Friday, April 21, 2017

मुंबईची प्राचिन कविता-सीएसटी स्टेशन

छत्रपती शिवाजी टर्मिनस किंवा सीएसटी स्टेशन, म्हणजेच एकेकाळचं व्हिक्टोरिया टर्मिनस किंवा व्हिटी स्टेशन. आपल्या आधीच्या पिढीने याचा उल्लेख कायमच ’बोरी बंदर’ म्हणून केला.
या हेरिटेज इमारतीची भव्यता, देखणेपण, आकाशात उंचावर विराजमान झालेला डौलदार घुमट, इमारतीचं आगळं वास्तुवैभव ज्याने मान उंचावून कौतुकाने अनेकदा नजरेत भरुन घेतलेलं नाही असा मुंबईकरच विरळा. लोकलमधून उतरल्यावर कितीही गर्दी आजूबाजूला असो, स्थानिक मुंबईकराला प्लॅटफ़ॉर्मवर पाय ठेवताना आणि मुंबईत बाहेरुन येणा-या कोणत्याही पर्यटकाला डी. एन. रोडवर आल्यावर पहिल्यांदा जाणीव होते ती या इमारतीच्या भव्यतेचीच.


जुन्या काळातील जी.आय.पी. रेल्वे, म्हणजेच आताच्या सेन्ट्रल रेल्वेचं मुख्यालय असलेली ही इमारत फ़्रेडरिक विल्यम स्टीव्हन्स या प्रख्यात वास्तुविशारदाने डीझाईन केली. त्याचीच आणखी एक, पण पूर्ण वेगळ्या शैलीत डीझाईन केलेली इमारत समोरच आहे, ती म्हणजे महानगर पालिकेच्या मुख्यालयाची.

डिसेंबर २०१२ ला सीएसटी स्टेशनाच्या इमारतीचा जो भाग हेरिटेज म्हणून घोषित झाला आहे त्याची गाईडेड टूर भारतीय रेल्वे प्रशासनातर्फ़े सुरु झाली आणि या इमारतीच्या आगळ्या वास्तुवैभवाचे ज्यांना आकर्षण आणि कुतूहल होते,  त्यांना त्याची जवळून, तपशिलात ओळख करुन घेण्याची संधी मिळाली.  

मध्य रेल्वेच्या मुख्यालयाची इमारत सीएसटी स्टेशनालगतच उजव्या बाजूला आहे. एका लहान प्रवेशद्वारातून आत जात असताना आपण एका जगप्रसिद्ध हेरिटेज इमारतीत प्रवेश करतो आहोत असं अजिबातच जाणवत नाही. आजूबाजूला फ़ोर्टमधला नेहमीचा मानवी कोलाहल भरुन असतो आणि फ़ूटपाथवर मुंबईत दुपारी नेहमीच असणारा लखलखीत प्रकाश सांडून असतो.
आपण आत पाय ठेवतो तो पॅसेज काहीसा अंधारा आणि बराचसा जुनाट. एक मुलगी येते आणि आपल्याला हातातल्या बॅगा-पिशव्या तिथल्या एका बहुधा ब्रिटिशकालीन धूळभरल्या लाकडी मांडणीवर ठेवायची विनंती करते. आपण साशंकतेनच तिचं म्हणणं ऐकतो. ती मुलगी आपली ’टूर गाईड’ असते.
इमारतीत शांतता भरुन असते. मध्य रेल्वेत काम करणा-या बाबू लोकांची वर्दळ बहुधा पॅसेजमधल्या मोठमोठ्या लाकडी दरवाजांआड बंदिस्त असावी.


त्या दरवाजांचं कोरीव काम, पॅसेजला समांतर असणारा इमारतीच्या आवारातला किरकोळ बगीचा, पॅसेजमधे ठेवलेली जुन्या वाफ़ेच्या इंजिनाची मॉडेल वगैरे मागे टाकत आम्ही पुढे चालत रहातो. समोर प्रशस्त, लाकडी कोरीव नक्षीकामाचा दरवाजा संगमरवरी शिल्पाच्या घडीव स्तंभात बसवलेला दिसतो. त्यातून आपण आतल्या हॉलसारख्या मोकळ्या भागात येतो. पुढे वळसेदार प्रशस्त दगडी जिना दिसतो आहे, एक पुतळाही. तिकडे लक्ष असतानाच गाईड मुलगी अचानक सांगते की ’वर बघा’ आम्ही बघतो.
आणि वर बघत असतानाच वासलेला आमचा ’आ’ मग बराच वेळ तसाच रहातो.


अद्वितिय वास्तुसौंदर्याचा नमुना वर अनेक फ़ूटांवरच्या उंच पोकळीतून आमच्याकडे पहात असतो. सीएसटी इमारतीच्या अंतर्भागातील मध्यवर्ती घुमटाखाली आम्ही उभे असतो आणि भर दुपारच्या मुंबईतला लख्ख सोनेरी प्रकाश त्या अप्रतिम नक्षीदार, भव्य घुमटाच्या भोवती लावलेल्या पारदर्शक, रंगीत काचांमधून आमच्यावर पाझरत असतो.
इमारतीच्या इंडो-सारसेनिक वास्तुकलेतलं वैभवी सौंदर्य न्याहाळण्याकरता आपली पावलं आपसुक समोरच्या जिन्याकडे वळतातच.
जिन्याच्या दगडी पाय-या भिंतीत बसवलेल्या आणि त्या बाहेरच्या बाजूला साडे आठ फ़ूट अधांतरी आहेत.
प्रत्येक पायरी प्रशस्त, रुंद. जिन्याचे सोनेरी कोरीवकामाने झळाळणारे घडीव, लोखंडी कठडे, बाजूच्या भिंती निळसर, तपकिरी ग्रॅनाईटच्या. कोनांमधे, भिंतींच्या झरोक्यांमधे कौशल्याने बसवलेल्या स्टेन ग्लासेसचे रंगिबेरंगी कवडसे.. नजरेची तयारीच नव्हती हे डोळे दिपवून टाकणारं सौंदर्य बघायची.
लाखो लोकांच्या रोजच्या कोलाहकालमधे सदैव बुडालेली, आपणही त्या कोलाहलाचाच एक भाग असतो आणि त्याच इमारतीच्या पोटात हे सौंदर्य दडवलेले आहे हे मग हळू हळू आपण स्विकारतो आणि त्या दगडी जिन्यांवरुन घुमटाच्या जवळ जाण्याकरता एक एक पायरी चढायला लागतो.
बाजूच्या भिंतीवर भारतीय रेल्वेच्या जडणघडणीला कारणीभूत असणा-याचे कृष्णधवल, सेपिया फोटो, भारतातील महत्वाच्या रेल्वे जंक्शन्सची शतकांपूर्वीची आता निवांत वाटणारी त्या फोटोंमधली दृष्ये.. जुनं बोरीबंदर स्टेशन कसं होतं, तेव्हाची सिग्नल व्यवस्था कशी होती, पूर्विच्या ग्रेट इंडियन पेनिन्सुला रेल्वे म्हणजेच जीआयपीआरच्या काही प्रतिकृती.. रेल्वे गाडीच्या खिडकीतून बाहेर डोकावून पहातो आहोत आपण आणि नजरेसमोरुन शतकभरापूर्वीचा काळ संथगतीने मागे सरकत रहातो आहे असं वाटत रहातं तो जिना चढत असताना.

इ.स. १८६१ साली त्यावेळच्या मुंबई सरकारने एलफ़िन्स्टन लॅन्ड प्रेस कंपनीसोबत करार करुन ’मोदी-बे’ नावाने ओळखल्या जाणा-या मुंबई बेटावरच्या एका भागात भराव घालून त्यातल्या दोन तृतियांश परिसरात जमीन उभारण्याचे काम सुरु केले. यातील शंभर एकर जागेवर नवे भव्य रेल्वे स्टेशन बांधायचे ठरले. इंग्लंडमधे मनाजोगती डिझाइन्स मिळाली नाहीत म्हणून मग जी.आय.पी.च्या संचालकांनी मुंबई सरकारच्या पी.डब्लू.डी. खात्यातील वास्तुविशारद फ़्रेडरिक विल्यन स्टीव्हन्स यांच्यावर टर्मिनसचे डिझाईन करण्याची कामगिरी सोपवण्यात आली.

टर्मिनसच्या इमारतीचे काम मे १८७८ रोजी सुरु झाले आणि पूर्ण व्हायला दहा वर्षे लागली. मुख्यालयाच्या इमारत बांधणीवर रु सोळा लाख तीस हजार खर्च झाले तर रु. दहा लाख स्टेशनाच्या उभारणीकरता लागले. काम पूर्ण झाले तेव्हा स्टीव्हन्सना त्यांच्या उत्कृष्ट कामगिरीबद्दल ठरलेल्या मोबदल्या व्यतिरिक्त रु. पाच हजार बोनस म्हणून देण्यात आले. या वास्तुची डिझाइन्स कतुकाने लंडनला रॉयल अकेडमीमधे १८८१ साली प्रदर्शित करण्यात आली. फ़्रेडरिक स्टीव्हन्स यांना या प्रकल्पाच्या कामात श्री. सीताराम खंडेराव वैद्य यांचे बहुमोल साहाय्य होते. वैद्य हे साहाय्यक इंजिनियर होते. सुपरवायझर होते श्री. एम. एम. जनार्दन.

माहिती वाचत आपण तो दगडी, लयबद्ध वळणाचा जिना चढून दुस-या मजल्यावर येतो आणि त्यापेक्षा वर चढून जायला परवानगी नसल्याचे समजते. वर घुमटापर्यंत जाता येणार नाही म्हणून मन खट्टू होते पण क्षणभरच.
दुस-या मजल्यावरच्या सज्जामधूनही तो घुमट अगदी कवेत घेता येण्याइतका जवळ दिसत असतो.
घुमटाला आठ हात (रीब्ज) आहेत आणि त्याच्या बाहेरच्या बाजूने अप्रतिम कोरीवकाम आहे. सज्जाला अनेक खिडक्या आहेत, प्रत्येकीच्या तावदानावर स्टेन्ड ग्लास पद्धतीने ’जीआयपी’ असा कंपनीचा मोनोग्राम रंगवलेला. खिडक्यांमधून बाहेर डोकावलं की विविध कोनांमधून हे कोरिव नक्षीकाम, शिल्प दिसतात. त्यात वैशिष्ट्यपूर्ण वाटतात प्राण्यांचे नक्षीदार, दगडी मुखवटे.
इमारतीच्या बाह्य सुशोभीकरणात वापरलेल्या शिल्पाकृतींचे डिझाईन-मॉडेल्स जे. जे. स्कूल ऑफ़ आर्टचे विद्यार्थी आणि श्री. गोमेझ यांनी आर्ट स्कूलचे प्राचार्य श्री. ग्रिफ़िथ यांच्या मार्गदर्शनाखाली तयार केले. प्रत्यक्ष घडाई इथल्या स्थानिक कारागिरांकडूनच करुन घेण्यात आली. या माहितीचे विशेष कौतुक वाटते कारण घडाई बेहद्द सुंदर आहे.
अजून एक वैशिष्ट्यपूर्ण गोष्ट म्हणजे खिडक्यांच्या तावदानांवर, तसेच घुमटाच्या तळाशी केलेले काचेवरचे विलोभनीय रंगकाम. जगातल्या काही अप्रतिम हेरिटेज स्टेन ग्लास डिझाईन्सपैकी हे एक आहे. वेटींग हॉलमधेही अनेक पेंटींग्ज आहेत. ’सिनॉर गिबेलो’ यांना या सजावटीचे श्रेय जाते.


संगमरवरी सजावटीचे चांदई कोपरे, घडीव पाषाणातले मनोरे, डौलदार घुमट, बाह्य भागावरची देखणी शिल्पे, खालच्या प्रवेश मंडपापासून ते वरच्या घुमटाच्या कळसापर्यंत पाहात-पाहात नजर पाव मैल अंतर तरी या दिमाखदार दर्शनी भागावरुन फ़िरत रहाते. अतिशय सफ़ाईदारपणे काटेकोर आखणी करुन बसवलेली गवाक्षे, त्यांची रंगीत तावदाने, भिंतीवर केलेले नक्षीकाम, अनेक सज्जे, त्यांचे आधार, कमानी सगळंच अपूर्व कलाकुसरीने नटलेले.
घुमटावर प्रगतीचे चिन्ह म्हणून एका भव्य मूर्तीचे शिल्प आहे. खालच्या प्रत्येक चांदईवर (गेबल्स) कृषी, अभियांत्रिकी, उद्योग, व्यापार इत्यादिंची प्रतिके असलेली वेगवेगळी शिल्पे आहेत. पश्चिमेकडील मुख्य प्रवेश एका भव्य लोखंडी गेटमधून आहे, त्यावर दोन्ही बाजूंच्या स्तंभावर ब्रिटिश साम्राज्याचा प्रतिनिधी सिंह आणि भारताचे प्रतिनिधित्व करणारा झेप घेण्याच्या पवित्र्यातला वाघ आहे.

या राजेशाही घुमटाची भव्यता मोबाईल फोनच्या स्क्रीनवर मावण्यासारखी नाही हे लगेच कळतं आपल्याला आणि मग तो फोटो काढण्याचा व्यर्थ खटाटोप टाळून आपण सज्ज्यातून खाली डोकावतो. मगाशी खालून वर घुमटाकडे पहात असताना जितकं चकित झालो असतो त्याच्या दहा पटीने आपण आता चकित होतो. इमारतीचा तिकिट खिडक्या असलेला भाग वरतून स्पष्ट दिसतो. सीएसटी स्टेशनाच्या या भागात रांगेने असलेल्या तिकिट खिडक्यांच्या समोर रांगा लावून अक्षरश: हजारो माणसं उभी असतात. त्या लांबलचक रांगा आणि स्टेशनातली हजारोंची गजबज.. त्यातल्या एकालाही वर मान करुन हे अप्रतिम वास्तुसौंदर्य बघावेसे का वाटत नाहीये असं कमालीचं आश्चर्यही वाटतं आपल्याला. पण मग आठवते जेव्हा आपण त्या गर्दीचा एक भाग असतो तेव्हाची आपली मनस्थिती. लक्ष्य असतं ते फ़क्त ट्रेनमधली विंडो सीट पकडण्याचं, त्याकरता धावत येऊन ट्रेनमधे उडी मारण्याचं. गजबजलेल्या मुंबईच्या सांदीकोप-यांमधे, सिमेन्ट कॉन्क्रिटच्या अवाढव्य ढिगा-यांमधे लपलेलं सौंदर्य किंवा हे असं वर खुलेपणाने विस्तृत पसरलेलं हे रेखीव, सुडौल वास्तुवैभव या कशाकरताही आपल्या मनात वेळ नसतो..
पण ते असतं आपण आवर्जून बघावं याकरता तिथेच असं शतकभराहून जास्त काळ स्थिरावून असतं.


या तिकिट खिडक्या असलेल्या प्रांगणातही इटालियन संगमरवाचा केलेला आलिशान वापर वरतून पहात असताना नजरेत भरतो. भारतीय नीलवर्णी लाव्हा दगडाच्या कौशल्यपूर्ण कमानीवर कोरलेली पाना-फ़ुलांची नक्षी. फ़रसबंदीही वैशिष्ट्यपूर्ण देखणी. फ़रशीच्या भिंतीजवळच्या कडांवरही नक्षीकाम आहे, छतावर सोनेरी, निळसर रंग.
सन १८८७ साली समारंभपूर्वक महाराणी व्हिक्टोरियाच्या सन्मानार्थ मुख्यालय आणि टर्मिनस स्टेशनचे नाव ’व्हिक्टोरिया टर्मिनस’ ठेवले गेले.
मुख्य रस्त्याच्या बाहेरच्या बाजूला या स्टेशनच्या दर्शनी भागाची लांबी पंधराशे फ़ुट भरते.
इ.स. १९२९ साली मुख्य उभारणीत फ़ेरबदल करुन टर्मिनस स्टेशन लोकल गाड्यांच्या वाहतुकीकरता राखून नव्या भागात लांब पल्ल्याच्या गाड्यांसाठी दुसरे स्टेशन उभारले गेले.
कालांतराने हे व्हिटी स्टेशन जगातले सर्वोकृष्ट कलात्मक रेल्वेस्टेशन म्हणून मान्यता पावले. आज ताजमहालाच्या बरोबरीने ही सर्वाधिक फोटो काढले गेलेली इमारत आहे.

कितीजण येतात साधारणपणे रोज या हेरिटेज इमारतीची ही गायडेड टूर करायला असा एक प्रश्न मी कुतूहलाने आमच्या गाईडला विचारते. आर्किटेक्चरचे विद्यार्थी मोठ्या संख्येने येतात, बाकी मुंबईच्या इतिहासाचा अभ्यास करणारे काही जण येतात, इतरही काही स्थानिक सुट्ट्यांमधे येतात पण येणा-यांपैकी ९०% परदेशी पर्यटक असतात. गाईडने काहिसे अपेक्षित असणारेच उत्तर दिले. वाईट वाटलेच.

पश्चिमेकडच्या लोखंडी, भव्य द्वारातून बाहेर येऊन आम्ही पुन्हा एकदा मध्य रेल्वे मुख्यालयाच्या इमारतीकडे वळून पहातो. पिवळ्या मालाड स्टोनमधे बांधलेली ही युनेस्को वर्ल्ड हेरिटेज दर्जा मिळालेली देखणी गॉथिक इमारत संध्याकाळच्या उतरत्या उन्हात सोनेरी रंगात झळकत दिमाखात उभी असते.


आमच्या मागून एक मोठा लोंढा येतो. कसला तरी मोर्चा. त्यातूनच वाट काढत घरी परतण्याकरता लगबगीने चालणारे मुंबईकर सीएसटी स्टेशनात हजारोंच्या झुंडिने घुसत असतात. स्टेशन नेहमीसारखेच गजबजलेले, गर्दीला आपल्या पोटात सामावून घेत ठाम उभे असते. कलात्मक असली तरी ही फ़क्त शोभेची, दिखावू नाही, एखाद्या म्युझियमसारखी इतिहासात जगणारीही नाही. १३० वर्षांहून जास्त काळ ही वास्तू जिवंत आहे. रोज चाळीस दशलक्ष व्यक्ती हिच्या या देखण्या फ़रसबंदीवरुन ये-जा करतात. त्यांच्या पदन्यासात या वास्तूचे हृदय धडधडत राहिले आहे सातत्याने. मुंबईत माणसे आहेत तोवर ही इमारतही आहे. मुंबईवर लिहिली गेलेली ही सर्वात प्राचीन परंतु कधीही जुनी होऊ न शकणारी कविता.
--
सीएसटी हेरिटेज टूर सोमवार ते शनिवार (सार्वजनिक सुट्ट्यांचे दिवस वगळता) दुपारी ३ ते ५ वेळेत करता येते. प्रवेश शुल्क रु. २००/-


लेख मुशाफिरी दिवाळी अंकामधे पूर्वप्रकाशित.

No comments:

Post a Comment