Friday, May 4, 2018

Re-unveiling Kolte


एप्रिल महिन्यातल्या दुपारी, तळपत्या उन्हात माझगावच्या नाईनफ़िश आर्ट गॅलरीत पोचले. प्रभाकर कोलतेंचं चित्रप्रदर्शन पहायला.

पुराण्या द न्यू ग्रेट इस्टर्न मिलचं भग्न आवार. समोर काही तरी प्रचंड बांधकाम चालू आहे. अवाढव्य टॉवर किंवा (अजून) एखादा मॉल असू शकेल. माहित नाही. गेल्या काही वर्षांमधे या परिसराचा भौगोलिक, सामाजिक, सांस्कृतिक नकाशा आमुलाग्र बदलला आहे. कुरुपतेत अजून एखादी भर.
जुन्या मिलचे शिल्लक अवशेष बांधकामाच्या जागे पलीकडे अजूनही दिसत असतात. 
सरळ आत चालून गेल्यावर जुनी, उंच, हिरवी झाडं, एका बैठ्या, आडव्या चाळीत लाकडी फ़र्निचर बनवण्याचं काम चालू आहे. लांब पडकी भिंत.. त्यावर नाईन फ़िश आर्ट गॅलरीत चालू असलेल्या 
“Re-unveiling Kolte” या चित्रकार प्रभाकर कोलतेंच्या रेट्रोस्पेक्टीव सदृश चित्र-प्रदर्शनाचा फ़लक.


गॅलरी कलात्मक आहे. पुराण्या बांधकामाचा मुळ स्वरुपातच रिस्टोर केलेला काही भाग. दगडी कमान, विटांच्या भिंतीचा गिलावा ढासळलेला ओबडधोबडपणा, भिंतीला दुभंगत छतावर विस्तारत गेलेलं वडाचं जीर्ण खोड, पारंब्या भिंतीतच गोठलेल्या, उंच छत, शिसवी खिडक्या आणि हेरिटेज टाइल्स.. 
आणि या सगळ्या वातावरणाचाच अविभाज्य भाग वाटावा अशी भिंतीवरची कोलतेंची पेंटींग्ज. बरीचशी जुनी, काही नवी, अनेक पाहिलेली, कलेटर्सच्या खाजगी संग्रहात असल्याने कधीच न पाहिलेली अशी एकुण ७२ पेंटींग्ज.




वेगवेगळ्या कालखंडातली ही पेंटींग्ज आहेत. त्यात सुरुवातीची प्रयोगशील, गुरु पळशीकरांच्या आग्रहाखातर केलेली पोर्ट्रेट्स, अमूर्ततेकडे वाटचाल करणारी, क्लीच्या प्रभावकाळातली, त्यातून बाहेर पडून त्यांनी केलेला स्वत:चा स्वतंत्र, वैशिष्ट्यपूर्ण चित्रप्रवास, त्यातले पेस्टल्स, ऑइल्स, वॉटरकलर्स, ऎक्रिलिक, मल्टिमिडिया अशा माध्यमांचेही वेगवेगळे टप्पे.. आणि मग अलीकडची चायनीज काळ्या शाईत केलेली मिनिमलिस्ट पेंटींग्ज..

प्रत्येक पेंटींगची स्वत:ची अशी एक गोष्ट आहे जी कोलतेंना आजही तपशिलवार आठवते. त्या ऐकत असताना एकत्रितपणे आपल्या ध्यानात येणारी एकच गोष्ट, ती म्हणजे- कलाकाराचे आपल्या कलाकृतींमधे आत्मियतेनं गुंतलेले असणे.  
एका पोर्ट्रेटसमोर चित्रकार सातवळेकर बराच वेळ उभे राहिले आणि मग - “मलाही असं काम करता यायचं नाही” असे उद्गार त्यांनी काढले, ही आठवण कोलते सार्थ अभिमानाने सांगत असतात तेव्हा सातवळेकरांचे चित्रासमोर उभे असणे, उमेदीच्या काळातल्या, तरुण कोलतेंची त्यांच्यावर खिळलेली अपेक्षापूर्ण नजर आपल्याला आजही जाणवते.
कोलतेंसोबत चित्र पहाण्यात हाच मोठा आनंद आहे. चित्र, चित्रनिर्मितीची प्रक्रिया, आजचं-कालचं चित्रकला जगत, सिनियर्सच्या आठवणी, समकालिनांबद्दलची मते, विद्यार्थी.. कोलते या सगळ्यावर भरभरुन, आपुलकीने आणि परखडपणे बोलतात. हातचं काहीही न राखता.
यावेळी त्यांच्या बोलण्यात सतत येणारा एक महत्वाचा विषय म्हणजे ते उभारत असलेली निवासी, गुरुकुल संकल्पनेवर आधारित कला-शाळा. जिथे कलेत रस असणा-या कोणालाही, कोणीही प्रत्यक्ष न शिकवता कला शिकता येईल.   

अशा रेट्रोस्पेक्टीव सदृश प्रदर्शनातली एक छान गोष्ट म्हणजे आपल्याला त्या चित्रकाराचा सुरुवातीपासूनचा प्रवास एकत्र पहाता येतो. कुठून सुरुवात झाली, कुठे पोहोचले यापेक्षा वाटेतले टप्पे, वळणं जास्त मनोरम असतात.

कोलतेंना हे आता एकत्र, अंतरावरुन बघताना काय वाटतं?
“समाधान वाटतं. जिथे पोचायचं होतं त्याच्या जवळपास पोचू शकलो याचा.” ते अंगभुत साधेपणाने उत्तर देतात.
कोलतेंनी पेंटींग्जमधे वस्तुंचा वापर सुरु केला तो साधारण २००७/०९ या काळात. मला वैयक्तिकदृष्ट्या ही पेंटींग्ज फ़ार आकर्षक वाटतात. जुन्या, मोडलेल्या ब्रशचा भाग, पॅलेटचे तुकडे, इझलमागे लावलेले लाकडी पाचरांचे तुकडे.. चित्रकलेच्या पर्यावरणाचेच हे भाग, त्यामुळे कोलतेंनी त्यांना आपल्या पेंटींगमधे दिलेलं स्थान मला अतिशय नैसर्गिक, आवश्यक वाटतं.
रंगवताना सुकलेल्या बशांचं एकत्रितपणे केलेलं एक इन्स्टॉलेशन एका भिंतीवर आहे. चित्रांचे त्या त्या वेळी मागे उरलेले रंगीत अवशेष. पेंटींगच्या पूर्णत्वाच्या प्रवासातले हे थांबेच एकप्रकारे. त्याच छटा, रंग, टेक्स्चर्स त्यांच्यातही आहे. पेंटींग्ज ज्यातून जन्मली ती भूमी या लहान बशांमधे सामावलेली वाटते.
कोलतेंनी ऑइल पिगमेंट्सची ऎलर्जी निर्माण झाल्याने पेस्टल्स, वॉटर कलर्स माध्यमांमधे, पुढे ऎक्रिलिकशी दोस्ती होईपर्यंतच्या काळात बरंच काम केलं. २६ जुलैच्या महाप्रलयात त्यातलं जवळपास सगळं नष्ट झालं, उरलेलं, मोजकं काम प्रदर्शनात लावलं आहे, जे केवळ अप्रतिम आहे. वाहून गेलेल्या कामाबद्दल त्यांना वाटते तितकिच खंत अशावेळी आपल्यालाही वाटते.



कोलतेंची पेंटींग्जमधला अवकाश झाकून टाकणा-या रंगाचा दाट झोत.. तो कधी जादूभरा लाल, कधी अथांग निळा राखाडी, गर्द हिरवा किंवा गढूळ तपकिरी, त्यातून झिरपणारे रंगांचे ओघळ आणि वरच्या रंगाच्या दाट आवरणातूनही आपले स्वतंत्र अस्तित्त्व दाखवणा-या वस्तु, अधलेमधले आश्वासक प्रकाशमान झरोके.. रंगाचा झोत आसमंताला झाकोळून टाकत नाही, त्यात गुदमर नाही, खुलेपणा आहे. हा दाट रंग कवेत घेतो, पर्यावरणाचाच एक भाग आहे तो, त्यातल्या बाकीच्या घटकांना आपली जागा, अस्तित्त्व अबाधित ठेवण्याची मुभा देतो.
स्मृतीच्या अवकाशात तरंगणा-या गोष्टींना, घटनांना त्यांचे अस्तित्त्व वेगळेपणाने दाखवण्याची ही संधी आहे, त्यांना रंगाच्या आवरणाखाली पुसून टाकायचा हा प्रयत्न नाही.
त्यांची पेंटींग्ज बघताना मनात उमटणारे विचार थेट त्यांच्याशीच बोलून दाखवायची मिळालेली संधी मी अजिबात गमावणार नसतेच.
कोलतेंच्या मते कॅनव्हाससमोर उभं राहिल्यावर त्या क्षणी मनात असलेल्या रंगाचा अवकाशातल्या इतर घटकांशी चाललेला संवाद कॅनव्हासवर प्रतिबिंबित होतो. निसर्गाचा, संपूर्ण पर्यावरणाचा हा एक सम्यक विचार त्यात असू शकतो, मात्र मी पेंटींग करत असताना त्यात रंग सोडून इतर कोणताही विचार वेगळेपणाने नसतो. माझा रंगांसोबतचा संवाद बघणा-यापर्यंत वेगळ्या त-हेने पोचू शकतोच, त्यांचाही एक स्वतंत्र संवाद असू शकतो, नव्हे असायलाच हवा. पेंटींगची खरी गंमत त्यातच आहे.

रंगवताना केवळ रंगांच्याच भाषेत विचार करणारा हा चित्रकार आहे. त्याबाबतीतले त्यांचे विचार स्पष्ट आणि ठाम आहेत. “रंगवताना रंगाव्यतिरिक्त डोक्यात अन्य कसल्याही विचारांची, शब्दांची भेसळ असता कामा नये. तसं झालं तर जे बनेल ते ’पेंटींग’ नाही, ते ’इलस्ट्रेशन’.” कोलते सांगतात. “शब्दांमधेच विचार करायचा असेल तर कविता करता येऊ शकते, चित्र नाही.”
कोलते स्वत: कविताही छान करतात. अगदी पूर्वीपासून. गॅलरीत आत शिरल्या शिरल्याच त्यांनी त्यांच्या कवितांचं एक छोटेखानी पुस्तक हातात ठेवलेलं असतं. शाळकरी वयातली रंग, आकारांकडे बघायची नजर, तिचे ’घडत’ जाणे, पुढे चित्रकला शिकताना त्या नकळत रुजलेल्या जाणीवांचा विचार कसा महत्वाचा ठरतो हे एका कवितेत फ़ार सुंदररित्या मांडले आहे. प्रत्येकच कविता, विशेषत: कलेमधे काही करु पहाणा-या, आस्था असणा-यांनी वाचायलाच हवी अशी.

काही चित्रं पाहून संपत नाहीत. नंतरही पुन्हा पुन्हा ती आपल्याला स्वत:कडे खेचत रहातात. आपल्या मनात या चित्रांशी संवाद जागा रहातो. दर वेळी बघताना काहीतरी सुटून गेल्यासारखं वाटतं, ते नेमकं काय हे शोधण्याकरता पुन्हा त्याकडे वळायलाच लागतं. आणि मग त्यात काहीतरी नविन दिसतं. अशी चित्रं पाहून झाल्यावरही मनात शिल्लक रहातात.
कोलतेंची चित्रं त्यापैकी आहेत. खूप काही घडत असतं त्यांच्या चित्रांमधे, जे त्या मर्यादित कॅनव्हासच्या चौकटीत मावत नाही, ते बाहेर जातं आणि बाहेरुनही बरंच काही त्या चौकटीत प्रवेशत असतं.
पण मग चित्रकाराचं काय? त्याचं सांगणं त्या चित्रापुरतंच असतं का? बहुधा नाही.
आधीच्या चित्रातल्या संवादाचे शिल्लक अवशेषं पुढच्या चित्रात, तिथून पुढच्यात. एकमेकात गुंफ़लेल्या कड्यांसारखी ही मालिका निरंतर चालत रहाणारी. चित्र काढणा-याच्या आणि ते पहाणा-याच्या मनातल्या संवादाची जातकुळी एक असायची गरजच नाही. संवाद काय आहे महत्वाचं नाहीच, तो असणं महत्वाचं. गायतोंडे, बरवे, पदमसी, सबावाला, रामकुमार, क्रिशन खन्ना, तैयब, अंजोली यांच्या मांदियाळीतलीच ही चित्रे.. म्हणूनच मला आपली वाटतात.

प्रभाकर कोलतेंची चित्रं मनाला शांत करत नाहीत. त्यातलं घडामोडी तुम्हाला गुंतवून ठेवतात. रंगाच्या झाकोळाला एक अंगभूत वेग आहे, त्यातल्या फ़टी, झरोक्यांतून तो वहातो, त्यातून एक लय निर्माण होते जी तुम्हाला व्यग्र ठेवते. कोलतेंची चित्र तुम्हाला जागृत ठेवतात.
गायतोंडेंची चित्रं रंगाच्या संथ प्रवाहावर आपण निश्चलपणे तरंगत असताना अचानक एक खोल डुबकी मारायला लावतात. एका अदृश्य भोव-यात गुंगून आपण आत आत जात रहातो. ज्या नेमक्या क्षणी आपण आत खेचले गेलो, तो क्षण आपल्याला अचूक जाणवतो, त्या बिंदूवर मन स्थिरावतं. शांत होतं. खोलवर, अथांग निरव अवकाशात पोचल्यावर काही तरी कळेल, चित्रातलं, स्वत:तलं, या आशेतून आलेलं ते स्थिरावणं असतं.
कोलतेंच्या चित्रात हा बिंदू गवसत नाही, तुम्हाला त्यात स्थिरावता येत नाही. चित्र बघताना आणि बघून झाल्यावरही मनात शिल्लक रहाते ती फ़क्त अस्वस्थता. कोलतेंच्या चित्रांचं ते वैशिष्ट्यच असावं. न्यू ग्रेट इस्टर्न मिलच्या भग्न अवशेषांना पार करुन आत जाताना मनात अस्वस्थता होती, कोलतेंची चित्र पाहून बाहेर पडतानाही ती होतीच. दोन्हींची जातकुळी संपूर्णपणे भिन्न. 
आधुनिकतेच्या रेट्याखाली बदलून गेलेला सामाजिक, सांस्कृतिक माहोल आणि रंगांच्या पडद्याखालूनही स्वत:च्या स्वतंत्र अस्तित्त्वाने प्रकाशमान होत वर आलेले कोलतेंच्या पेंटींग्जमधले जग.. पुन्हा पुन्हा स्वत:कडे परतून यायला भाग पाडणारे.    






  

6 comments:

  1. सुरेख वर्णन आणि विश्लेषण. वाचून प्रदर्शन पाहावेसे वाटले

    ReplyDelete
  2. खूप संवेदनशील,सुंदर आणि प्रत्ययकारी लेखन

    ReplyDelete
  3. फार छान लिहिलेत। तुमचा लेख वाचून प्रदर्शन बघायची नवी दृष्टी मिळते

    ReplyDelete
  4. सुरेख, लेखन आणि photos. Few months back he was here ( at Jalgaon), was fortunate to hear him.

    ReplyDelete
  5. चित्रकलेविषयी असं सकस लेखन नियमीत व्हायला हवं.

    ReplyDelete