Wednesday, December 4, 2019

अमृता शेरगिल- रोझ वॉटर ऎन्ड रॉ स्पिरिट (एक)


आज पाच डिसेंबर. अमृता शेरगिलच्या मृत्यूला ७८ वर्षे झाली. जेमतेम २८ वर्षांचे आयुष्य मिळालेली अमृता... ६ डिसेंबर १९४१ ला तिचं पहिलंच, स्वतंत्र चित्रप्रदर्शन लाहोरला भरणार होतं. त्या आधीच ती हे जग सोडून गेली. मागे शिल्लक होते तिचे कॅनव्हास, तिची पेंटींग्ज. तिची ठळक, झळाळती चित्रं.



अमृता शेरगिल बद्दल मला विलक्षण आकर्षण आहे.  अनेकांना असतं.
तिच्या चित्रांबद्दल, तिच्या बद्दल.
ती चित्रकार आहे आणि तिची चित्र आवडतात यापेक्षा हे आकर्षण खूप पलिकडचं, खूप खोलवरचं आहे. तिची चित्रं पुन्हा पुन्हा बघताना, तिच्यावर लिहिलेली पुस्तकं जमा करताना, तिचं नाव असलेल्या प्रत्येक लेखाचं कात्रण जमवताना दर वेळी मला स्वत:तलं हे आकर्षण नव्याने जाणवतं.
दिल्लीतल्या एनजिएमए मधे तिची पेटींग्ज पहाण्याकरता ऐन उन्हाळ्यात सलग काही दिवस राहिले होते, त्यावेळी अंगात ताप होता, हल्लक झालेल्या मेंदूमधे अमृताच्या चित्रांमधले रंग खोलवर झिरपत राहिले. अमृता शेर-गिलचा उल्लेख कधीही झाला की मला दिल्लीतला तो तप्त, रंगीत उन्हाळा आठवतो.
त्याच वेळी ’अमृता शेरगिल मार्ग’ असं नाव लिहिलेल्या रस्त्यावरच्या पाटीशेजारी भर रणरणत्या उन्हात अनोळखी माणसाकडून फोटो काढून घेतले होते. त्याही आधी एकदा एका ट्रेकच्या वेळी असाच एक अमृतावेडा मुलगा भेटला होता, तो सरायामधल्या अमृता शेरगिलच्या घरापर्यंत जाऊन आला होता, शिमल्यामधलं ती रहात होती ते ’द होल्म’ घर त्याने पाहिलं होतं आणि लाहोरलाही अमृताचा माग काढायला तो जाणार होता. हे सगळं तो सांगत होता तेव्हा मला त्याचा जेवढा हेवा वाटला तेवढा आजतागायत कधीच कुणाचाही वाटला नव्हता. पुन्हा पुन्हा, त्या मुलाला कंटाळा येईपर्यंत मी त्याच्याकडून ती हकिकत ऐकली.
भाऊ दाजी लाड म्युझियमच्या लायब्ररीमधे एकटीच बसून अमृता शेरगिलवर लिहिलेल्या लेखांचं संकलन वाचत असताना संध्याकाळ झाली. हातातलं पुस्तक मिटताना अमृताचा इझलसमोर बसलेला, हातात रंगांच्या ब्रशचा जुडगा घेतलेला, किंचित्र त्रासिक, कपाळावर आठ्या, बहुधा रंगवताना आलेल्या डिस्टरबन्समुळे, थेट कॅमे-याच्या लेन्सकडे बघणारा फ़ोटो दिसला. तिची तीक्ष्ण नजर.. चेह-यावरचे सजीव भाव.. भास झाला लायब्ररीमधल्या त्या दाट पावसाळी संध्याकाळच्या अर्ध उजेडात आपल्यासमोर खरोखरीची अमृता शेर-गिल आहे. मेस्मराइझ होऊन मी हातातल्या पुस्तकावर नजर खिळवून होते.

चित्रकार विवान सुंदरमने अमृता शेर-गिलच्या स्मृतींना अर्पण केलेल्या प्रदर्शनात शेर-गिल खानदानातले अमृताचे फोटो आल्बम, तिच्या वैयक्तिक वस्तू ज्यात असत ते ऎन्टीक पिटारे होते. त्यावर अमृताने कोणे एके काळी नेसलेली फ़िक्या समुद्री हिरव्या रंगाची रेशमी साडी होती.


अमृता शेर-गिलवर लिहित असताना मला आत्ता अमृता समोर दिसते आहे तीच साडी अंगावर परिधान केलेली. त्या प्रदर्शनाच्या वेळी विवान सुंदरमच्या सौजन्याचा फ़ायदा घेऊन त्याला काही अत्यंत भाबडे प्रश्न विचारले होते. त्याला फ़ारसं आश्चर्य वाटलं नाही. त्याची आई इंदिरा म्हणजे अमृताची धाकटी, पाठीला पाठ लावून आलेली बहिण.
अमृताच्या चित्रांबद्दल काहीही न विचारता मी तिच्या संदर्भातले काही वेडपट, वैयक्तिक प्रश्न त्याला विचारत होते. अमृता घरात कोणत्या भाषेत बोलायची, इंग्लिश की हंगेरियन की पंजाबी.. तिचा आवाज कसा होता, तिला कोणत्या नावाने हाक मारत.. आणि अमृताला प्रत्यक्ष न पाहिलेल्या विवान सुंदरमने या प्रत्येक प्रश्नाची शांतपणे उत्तरे दिली. ’आम्री’ हे अमृता शेर-गिलचं अतिशय गोड, सुंदर घरगुती नाव मला त्यावेळी पहिल्यांदा कळले.
विवान सुंदरमकडे अमृताच्या वैयक्तिक आठवणींचा खजिना होता, असंख्य वस्तू, छायाचित्रे, तिने लिहिलेली, तिला आलेली पत्रं.. या सगळ्य़ाचा समावेश असलेले दोन प्रचंड पुस्तकांचे खंडही नंतर त्याने प्रकाशित केले.
दिप्ती नवलला मी दहा इमेल पाठवल्यावर अखेर तिने मला भेटायला दहा मिनिटांचा वेळ दिला. भेटल्यावर मी तिला ती जेव्हा अमृता शेर-गिलच्या नव-याला भेटली होती त्या अनुभवाबद्दल बोलायला सांगीतलं, माझं बाकी काहीच काम तिच्याकडे नव्हतं. चकित झालेली दिप्ती नवल त्यानंतर सलग दोन तास बोलत होती. व्हिक्टर एगन, अमृताचा नवरा तिला म्हणाला होता माझ्या दृष्टीने तूच अमृताची भूमिका करायला योग्य अभिनेत्री आहेस हे वाक्य तिने मोजून सहा वेळा उच्चारलं होतं.

अमृता शेर-गिलचा लेख लिहायला बसल्यावर अशा अनेक बिनमहत्वाच्या गोष्टी रॅन्डमली आठवत रहातात.

आणि मग वाटतं काय आहे हे नेमकं? इतकी ऑब्सेस्ड का आहे मी अमृताबद्दल?
आणि आजूबाजूला असे अनेकजण असतात. अमृता शेर-गिलबद्दल ऑब्सेस्ड असणारे.

अमृताचं व्यक्तिमत्व शब्दांमधून उतरवण्याचं धाडस मी का करावं? केवळ मला तिचं आकर्षण आहे म्हणून?
अमृताबद्दल लिहिताना नेमकं काय लिहायचं याची सरमिसळ होत जाते डोक्यात. लेखाचा फ़ोकस नेमका कशावर हवा हे पक्क व्हायला इतका जास्त वेळ आजवर मला कधीही लागलेला नाही.



अमृता शेर-गिलची चित्रकला, तिचं सौंदर्य, आकर्षक व्यक्तिमत्व, तीक्ष्ण बुद्धीमत्ता, तरल संवेदनशिलता, भावनोत्कटता, मेहेनती वृत्ती, तिचा अभिमान, स्वभावातली बेपर्वाई, बेधडक फ़टकळपणा, मुक्त, स्वैराचारी स्वभाव, तिचं पॅरिसमधलं कला-शिक्षण, तिचं हंगेरियन-शीख असणं, तिचं भारतात परत येणं, आधुनिक चित्रकलेच्या क्षेत्रात तिने कमावलेलं नाव, तिची पत्रं, तिची छायाचित्रं, तिची न्यूड्स, तिच्या पेंटींगमधली माणसं, रंग, कॅनव्हासवर असलेल्या मौन-अव्यक्त मुली, तिच्यावरचा गोगॅंचा प्रभाव, तिचा प्रवास, तिची आजारपणं, तिची प्रेमप्रकरणं आणि मग अचानक झालेला अकाली, रहस्यमय मृत्यू.
या सगळ्यात जी अमृता आहे आणि या सगळ्याच्याही पलिकडे जी अमृता आहे तिच्याबद्दल मला लिहायचं आहे.

नेमकं काय आणि कसं रिऎक्ट व्हायचं, तिच्या व्यक्तिमत्वातल्या नेमक्या कोणत्या पैलूला स्पर्श करायचा याचा गोंधळ अनेकांच्या मनात राहिला यात नवल नाहीच.
अनेक दंतकथा, आरोप, अफ़वा, रहस्यांच्या थराखाली गाडल्या गेलेल्या ख-या अमृताला नेमकी कशी शोधायची?
Continued...


1 comment: