Saturday, April 14, 2018

लाल भी उदास हो सकता है..

९४ वर्षांचे चित्रकार राम कुमार गेल्याची बातमी आज वाचली तेव्हा अमित दत्तांची त्यांच्यावर काढलेली शॉर्ट फ़िल्म आठवली- “लाल भी उदास हो सकता है..”
हिमाचलमधल्या छोट्या, एकांत गावातले त्यांचे ते दाट वृक्षराजीने वेढलेले लहानसे लाकडी घर, त्यावरच्या हिरव्या, काळ्या सावल्या, झाडांवरची लाल फ़ळं खाणारी पाखरं.. त्यांचा आवाज हीच फ़क्त जाग. बाकी अत्यंत निरव परिसर. घराच्या आतमधे वृद्ध राम कुमार इझलवर लावलेल्या भल्यामोठ्या कॅनव्हासवर बारकाईने, एकाग्र होऊन रंगवत आहेत, रंगांची लालसर काळी, गडद हिरवी वळणे.. त्यांच्या हातातला ब्रश किंचित थरथरतो मधेच, पण काय रंगवायचे हे निश्चित ठाऊक असल्यासारखा पुन्हा स्थिरावत पुढे जातो.
अशी नेमकी कोणती प्रेरणा असते कलावंताच्या मनात जी आयुष्याच्या आपल्या अखेरच्या दशकातही इतक्या ठामपणे त्याला त्याच्या कलेशी जोडून ठेवते?
या आकारांमधून आता नेमके काय सुचवायचे असेल, शोधायचे राहिले असेल अजूनही, काय आपल्यापर्यंत पोचवायचे आहे या वृद्ध चित्रकाराला.. पिवळा, मग त्यावर हिरव्याचा थर, फ़िक्कट क्रिम, अर्धपारदर्शी निळा, पांढरा..



साठहून अधिक काळ राम कुमार शांतपणे रंगवत राहिले. आणि आता निघून गेले, तितक्याच शांततेत.

रामकुमारांचे रंग निसर्गातले होते तसेच ते पुरातन जगातलेही होते. बनारस चित्रमालिकेतल्या घाटावरच्या घरांच्या जीर्ण लाल भिंती, कमानिंवरचा शेवाळी हिरवट थर, ढगाळ आकाशातले राखाडी, पिवळसर रंग या ऐतिहासिक शहराच्या पुरातनतेत भर घालणारे. मात्र त्यांच्या कॅनव्हासवरच्या निसर्गाचा रंग ताजा, टवटवीत होता. त्यांचा निळा, दुधट आकाशी रंग.. गंगेच्या पाण्याचा, ढगांआडच्या नभाचा कायम चिरतरुण भासणारा.




चाळीसच्या दशकातल्या प्रोग्रेसिव्ह आर्टिस्ट्सच्या मांदियाळीतले, हुसेन, गायतोंडे, रझा यांच्या पंक्तित आपला वेगळा ठसा उमटवणारे राम कुमार.

राम कुमारांची पेंटींग्ज मला जवळची वाटली कायमच. कारण ती मला माझ्या प्रवासांचे आल्बम्स वाटतात. हिमालययातल्या पहाडांवर ट्रेक्स करताना दिसलेला बर्फ़निळा ग्लेशियर, दगडगोट्यांवरुन वहात येणारे खळाळते झरे, तलाव, देवदारांची काळसर हिरवी दाटी.. आणि कांगराच्या शतकांपूर्वीच्या किल्ल्यांवच्या ढासळत्या कमानींचा तपकिरी लाल काळा रंग त्यांच्या पेंटींग्जमधेही होता. हिमालय, कांगरा आणि बनारस.. राम कुमारांच्या ऎब्स्ट्रॆक्ट लॅन्डस्केप पेंटिंग्जमधून दिसणारा निसर्गाचा रौद्र, मनोरम आविष्कार, कालातिततेच्या खूणा पुन्हा पुन्हा निरखून पहाव्याशा वाटल्या.

शिमल्याला जन्मलेल्या, तिथेच शालेय शिक्षण पूर्ण केलेल्या राम कुमारांना रंगांचे जितके वेड तितकेच साहित्याचेही. वाचन, भरपूर वाचन आणि जंग्लातल्या पायवाटांवरुन फ़िरत स्केचिंग करणे हाच दिनक्रम. राम कुमारांनीही लिहिलं, कविता, निबंध असं काही काही. पण साहित्यिक म्हणून नाव मिळवलं त्यांच्या धाकट्या भावाने ’निर्मल कुमार’ याने. राम कुमार जास्त रमले कॅनव्हास आणि रंगांमधेच. मात्र साहित्याच्या आवडीतूनच त्यांना त्यांच्या चित्रकलेची दिशा मिळाली. शरत चंद्रांच्या कादंबरीत त्यांनी ’काशी’ या पौराणिक, पवित्र शहराबद्दल जे वाचले ते त्यांच्या मनात खोलवर रुतले. कधीतरी जायचेच इथे असं त्यांनी ठरवलं. पुढे पावलं वळली परदेशात. ते पॅरिसला राहिले, शिकले, तिथे त्यांच्या चित्रकलेचं भरपूर कौतुक झालं, प्रदर्शनं झाली, तिथेच ते राहिलेही असते अजून, कदाचित कायमचे.

पण मग मनात रुतलेल्या ’काशी’ ची साद त्यांनी ऐकली आणि एक मोठा प्रवास करुन ते पोचले बनारसला.

त्यानंतर मग सगळं बदलूनच गेलं. या प्राचीन शहरात आल्यावर राम कुमार आणि त्यांची चित्रकला दोन्हीत मुलभूत बदल झाले. इथली गर्दी, गजबज, रंग.. काशीच्या पहिल्या भेटीच्या वेळी राम कुमारांसोबत हुसेन होते. दोघंही घाटा घाटांवर भटकायचे दिवस-रात्र. मात्र दोघांचीही बघण्याची नजर वेगवेगळी. त्यांनी त्या एकाच वेळी केलेल्या स्केचेसमधून ही भिन्न नजर स्पष्टपणे लक्षात येते. राम कुमारांवर बनारसच्या या भेटीचा जो प्रभाव पडला तो केवळ दृश्यात्मक नव्हता. राम कुमार, त्यांची विचारधारा, चित्रकलेकडे पहायची दृष्टी, त्यांच्या रंगांचं पॅलेट या सगळ्यातच अंतर्बाह्य, मुलभूत बदल झाला.




राम कुमार त्यानंतर बनारसला पुन्हा गेले, जातच राहिले. ’बनारस’ हे शहर राम कुमारांनी पुन्हा पुन्हा रंगवलं. आधीच्या फ़िगरेटीव कालखंडात बनारसचे घाट, नदीचे प्रवाह, काठावरची घरे, घरांच्या खिडक्या स्पष्ट रेखाकृतींतून रंगवल्या, नंतर मग त्यांनी या रेषांचाही त्याग केला. बनारसला गंगेच्या वाहत्या प्रवाहात त्यांनी त्या रेषा सोडून दिल्या. मग त्यांच्या आयुष्यात उरले ते रंग, फ़क्त रंग. रंगांमधून उमटलेले अमूर्त आकार.

त्या आकारांतून आपल्याला तो उलटणारा काळ, त्याचे परिवर्तन, पुढे जाणे जाणवत रहाते. काळाच्या तुकड्यांमधून निसर्गाचे सतत बदलणारे रुप, त्याची रौद्रभिषणता, विनाश आणि मग पुन्हा उमटलेली कोवळी हिरवी पावले. राम कुमार हे कालचक्र नित्यनिरंतर आपल्या कॅनव्हासवर चितारत राहिले. त्यांच्या मते-

“पेटींग ख-या अर्थाने कधीच संपलेलं नसतं. तुम्हाला जे सांगायचं आहे ते एका पेंटींगमधून कधीच संपत नाही. ती एक सातत्याने चाललेली प्रक्रिया असते. स्वत:शी असलेला संवाद असतो. कॅनव्हासवर रिते झाल्यानंतरही मनात रंगांची, आकारांची उलथापालथ चालुच रहाते. मग पुढच्या कॅनव्हासवर कधी ती उमटते, कधी आतच रहाते.”   



राम कुमारांची पेंटींग्ज ऎबस्ट्रॆक्ट असली तरी ती गहन, गूढ, अनाकलनीय नाहीत. त्यांच्या पेंटींग्जचे अर्थ लावायचा प्रयत्न करायलाच लागत नाही. आपल्या मनातल्या अनेक प्रतिमा तिथे प्रतिबिंबासारख्या उमटलेल्या असतात. घनगर्द जंगल्यातल्या वाटा चालून जात असताना दिसलेले खडक, द-या, वृक्षांच्या दटीतून ओघळलेले उन्हाचे कवडसे, वादळांच्या खूणा, नदीला आलेले पूर, बर्फ़ाळ हिमालयांची शिखरं, उतारावरुन वाहून गेलेल्या ग्लेशियर्सच्या खूणा, देवदारांचे तांबूस, सोनेरी शेंडे, निळ्या धुक्यांनी भरलेल्या वाटा.. हे एका बाजूला आणि दुस-या बाजूला एखाद्या पुरातन नगरातल्या उध्वस्त खूणा, पडक्या कमानी, शेवाळलेले खांब, भग्न पाय-या..

आपआपल्या अंतर्मनाचे पडसाद प्रत्येकाने ओळखायचे. इथे विध्वंसही आहे आणि पुनर्जन्मही. भीषणता आहे आणि कोवळीकही, पुरातन विश्व आहे आणि आधुनिक दिव्यांची उघडमिटही.

राम कुमारांच्या चित्रांमधे त्यांच्या बालपणातल्या शिमल्याच्या आठवणी, माणसे, नातेवाईक, रस्ते, घरे, जंगले, तारुण्यात केलेले परदेश प्रवास, बनारसचे घाट, गल्ल्या, प्रौढ वयात जिथे राहिले ती ऐतिहासिक दिल्ली, तिथले घुमट, कबरी, कमानी आणि मग पुन्हा हिमाचल प्रदेशात परतून आल्यावरचा एकांत, एकटेपणाच्या खूणा सगळं स्पष्टतेनं उमटलेलं आहे.. त्यात कधी उदासी आहे, कधी सखोल समजूत, आठवणी आहेत, वर्तमान आहे, उत्साह आहे आणि नैराश्यही.

राम कुमार स्वत:ला अखेरपर्यंत शोधत राहिले आणि आपला शोध कॅनव्हासवर उमटवत राहिले. बघणा-यांना त्यातूनच आपल्या स्वत:च्या स्थित्यंतरांच्या पाऊलखूणा मिळतील कदाचित.

4 comments: