कोरोनाच्या विषाणुनी घातलेल्या सर्वव्यापी थैमानात या सगळ्याच, आपल्या किंवा बाहेरच्या जगातल्या चित्रकारांनी त्यांच्या वैयक्तिक दु:खाच्या, निराशेच्या क्षणांना, मनातल्या नकारात्मक भावनांना बाजूला सारुन, प्रसंगी आपलं जगणं बाजूला ठेवून घडवली आहे ती कला- जी तुमच्या करता आहे, आमच्याकरता आहे, जगणा-या प्रत्येकाकरता आहे. कलेची आज कधी नव्हे इतकी गरज मानवाला आहे.

जोगेन चौधरी ज्येष्ठ चित्रकार तर आहेतच, पण अनेक उपक्रम, चळवळींमधे त्यांचा कायमच सक्रिय सहभाग असतो. जोगेनदांना हा सगळा काळ अतीव नैराश्याचा, निष्क्रियतेचा आहे आणि आपण त्याला स्विकारायला हवं, संकटकाळात आपली उर्जा टिकवून ठेवायला हवी, तरच नंतरच्या काळात आपण जोमाने काम करु शकू असं वाटतं. मानवजातीवर अशी संकटं याही आधी अनेकदा आली आहेत आणि आपण तरुन गेलो आहोत, त्यामुळे धीर सोडता कामा नये, चित्रकारांनी या काळात मनन, चिंतन करायला हवं आणि ज्यांना गरज आहे त्यांना मदतीचा हात द्यायला हवा असं ते सांगतात. मानवजात आणि विषाणू यांच्यातले एक महाभयंकर युद्ध त्यांनी आपल्या चित्रामधे रंगवलं आहे.
आर्ट गॅल-या, म्युझियम्स, स्टुडिओ हे चित्रकलेच्या अभिव्यक्तीला सामावून घेणारं जग बघता बघता ऑनलाईन झालं. लहान मोठे, ज्येष्ठ, तरुण सगळेच चित्रकार सोशल मिडियाच्या जगात कधी नव्हते इतके सक्रिय झाले. चित्रकाराचं आजवर एकांत जपलेलं जग लॉकडाऊनच्या काळात बाहेरच्या जगाशी नाईलाजाने असो, स्वखुशीने असो, पण खूप जवळून जोडलं गेलं, गजबजून गेलं. कोरोनाची भिती, लॉकडाऊनचा बंदिवास.. चित्रकाराच्या कलेच्या प्रेरणा आमुलाग्र बदलू शकण्याचं सामर्थ्य या विषाणूमधे आहे का?  

दिल्लीस्थित अंजोली इला मेनन यांनी स्टुडिओमधे जाणं शक्य नसल्याने घरातच तात्पुरता स्टुडिओ उभारला आहे. कॅनव्हास आणि रंगांची चणचण मला माझ्या चित्रकलेच्या प्रदीर्घ कारकिर्दीमधे पहिल्यांदाच भासली आणि हा माझ्याकरता समजुतीचे नवे दालन उघडणारा अनुभव ठरला असे ही ज्येष्ठ चित्रकर्ती प्रामाणिकपणे कबुल करते. अंजोली यांना या काळात घरातील सर्व सदस्यांचे एकत्र असणे आणि त्यामुळे बदललेले घराचे रुटीन अनुभवणेही वैशिष्ट्यपूर्ण वाटते आणि ते त्यांच्या लॉकडाऊन पेंटींगमधूनही जाणवते. अंजोलींच्या चित्रात एरवी दिसणा-या दरवाजे खिडक्यांच्या चौकटी त्यांच्या नव्या पेंटींगमधे दिसत नाहीत, पक्षी जे एरवी अंगणात, घराच्या चौकटीबाहेर असतात ते आता अंतर्भागात आहेत. घराच्या आतल्या अवकाशात झाडे, चंद्र, सूर्य आणि नदी आहे. एकमेकांना जोडलेले हात आहेत. व्हिडिओ फ़िल्म करण्याचा एक नवा प्रयोगही अंजोलींनी या काळात आपल्या मुलाच्या मदतीने केला. आजवर कधीही व्हर्च्युअल जगाशी संपर्क साधण्याची गरज न भासलेल्या अंजोली आता आपल्या सुहृदांशी ऑनलाईन गप्पा मारतात.
परेश मैती आपल्या पुढच्या वर्षी फ़ेब्रुवारीमधे होणा-या पॅरिसच्या प्रदर्शनाची तयारी करण्यात गढून गेला आहे, मात्र मी रोज सकाळ संध्याकाळ कोरोनाच्या भीषण संकटाला सामोरे जाणा-या प्रत्येकाच्या सुरक्षिततेकरता प्रार्थना करतो, अंधा-या रात्रीचा शेवट सूर्योदयाने होतो हे जगाने विसरता कामा नये असं तो सांगतो.   
-
आर्ट अलाइव्ह गॅलेरीच्या सुनयना आनंद यांच्याकरता लॉकडाऊनचा सुरुवातीचा काळ कसोटीचा होता. परंतु त्याला सरावल्यावर त्यांनी परिचित चित्रकारांशी सातत्याने संवाद साधला. ज्यांचे स्टुडिओ घरात किंवा घराजवळ आहेत त्यांना स्टुडिओत जाऊन काम करायला त्यांनी प्रोत्साहन दिलं. आपल्या परिचित वातावरणात रहाणं गरजेचं आहे, मग तिथे प्रत्यक्ष चित्र काढायला सुचलं नाही तरी चालेल असं त्यांना वाटतं. सिनियर चित्रकारांच्या स्टुडिओचं, त्यांच्या कामाचं चित्रण असलेल्या व्हिडिओ फ़िल्म्स त्यांनी दाखवल्या, इतर चित्रकारांनाही आपले स्टुडिओत काम करत असतानाचे व्हिडिओ प्रदर्शित करायला प्रोत्साहित केलं. चित्रकारांमधे कमालीची उर्जा आणि आशादायी वृत्ती असल्याची जाणीव मला या काळात ख-या अर्थाने झाली असं त्या म्हणतात. या उपक्रमामधे शक्ती बर्मन, क्रिशन खन्नांसारखे अनेक ज्येष्ठ चित्रकार सहभागी झाले. कोरोनामुळे आपल्या आयुष्याकडे वळून पहाण्याची संधी मिळाली असं या चित्रकारांना वाटतं.
क्रिशन खन्नांनी या काळात आपली कवितेची आवड जोपासली, बायरनच्या आवडत्या कविता दीर्घ कालावधीनंतर वाचताना त्याचे नव्याने अनेक अर्थ उलगडले. व्हिडिओ फ़िल्मच्या निमित्ताने आपल्या अनेक जुन्या चित्रांच्या निर्मितीमागच्या कहाण्या आठवल्या गेल्या. सुरुवातीला हा संकटकाळ आहे, यातून आपलं, आपल्या सुहृदांचं कसं निभावणार असं वाटत होतं, मात्र नंतर अचानक हा काळ ही कलाकाराकरता एक सुसंधी असल्याचं लक्षात आलं. क्रिशन खन्नां असंही वाटतं की जर हा लॉक डाऊन आपल्या तरुणपणामधे आला असता तर चांगला किंवा वाईट, कसाही पण एक तीव्र, खोल परिणाम मनावर झाला असता, त्यातून स्वत:च्या चित्रांचा स्वभाव, पोत पूर्ण बदलला असता, परंतु आता माझ्या दृष्टीने हा काळ एरवीपेक्षा वेगळा नाही. माझे जीवन, माझी कला आता संथावली आहे, त्यावर फ़ार क्वचित बाह्य वातावरणाचे तरंग उमटतात. स्टुडिओमधे मला आजवर कधीही एकटं वाटलेलं नाही, आजही वाटत नाही. तत्वद्न्यानाची पुस्तकं माझा मोठा आधार आहेत.
कलेमधे मनाला शांती पोचवणारी एक अध्यात्मिक शक्ती असते, नैराश्यावर मात करण्याची, सकारात्मकतेकडे नेणारी उर्जा असते. कला ही मानवाच्या मनातील आदीम प्रेरणा आहे, कलेतून निर्माण झालेली संवेदना त्याच्या अंतर्मनात, खोल गाभ्यापर्यंत जाऊन पोचते. शरिर जगवण्याची धडपड करणे हेच एकमेव काम शिल्लक उरलेल्या आजच्या या विलक्षण काळात कला ही एकच गोष्ट माणसाच्या मनाला जिवंत ठेवू शकते, त्याला उद्याचे जग वेगळे असेल ही प्रेरणा देऊ शकते.
ज्येष्ठ चित्रकार जयश्री बर्मन यांच्या मते आशा, विश्वास, प्रेम, सुसंवाद आणि कला या पाच गोष्टींच्या आधाराने मानवी जीवनाचा समतोल आजवर राखला गेला आहे. त्यांच्या चित्रांमधून याचा पुनरुच्चार होत असतो. कोरोनाच्या संकटात सुसंवादाचा आधार कमकुवत झाला आहे, परंतु इतर चार आधारांच्या बळावर आपण हा संकटकाळ पार पाडू. एक प्रकारे हा मानवजातीला मिळालेला वैश्विक इशारा आहे, त्यातून योग्य तो धडा आपण शिकायला हवा. 


लॉकडाऊनच्या काळात जयश्रींनी एक अतिशय सुंदर, भव्य पेंटींग पूर्ण केले- त्यामधे धरित्री आहे, विश्वातील अनेक घटक- मासा, हंस, कमळ, पृथ्वी, हिरवा, निळा रंग, आकाश, पाणी आहे. सृष्टीचे नियम पाळूनच आपल्याला जीवन जगायला हवे या संदेशाचे सूचन त्यांच्या पेंटींगमधे आहे. 
शक्ती बर्मनदा सांगतात- सगळं जग थांबलं आहे, माझ्यातला चित्रकार, जो कायम आतमधेच बघत असतो, एकाकी असतो त्याच्या दृष्टीने काहीच फरक पडलेला नाही, मात्र माझ्यातल्या व्यक्तीला निश्चित फार मोठा फ़रक वाटतो. चित्रकाराला बाह्य जगातूनच प्रेरणा मिळते, कितीही म्हटलं तरी तो तिथल्या घटनांपासून अलिप्त राहूच शकत नाही. माझ्या चित्रांचा आत्मा या काळात बदलला आहे, तो पुन्हा पहिल्यासारखा होणार नाही. सक्ती बर्मनदांनी कृष्णाचं एक मोठं पेंटींग या काळात रंगवलं. विश्वावर संकट कोसळलं असताना कायम धावून येणा-या तारणहाराची आठवण त्यांच्या सारख्या अध्यात्मिक वृत्तीच्या चित्रकाराला येणे साहजिक आहे.  
कलेची भाषा वैश्विक असते आणि कलेद्वारे व्यक्त होणारी चित्रकाराची भावनाही जगभरात सारखीच संवेदनशील असते. कोरोनाच्या विषाणूमुळे जगभर पसरलेल्या साथीतून निर्माण झालेली वेदना, असहायता, भिती, असुरक्षितता प्रत्येक चित्रकाराच्या, कलावंताच्या मनात तितक्याच तीव्रतेनं आहे. जगभरातल्या कोणत्याही कोप-यात या विषाणूचा बळी ठरलेल्या प्रत्येकाकरता प्रत्येकाच्याच मनात अनुकंपेची, करुणेची भावना आहे.
-
जगातल्या कोणत्याही स्थानावर असणारा चित्रकार याच विचारधारेतून आज प्रवास करत आहे हे दुई हान या मुळच्या चिनी, आता न्यूयॉर्कला रहात असलेल्या २५ वर्षीय चित्रकाराने लॉकडाऊन काळात काढलेल्या चित्रांवरुन लक्षात येतं. वुहानला रहाणा-या आपल्या आजीआजोबांची त्याला जितकी काळजी आहे तितकिच तिथल्या फ़ॅक्टरीत काम करणा-या कामगारांची, त्यांच्या लहान मुलांची, जगभरातल्या वृद्ध, आजारी नागरिकांची, आणि अपु-या सुविधांमधे अथक काम करणा-या वैद्यकीय कर्मचा-यांची त्याला काळजी वाटते. दुई हान मनावरच्या या ताणामुळे रात्रभर जागा रहातो आणि चित्र काढतो. त्याच्या चित्रांमधे अंगभर सुरक्षित, शुभ्र कवच ल्यायलेले वैद्यकिय देवदूत आहेत, लहान मुलांची, वृद्धांची ते काळजीपूर्वक देखभाल करत आहेत. दुई हान जवळचे रंग, कॅनव्हास संपल्यावर डिजिटल इमेजेस कडे वळला. पण सातत्याने तो चित्र काढत राहिला, आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवर पोस्ट करत राहिला. ’द सेंट्स वेअर व्हाईट’ ही त्याची चित्रमालिका लोकप्रिय आहे. सुरक्षिततेचा सकारात्मक संदेश लोकांना चित्रांच्या माध्यमातून पोचवत रहाणं त्याला गरजेचं वाटतं. त्यामुळे त्याच्या स्वत:च्या मनालाही आधार मिळतो. दुई हानने आपली एरवीची रंगांचा भरपूर वापर असणारी आपली चित्रशैली या काळात पूर्ण बदलली, पांढ-या, सौम्य रंगांचा वापर सुरु केला. अनेक धार्मिक, सामाजिक संस्थांनी ही चित्रे विकत घेतली. चित्रांच्या विक्रीमधून मिळणारे पैसे तो वैद्यकीय कर्मचारी सुरक्षितता निधीला देतो.
५५ वर्षीय जेसिका हरग्रीव्हझ या बेल्जियन आर्टिस्टला या काळात लोकांच्या मनावर असलेल्या तणावाची, नैराश्यग्रस्ततेची, आत्महत्येच्या विचारांची काळजी वाटली. लोकांनी आपले “ऎन्क्झायटी सेल्फ़ी” काढून ते आपल्याला पाठवावे असे तिने आव्हान केले. तणावग्रस्त चेह-यांच्या या छायाचित्रांवरुन तिने त्याच चेह-यांचे हसरे, प्रसन्न पोर्ट्रेट रंगवले आणि ते पोस्ट केले.  
बॅन्क्सीसारखा विद्रोही स्ट्रीट ग्राफ़िटी आर्टिस्ट या काळात आपल्या प्रतिभेचा आविष्कार नेमका कशा प्रकारे घडवतो, कसा रिऎक्ट होतो याकडे कला जगताचे डोळे निश्चित लागले होते. “गेम चेंजर” हे साउदॅम्प्टन हॉस्पिटलच्या बाहेरच्या भिंतीवर त्याने चितारलेलं भव्य ग्राफ़िटी पेंटींग जगभरातल्या वैद्यकिय कर्मचा-यांना आणि डॉक्टरांना त्याने अर्पण केलं आहे. एक भला मोठा मास्क शहराच्या मध्यभागी टांगला आहे. लोकांनी नियम पाळावेत हा संदेश एरवी आपल्या ग्राफ़िटीद्वारे विद्रोह, बंडखोरीची चिथावणी देणा-या बॅन्क्सीकडून यावा हेच या काळाचं वेगळेपण दाखवणारं आहे.
क्वालालंपूरच्या नवाज़ मोहम्मद या २६ वर्षीय चित्रकाराने परदेशातून प्रवास करुन आल्यावर क्वारंटाईन व्हावं लागल्यावर मनात उमटलेल्या भावना आपल्या कृष्ण-धवल रेखाचित्रांमधून व्यक्त केल्या. एका चित्रामधे खिडकीतून बाहेर पहाणा-या दोन डोळ्यांवर बाहेर उभ्या ठाकलेल्या कोरानाच्या सुसज्ज लष्कराचा पहारा आहे. घराच्या आतल्या भागामधे नेटफ़्लिक्स आणि इतर ऑनलाईन मनोरंजन माध्यमांच्या चिन्हांची गजबज आहे.
मुंबईची चित्रकार ध्रूवी आचार्य अपल्या चित्रांमधून मानसिक प्रेरणांचा वेध घेते. साहजिकच कोरोनाच्या साथीत, लॉकडाऊनच्या काळाचा स्वत:च्या आणि आपल्या निकट असलेल्या लोकांच्या मनावर नेमका काय आणि कसा परिणाम होतो आहे याचा आपल्या चित्रांमधून सजगतेने मागोवा घेणं ध्रूवीला गरजेचं वाटलं. 
तिच्या मते हे एकप्रकारे या वैशिष्ट्यपूर्ण काळातल्या मानसिकतेचे मी माझ्या कलेद्वारे केलेलं दस्तावेजीकरण आहे. कोरोनाची साथ भारतात पसरायला लागायची सुरुवात होण्याच्या आधीपासूनच आंतरराष्ट्रीय माध्यमांमधे ज्या बातम्या येत होत्या त्यांचा ती मागोवा घेत होती. मनावरचा ताण कसा वाढत गेला, आजूबाजूच्या सामाजिक परिस्थितीचा पडसाद मनावर कसा उमटला हे तिच्या चित्रांमधून स्पष्ट दिसतं. २७ मार्चला तिने इन्स्टाग्रामवर पोस्ट केलेल्या चित्रामधे अमर चित्र कथेमधे असते तशी एक पौराणिक व्यक्तिरेखा आहे, कोरोनाच्या विषाणूशी तिचं युद्ध चालू आहे, ही मालिका सामाजिक घडामोडी, साथीच्या वाढत्या वेगानुसार पुढे सरकत रहाते. कोरोनाच्या या विषाणुचा मुकाबला कधी भुकेशी, कधी श्रमजिवींच्या दुबळ्या हातांशी, आजारी, वृद्ध व्यक्तिशी, डॉक्टरांच्या हातातल्या आयुधांशी, विषाणूवर मात करुन ब-या झालेल्या रुग्णाशी होतो आहे. रहात्या जागेमधूनच चित्र काढत राहिल्याने केवळ वृत्तमाध्यमांवरील बातम्यांवरच ती विसंबुन होती. तिच्या एका चित्रामधे पलंगावर झोपलेल्या, पण डोळे टक्क उघडे असणा-या एका मुलीच्या भोवती अनेक जिभा लवलवत असताना दिसतात, सातत्याने कानावर आदळणा-या बातम्यांमुळे ध्रूवीला झालेल्या निद्रानाशाचे निदर्शक असे हे चित्र.

- 
चित्रकला बदलत राहिली पण नष्ट कधीच झाली नाही. प्रत्येक महायुद्धानंतर चित्रकलेत नवे प्रवाह आले. कोरोनाच्या या संकटकाळानंतरही चित्रकलेमधे बदल निश्चित होतील. कलेच्या प्रेरणा जगण्यातूनच येतात, जगणं बदलल्यावर कलाही बदलणारच आहे.   
चित्रकलेचा इतिहास हा मानवी संस्कृतीचा इतिहास आहे. माणसाच्या जगण्याचा, त्याच्या झगडण्याचा, टिकून रहाण्याचा, पुढे जाण्याचा इतिहास आहे. मानववंशाच्या प्रगतीचे, संस्कृतीच्या विकासाचे आदीम टप्पे चित्रकलेद्वारे नोंदवले गेले आहे, आणि हा वंश जास्तीतजास्त समृद्ध, संस्कृतीच्या उच्च शिखरापर्यंत पोचवण्याचे उत्तरदायित्वही चित्रकलेच्या कुंचल्यावरच तोलले गेले आहे. प्रत्येक चित्रकार हे जाणून आहे.
जगातली सर्वात प्राचीन चित्रकला, तीस हजार वर्षांपूर्वीची, फ़्रान्समधील शॉव्हेत गुहांमधे शाबुत आहे, त्यात काही हातांचे ठसे आहेत, आदीम चित्रकाराच्या हातांचे ठसे. काळाने जपून ठेवलेली ही कलेची आणि कलानिर्मिकाची खूण. त्याची कृतद्न्य जाणीव त्यानंतरच्या प्रत्येक चित्रकाराने ठेवली असावी कारण त्यानेही नंतर कालपटावर उमटलेल्या मानवी संस्कृतीच्या प्रत्येक महत्वाच्या पावलांची नोंद आपल्या चित्रकलेच्या इतिहासात जपून ठेवली.
चित्रकार गगन सिंग कोरोनाच्या तापाने आजारी असताना, होम क्वारंटाईनमधे असताना रोज सकाळी आणि संध्याकाळी घराच्या बाल्कनीमधे आपले स्केचबुक आणि काले पेन घेऊन उभा रहायचा, आणि आजूबाजूच्या लोकांची मास्क लावून किराणा माल घेण्याकरता, दूध, औषधे घेण्याकरता सामाजिक अंतर राखून रांगेत उभं असतानाची, मुकाट, भितीच्या, असुरक्षिततेच्या दहशतीखाली वावरतानाची रेखाचित्रे चितारायचा. अगदी आजूबाजूला वावरणारे कुत्र्या मांजरासारखे प्राणीही या काळात शांत होते असं गगनला वाटतं. तो सांगतो, स्वत: आजारी असतानाही मी हे का करत होतो माहित नाही, पण काहीतरी भीषण बदल आजूबाजुच्या जगात घडत आहे आणि मला तो नोंदवून ठेवायचा आहे ही जाणीव मनात सतत होती. स्वत:चं जगणं अनिश्चित असताना गगन सिंगला या नोंदी कराव्याशा वाटणं हे चित्रकाराच्या सनातन प्रेरणेविषयी बरंच काही सांगून जातं.   
चित्रकारांकरता, कलाजगतावर कोसळलेल्या आर्थिक संकटाकरता शासनाने कोणत्या योजना जाहिर केल्या आहेत कोणालाच माहित नाही, यथावकाश ते कळेल, किंवा कळूनही काही उपयोग होणार नाही, मदत ज्याला हवी आहे तशी, हव्या त्या वेळी कधीच आजवर पोचलेली नाही. कलाकारांनी, विशेषत: चित्रकारांनी हलाखीत, अभावात जगण्याची, त्यांना कायम स्ट्रगल करताना बघण्याचीच समाजाला सवय आहे. याही वेळी चित्र फ़ार वेगळं असेल ही आशा नाही, आणि तरीही चित्रकार जगणार आहे, त्याची कला त्याला जगवणार आहे, नुसतं जगवणार नाही, उमेदीने, उत्साहाने जगण्याची प्रेरणा आपल्यापर्यंत पोचवत रहाणार आहे, आपल्याला जास्त सक्षम करणार आहे.
चित्रकलेमुळे श्रमजिवी मजुरांचे दु:ख, कष्ट नाहिसे होणार नाही, त्यांचं जगणं सुसह्य होणार नाही, भुकेल्याच्या पोटात अन्न जाणार नाही, बेरोजगाराला काम मिळणार नाही, आजारी रुग्ण बरा होणार नाही, घरात एकटे अडकलेल्यांच्या अडचणी सुटणार नाहीत, जगावर ओढवलेलं संकट चित्रकलेच्या असण्याने, नसण्याने किंचितही उणावणार नाही. असं असतानाही मग चित्रकलेची या काळात नेमकी काय गरज, का त्याचं महत्व हे विचारी चित्रकार प्रभाकर बरवेंनी एका लेखात नोंदवलेले आहे ज्याचा संदर्भ आजच्या काळाला सुसंगत आहे- कला माणसाच्या आत जाणीव उत्पन्न करते, जाणीवेचा कोंब बहरायला मदत करते. कला माणसाला जगण्याचा समतोल शिकवते, जगायचं का ते समजावते. कला माणसाला, समाजाला जोडून ठेवते. सुसंस्कृत करते. कोरोनाच्या संकटकाळात आपल्याला याची जाणीव झाली तरी पुष्कळ आहे.   
*मुंबई विद्यापीठाच्या “संभाषण” या द्विभाषिक रिसर्च आणि डॉक्यूमेन्टेशन जर्नलच्या जुलै २०२० अंकामधे हा लेख प्रसिद्ध झाला आहे. लेखाची संकल्पनेबद्दल सहसंपादक नितिन आरेकर यांचे विशेष आभार.
**(लेखाकरता चित्रकार, चित्र-व्यावसायिकांसोबत झालेला प्रत्यक्ष संवाद, मुलाखती तसेच विविध वृत्तमाध्यमातील वृत्तांतांची बहुमोल मदत झाली. त्या सर्वांचे मनापासून आभार.)
-         शर्मिला फडके



Tuesday, May 5, 2020

किलिमानूरची गोष्ट- एक


26 जून 2019
त्रिवेंद्रमला रात्रभर धो धो पाऊस होता. मुंबईवरुन आलेली असल्याने मला तिथल्या पावसाच्या अनुभवापोटी आलेलं अपरिहार्य टेन्शन; उद्या किलिमानूरला जायचा रस्ता पाणी साठल्याने वगैरे बंद तर होणार नाही? ठरवलेला टॅक्सीवाला वेळेत येईल ना? किलिमानूरला पावसाची काय परिस्थिती असेल?
सकाळी सहा वाजता टॅक्सी किलिमानूरच्या दिशेने निघाली तेव्हा पाऊस पूर्ण थांबला होता. आभाळ ढगाळलेलेच होते.  
ड्रायव्हरला किलिमानूर माहित होतं, पण तो राजवाड्यात कधीच आला नव्हता. त्यामुळे अट्टाकल फ़ाट्यावरुन किलिमानूरकरता वळल्यावर वाटेत विचारत विचारतच तो कार हाकत होता.
किलिमानूरच्या राजवाड्याचा रस्ता उतरत्या, चिंचोळ्या, आत आत वळत जाणा-या पायवाटेचा. एका बाजूला अक्षरश: अस्ताव्यस्त रान, आणि दुस-या बाजूला गर्द, सावळट हिरवी भातशेती आणि नारळीची, फ़णसाची, केळीची झाडं. ही सगळी राजवाड्याचीच जमीन आहे, आणि हे अस्ताव्यस्त रान म्हणजे अनेक शतकांपासूनची यक्षीची अस्पर्श देवराई हे रस्त्याचं प्रदीर्घ वळण संपल्यानंतर समोर आलेल्या प्राचीन, लोखंडी फ़ाटकावरील पाटीमुळे कळलं. आत एक मोकळं मैदान, अतिप्रचंड, पुरातन पिंपळाच्या झाडाचा लाल, दगडी पार.  समोर कोवळ्या पोपटी रंगातला भातशेतीचा समुद्र आणि डाव्या बाजूला समोरच किलिमानूरच्या राजवाड्याची आजवर अनेक फोटो-चित्रांमधून पाहिलेली पांढरीशुभ्र, डौलदार कमान.




किलिमानूरचा राजवाडा १० वाजता उघडतो, मी ८-३० वाजताच इथे पोचले. कारण मला राजवाडा बघायला लोक येत असतील तर ती गर्दी व्हायच्या आत शक्यतो तिथे फ़िरायचं बघायचं होतं. आणि मुख्य म्हणजे तिथे अजूनही रहाणा-या वर्मा कुटुंबियांपैकी कोणी भेटेल का हे बघायचं होतं. दोन वर्षांपूर्वी नेहरु सेंटरला झालेल्या रविवर्मांच्या लिथोग्राफ़ प्रदर्शनामधे रामावर्मांची ओझरती भेट झाली होती, पण दुर्दैवाने त्यांनी त्यावेळी दिलेलं कार्ड हरवलं होतं.
कमानीपर्यंत पोचणा-या काळ्याभोर, दगडी पाय-यांकडे जायला आम्ही वळणार तोच बाजूच्या झाडांमधे लपलेल्या बैठ्या घरातून एक उग्र चेहरा, लांब केसांच्या पांढरट काळ्या जटा, शुभ्र करवतकाठी मुंडू, उघड्या अंगावर उपरणं, आडवे गंधाचे पट्टे असा कोणत्यातरी गत शतकातून अवतरल्यासारखा दिसणारा समोर आला. माझ्याकडे पूर्ण दुर्लक्ष करत ड्रायव्हरशी काहीतरी मल्याळममधे बोलला. ड्रायवर सेंथिल कुमारचे ओह.. असे उद्गार, चेह-यावरचे निराश भाव पाहून माझ्या पोटात आता खेप फ़ुकट जाते आहे का वाटून खड्डा. पण सेंथिल सांगतो, हा म्हणतो आहे राजवाडा दहा वाजता खूला होतो.
ते ठीक आहे असं म्हणत मी त्या माणसाला माझा इथे येण्याचा उद्देश, रामावर्मांच्या नावाचा उल्लेख करत सांगते. तेव्हा तो काही वेळ गायब होऊन मग हातात फोन घेऊन आला. म्हणाला, बोला इथे- फोनवर रामावर्मा स्वत:च होते. मृदू आवाजात म्हणाले, कमानीतून आत या, पण माझी पूजा झाल्यावरच मी भेटू शकतो. तोवर तो दाखवेल तिथे बसा. काहीच हरकत नव्हती मला अर्थातच.
उग्र चेह-याचा तो माणूस आम्ही आभारदर्शक काही बोलत असताना निर्विकार चेह-याने आमच्या हातांवर लहान आकाराची खास केरळी लाल केळी ठेवतो. प्रसाद असं म्हणत.
-
कमानीच्या आत एक वेगळंच जग. अतिशय देखणं लॅन्डस्केपिंग. विशाल प्रांगण आणि त्यापलीकडे हिरव्यागार वृक्षांच्या दाटीमधे मोठ्या विस्तारावर उभी असलेली अनेक बैठी, एकमजली शुभ्र घरं.
दाट जंगलाचा बॅकड्रॉप. फ़णसाची लगडलेली झाडे, मंदार वृक्षांची रांग. त्यांचं हे नाव मला नंतर कळलं.
आवाज फ़क्त गळणा-या पानांचा आणि वा-याचा.







लाल फ़रशांची जमीन. शुभ्र रांगोळी, रुंद ओटे, लाकडी खांब, नक्षीदार, भव्य दरवाजे.. 







राजवाड्याच्या खाजगी भागात, जिथे एकेकाळी नाट्यशाला होती, तिथल्या दगडी बाकावर मी बसले. दारात बकुळीचा प्रचंड मोठा वृक्ष. खाली ओल्या, लाल फ़रशीवर बकुळ फ़ुलांचा नुसता खच पडला होता. वाटेल लागलेल्या झिमझिम पावसाचा इथे काहीच मागमूस नव्हता.

बैठ्या, पांढ-याशुभ्र इमारतींचा हा प्रचंड मोठा परिसर, लालचुटूक कौलांची, पारंपरिक केरळी शैलीतल्या बाहेरुन दगडी, आतून काळ्याभोर, शिसवीच्या, अनेक शतकांचं तेलपाणी पिऊन मृदू, तकतकीत झालेल्या लाकडी कोरीव बांधकामाची पसरट घरांचा समुह आणि सगळीकडे झाडच झाडं. साडेचारशे वर्षांच्या मूळ बांधकामात डागडुजी सोडली तर काहिच फ़ेरफ़ार नाहीत.
-
कमानीसमोरचा पिंपळाचा वृक्ष जितका जुना आहे तितकाच हा राजवाडाही. राजा रविवर्मांचे हे मातृकुल.




Saturday, March 28, 2020

शहरं त्यांच्याकरता नसतात

शहरं त्यांच्याकरता नसतात; कधीच नव्हती. शहरांना त्यांची गरज असते, त्यांनाही शहरांची असतेच. एकमेकांना ते वापरुन घेतात, पुरेपूर. पण संकटकाळात; मग तो दंगलींचा काळ असो, पुराच्या लोंढ्याचा असो, किंवा करोनाच्या महामारीचा, शहर कधीच त्यांच्या पाठीशी उभं रहात नाही. शहर त्यांना विश्वासही देऊ शकत नाही की आम्ही तुम्हाला आसरा पुरवू, मजुरी नाही मिळाली तर पोटाला अन्न देऊ. शहर फ़क्त निर्विकारपणे त्यांचे जाणारे लोंढे बघत रहाते. पुन्हा येतीलच हे, शहर सुस्थितीत आलं की याची स्वार्थी खात्री शहरातल्या प्रत्येकाला असते.

कलेच्या इतिहासाने शहरं सोडून जाणा-या माणसांचे असे अनेक लोंढे वेगवेगळ्या कालखंडात पाहिले. १९३९ ला मरियन ऎन्डरसनने लिंकन मेमोरियलच्या पाय-यांवर उभं राहून “ट्रेन इन कमिंग..” गायलं ते अशाच शेकडो हजारो आफ़्रिकन अमेरिकनांचे लोंढे पाहून. जे उपाशीपोटी दक्षीणेकडची शहरं सोडून उत्तरेकडे निघाले होते, पोट भरायला, काम मिळवायला, जगण्याचा सन्मान मिळवायला. त्याच वर्षी त्याच लोंढ्यामधील एक असलेल्या जेकब लॉरेन्स या तरुण चित्रकाराने त्याच गदारोळात आपली ’वन वे टिकट’ ही ६० लहान टेम्पेरा पेंटींग्ज असलेली मायग्रेशन सिरिज रंगवली. त्यातले प्रत्येक चित्र प्रचंड अस्वस्थ करुन टाकणारे आहे. 


त्याही आधी १९३० मधे एलिस आयलंडवरुन ओक्लाहोमाला जाणा-या युरोपियन्सच्या लोंढ्यावर आधारित यूरोप-अमेरिकेतील वेगवेगळ्या चित्रकारांनी रंगवलेल्या आजवरच्या असंख्य चित्रांचे एक मोठे एकत्रित प्रदर्शन गेल्या वर्षीच न्यूयॉर्कच्या म्युझियम ऑफ़ मॉडर्न आर्टमधे भरवले गेले होते  “The Warmth of Other Suns: Stories of Global Displacement,”.


 १७ व्या शतकातल्या’द ग्रेट सर्ब मायग्रेशन’ वर पाजा योवानोविक या सर्बियन चित्रकाराने १८९६ मधे रंगवलेली चार भव्य तैलचित्रांची मालिका बुडापेस्टच्या मिलेनियम एक्झिबिशनचा एक भाग होती. लहान होडक्यांमधे बसून डॅन्यूब ओलांडण्याच्या प्रयत्नांमधल्या सर्ब स्थलांतरितांचे एक चित्र त्यात होते.

उपरे, हुसकावलेले, किंवा नाईलाजाने जगायला बाहेर पडणारे.. माणसांचे प्रत्येक लोंढे, मग ते १७व्या शतकातले असोत किंवा या सहस्त्रकातले सिरियन निर्वासितांचे असोत, मुंबई, दिल्लीमधले उद्याची भ्रांत पडलेल्या मजुरांचे असोत, त्यांची कथा आणि व्यथा एकच असते, जगण्याकरता, तग धरुन रहाण्याकरता मुलाबाळांना खांद्यावर बसवून, संसार खाकोटीला मारुन पायी हजारो मैल चालत जाण्यातली असहायता तीच असते.


भारतामधे फ़ाळणीच्या वेळी जीवाच्या भितीने आपापली जन्मभूमी सोडून रेषेच्या अलीकडे आणि पलीकडे सैरावैरा धावत गेलेल्या लाखो निरपराधांनी तर जीव गमावले. उरले सुरले आजही रक्ताळलेल्या आठवणींसहित जगताहेत.




आणि मग न राहवून आठवतात बंगालच्या महाभिषण दुष्काळात चित्तोप्रसादांनी काढलेली ती चित्रे. भारतीय माणसांच्या जगण्यातली विदारकता आजही तिच आहे हेच पुन्हा पुन्हा सिद्ध होत रहाते.

२०२० सालातल्या मार्च महिन्याच्या अखेरीला शहरांमधून बाहेर पडणारे हे लोंढे कधीतरी एखादा चित्रकार कॅनव्हासवर नोंदवून ठेवेलच. कला-इतिहासातील माणसांच्या लोंढ्यात अजून एक भर पडेल.


Tuesday, March 24, 2020

हॉपरचं शहर


शहरं कायमच रिकामी असतात, आणि शहरांमधले तुम्ही कायमच एकटे असता. 
कर्फ़्यूचं केवळ निमित्त. 
शहरामधेच वाढलेल्या आणि अर्धं आयुष्य शहराशिवाय कुठेच न काढलेल्यांना हे कळायला अवघड नाही किंवा नवंही. 
एकवीस दिवस घराबाहेर पडायला मुभा नाही. ठीक आहे. हे फ़र्मान ऐकून मनाला अस्वस्थता तरीही आलीच. यायची फ़ार आवश्यकता नसूनही. 
घरात माणसं आहेत, महिन्याचं किराणा सामान भरलेलं आहे, अत्यावश्यक वस्तु मिळणार आहेत, वीज, वायफ़ाय, पाणी नियमित आहे. 
मग काय नेमका फ़रक पडणार आहे? 
शहरातले रस्ते सुनसान रहाणार, दुकानं, रेस्टॉरन्ट्स, समुद्र किनारे ओस पडणार, म्युझियम्स, आर्ट गॅल-या, लायब्र-या, थिएटर्स तर कधीच बंद झालेली आहेत, मग तसंही अशा शहरात फ़िरण्याची परवानगी मला मिळाली तरी मी काय करणार आहे? 
पण शहरात घरांमधे मुळातच एकटी, एकाकी असणारी अनेक माणसं आहेत, वृद्ध जोडपी आहेत, विद्यार्थी आहेत, आजारी आहेत, आलेली ही अस्वस्थता त्यांच्यामुळे, त्यांच्याकरता.


अमेरिकन चित्रकार एडवर्ड हॉपरच्या चित्रांमधे रिकामी शहरं आणि त्यातली एकटी, एकाकी माणसं असतात. 
हॉपरच्या नजरेला विसाव्या शतकाच्या सुरुवातीचे, माणसांनी गजबजलेले, समृद्धीने, प्रगतीने खचाखच भरलेले न्यूयॉर्क शहर कायमच रिकामे,ओसाड दिसायचे आणि त्यातली माणसे एकटी.




एकवीस दिवस मलाही माझं शहर तसंच दिसणार आहे? 
की मुळात ते जसं आहे तसं, त्याचा मुळ स्वभाव आता मला नव्याने कळणार आहे? 
कदाचित.



चित्रकार-कलावंत मग तो मुंबईतला असो, न्यूयॉर्कमधला असो, इटाली मधला असो, दिल्लीमधला असो किंवा इस्तांबुलमधला, एकविसाव्या शतकातला असो, किंवा अठराव्या, किंवा अगदी इसवीसनापुर्वीच्याही. काय वाटत असतं त्याला शहरांबद्दल? 
माझ्या मनात मुळातच ’शहर’ या संकल्पनेबद्दल फ़ॅसिनेशन आहे, त्यांचं असणं, आपल्या आत आणि बाहेरचं, मला कुतूहलाचं वाटतं. अनेकांना वाटतं. 
शहरं असतात, बनतात, मोडतात, वसतात, त्यात माणसं येतात, जातात, पुन्हा परतुन येतात, शहरं त्यांची वाट पहातात, त्यांना विसरतात, लाथाडूनही देतात. 
आणि मग चित्रकार, कलावंत, लेखक त्याबद्दल विचार करतात, लिहितात, व्यक्त होतात. त्यांच्या या अभिव्यक्तीबद्दलचं फ़ॅसिनेशन तर अनलिमिटेड आहे.  

या एकवीस दिवसांत, आणि त्यानंतरही आपण त्यांच्याबद्दल जाणून घ्यायला काहीच हरकत नाही. मला माहित आहे तेवढं मी सांगेन, बाकी सांगायला तुम्ही आहातच. सांगायला आणि ऐकायला सध्या माझ्याकडेही भरपूर वेळ आहे आणि तुमच्याकडेही आहेच.