Monday, March 6, 2017

गिव्ह पटेल- विहिरी आणि फ़ूटबोर्ड रायडर

ताजच्या मागच्या रस्त्यावर सनी हाऊसमधे मिरचंदानी-स्टाइनरुक गॅलरी आहे. रस्त्याचे नाव मेरेवेदर स्ट्रीट. हा रस्ता, म्हणजे खरं तर गल्लीच. कुलाब्याच्या कॅफ़े मॉन्देगरच्या कॉर्नरवर असलेल्या जंक जुलरी स्टॉलला वळसा घालून आतल्या रस्त्यावर गेलं की मेरेवेदर स्ट्रीटपर्यंत यायला पाच मिनिटही लागत नाहीत, पण या आतल्या रस्त्यावर इतकी काश्मिरी कार्पेट्स- हॅन्डलूम एम्पोरियम्स, कॉटेज आर्ट-क्युरिओ शॉप्स, प्रेशस स्टोन्सची दुकानं आहेत (आणि सगळ्यांवर अरेबसगळ्यांवर), आणि हे वातावरण दर वेळी उगीचच इतकं अनोळखी वाटणारं, की खूप वेळ रेंगाळून मग आपण पुढे जातो.
मेरेवेदर रस्ता एका बाजूने ताजच्या मागच्या बाजूच्या सुंदर, कलात्मक दगडी कुंपण भिंतीने बंदिस्त आणि समोरच्या फ़ूटपाथवरच सनी हाऊस. या इमारतीचा अत्यंत जुना, इसवीसनापूर्वीच्या डिझाइनचा लाकडी जिना चढून पहिल्या मजल्यावर जायचं. एक बंद, शिसवी लाकडी दरवाजा असलेलं घर. त्याची बेल मारुन दरवाजा उघडला जाईपर्यंत जिन्याच्या लॅन्डींगवरचं सुंदरसं पेंटींग बघायचं.
आतली जागा प्रशस्त, जुन्या स्टाइलचं उंच छत, गोलाकार कमानी असलेल्या पूर्ण काचेच्या खिडक्या, त्यातून दिसणारी बाहेरची छान, हिरवीगार झाडं.. भिंतीवरची चित्रं पहायच्या आतच आपल्याला कलात्मक वाटायला लागतं.
उषा मिरचंदानी आणि त्यांची मुलगी रंजना स्टाइनरुक यांनी मिळून चालवलेली ही गॅलरी. कटेम्पररी आर्टिस्ट्सचं फ़ार छान काम इथे कायम प्रदर्शित होत असतं.
सध्या इथे मुंबईस्थित कवी-लेखक-चित्रकार गिव्ह पटेल यांच्या चित्रांचं प्रदर्शन चालू आहे.


गिव्ह पटेल यांच्या कविता काही मी वाचलेल्या नाहीत, पण त्यांची चित्र मला अतिशय आवडतात.  कवितेसारखीच वाटतात. सामान्य माणसांच्या जगणं, जगण्यातली विसंगती, माणूस-शहर-निसर्गातलं बदलत जाणारं नातं, रोजच्या जगण्यातून दूर गेलेला पण आसपासच असणारा निसर्ग.. असं बरंच काही त्यांच्या चित्रांमधून संवेदनशीलतेनं हाताळलेलं असतं. माणसांच्या बसण्याची, उभं रहाण्याची ढब, हावभाव यातून खूप काही व्यक्त होत असतं त्यांच्या चित्रात. शहर आणि माणूस आपल्या परस्पर नात्यामधून कसे इव्हॉल्व होत जातात यावर भाष्य करणारी गिव्ह पटेल, सुधीर पटवर्धन अशांची चित्र ख-या अर्थाने समकालिन.

आत्ताच्या प्रदर्शनामधलं गिव्ह पटेलांचं फ़ूटबोर्ड रायडर हे ऎक्रिलिकमधलं चित्र विलक्षण परिणामकारक. आकाराने फ़ार मोठं नाही, पण खोल आशय सामावलेलं.


ट्रेनच्या खिडकीवर डोकं टेकवून झोपलेला एक माणूस. त्याच खिडकीच्या बाहेर लटकून उभा राहिलेला एक जण. त्याचं डोकं आणि खांद्याचा भाग आणि दोन्ही हातांचे त्या खिडकीला पकडू पहाणारे पंजे आपल्याला दिसतात. ट्रेनच्या वेगात त्याचे उडणारे केसही दिसतात. मुंबईतल्या लोकलनी प्रवास करणा-याला रोजच दिसणारं हे दृश्य. रोजच पाहिल्याने त्यातला जीवावरचा धोकाही आपण सहज स्विकारलेला. झोपलेल्या माणसाच्या बाजूला जागे असणा-या दोघांच्या निर्विकारतेवरुन ते जाणवतही आहे. त्या बाहेर लटकलेल्या माणसाच्या मागून दिसणारी एक डोंगरांची रांग विलक्षण आहे. ती पहाताना असं वाटतं की हे बाहेरचं दृश्य, तो लटकता माणूस, त्यातला धोका हे सगळं आतल्या झोपलेल्या माणसाच्या स्वप्नातलं दृश्य असेल का? आणि आयुष्याच्या दोरीला, रोजच्या जगण्याला कसबसं लटकून प्रवास करणारा माणूस हा आतला आहे की बाहेरचा? नक्की नाही सांगता येत.
गिव्ह पटेलांच्या चित्रात अनेकदा आतला आणि बाहेरचा अवकाश यांच्यातलं नातं डोकावतं. त्यांच्या आधीच्या ’विहिर’ या चित्रमालिकेमधेही ते होतं.
फ़ार सुंदर, गहन, मनाचा तळ ढवळून काढणारी आहेत या विहिरी. त्यांच्या तळात डोकावून पहाताना सिरिन, खोलवर शांतवणारा, विचारात पाडणारा अनुभव येतो. त्यातल्या काही विहिरी या प्रदर्शनामधेही आहेत. कधी गुलमोहोराची लालजर्द फ़ांदी, कधी हिरवं शेवाळ, कधी पौर्णिमेचा चंद्र विहिरीच्या पाण्यात प्रतिबिंबित झालेला, कधी आपलं स्वत:चं प्रतिबिंब त्यातून आपल्यालाच पहातं. कधी कधी आत डोकावणारे आपण असलो तरी आपल्याकडे पहाणारं प्रतिबिंब कुणा वेगळ्या व्यक्तिचंही असू शकतं.
हा अनुभव प्रत्येकानी आपापला घ्यायलाच हवा असा.
गिव्ह पटेल यांचभाएक सविस्तर मुलाखतही आतल्या व्हिडिओवर पहाता-ऐकता येते.
मिरचंदानी-स्टाइनरुक गॅलरीमधलं हे प्रदर्शन पहाण्याची संधी १८ मार्च पर्यंतच आहे. तेव्हा शक्य असल्यास लगेच प्लॅन करा.

No comments:

Post a Comment