Sunday, March 5, 2017

हिरवागर्द हिरामण तोता..

बॉम्बे आर्ट सोसायटीच्या शतकोत्तर सुवर्णमहोत्सवी वर्षानिमित्त एनजिएम मधे भरलेलं प्रदर्शन.
एनजिएमच्या भिंतींवर रविवर्माची दमयंती, अमृता शेरगिलच्या तीन मुली, पिठावालांची पारशी गर्ल, हळदणकरांची ज्योतिर्मयी, तीर्थाटनाला निघालेला फ़किर यात्रेकरु, त्रिंदादांची फ़्लोरेन्टाईन, आलमेलकरांच्या आदिवासी कन्यका..एकेक ओळखीची, मन मोहवून टाकणारी चित्रे..
मुल्लर, पळशीकर, गायतोंडे, हुसेन, रझा, आरा, हेब्बर, गाडे, अंबादास, हरकृष्णलाल, शंखो चौधुरी, मजुमदार, कोलते,  चोयाळ अशा चित्रकारांची बॉम्बे आर्ट सोसायटीच्या १२५ वर्षांच्या कालावधीत सुवर्ण पदकांनी सन्मानित झालेली, नंतर खूप गाजलेली चित्रे पहात आपण पुढे सरकत असतो.
ज्यावेळी ही  चित्रे स्पर्धेला पाठवली असतील त्यावेळी तरुण, स्ट्रगलिंग आर्टिस्ट असणारे हे चित्रकार आपल्या चित्राला बहुधा पहिल्यांदाच मिळालेला सन्मान पाहून किती हरखून गेले असतील.. वगैरे विचार डोक्यात असतात.
बहुतेक चित्रं आपण आधीही अनेकदा, कुठे ना कुठे पाहिलेली असतात, तरीही ती पुन्हा पुन्हा पहाविशी वाटण्यामागे काय जादुई कारण असावं, सिनर्स डिव्हाइनमधल्या त्या जोडप्याच्या कपड्यांमधला तो अद्वितीय पिवळा अजूनही किती मोहवणार आहे.. असा विचार मनात येत असतानाच अचानक एक हिरवगर्द चित्र समोर येतं..
अगदी पाऊल पुढे टाकू देणारच नाही अशा छटांमधलं त्या मानाने लहानसच.
लयदार मोहक रेषा, एकातएक गुंतलेले हिरवे, लोभस तलम पोत.. मुघल मिनिएचरमधली एक अंगभर हिरवा पोषाख ल्यायलेली नाजूक, सुंदर तरुणी सज्जामधे बसली आहे, हातावरची मेहेंदी निरखून पहाते आहे बहुधा, तिच्या मागे केळीचे हिरवे बाग.. त्यावर किरमिजी केळफ़ुलांचे घोस.
फ़ार काही तपशिल नाही आहेत चित्रात, आहेत ते सगळेच फ़ार  देखणे.. मुलायम आणि प्रवाही.
पण आपल्याला पाय पुढे टाकू देत नसतो त्या तरुणीच्या खांद्यावर बसलेला मखमली हिरवा रावा.
हिरामण तोता.
तरुणीच्या हिरव्या साजातूनही त्याचं अस्तित्त्व ठळक वेगळेपणाने दिसतं..

ए. आर. चुगताई (१८९५-१९७५) या नंतरच्या काळात पाकिस्तानात स्थायिक झालेल्या चित्रकाराने रंगवलेला.
घरी आल्यावर कुतूहलाने चुगताईंबद्दल वाचत होते त्यावेळी कळलं स्वातंत्र्यपूर्व भारतातल्या लाहोर मधे जन्मलेले हे चुगताई अबनिंद्रनाथ टागोरांचे विद्यार्थी. तरीच हिरामण तोता चित्रावर बंगाल स्कूलची छाप ठळक दिसत होती.  
 रेअर बुक सोसायटी ऑफ़ इंडियामधल्या नोंदीत अजून एक कुतूहलजनक तपशील सापडला.
शाहजहानने बांधलेल्या ताजमहाल या वास्तुचे प्रमुख आर्किटेक्ट अहमद मिमार लाहोरी यांचे हे ए. आर. चुगताई थेट वंशज.
हिरामण तोता आणि चुगताई आता कायम स्मरणात राहिल.

1 comment:

  1. Beautifully written. There was an article on Chugtai last year in Pariwartanacha watsaru.

    ReplyDelete