Wednesday, April 12, 2017

In the City, a library

तुमच्या, माझ्या, कुणाच्याही शहरातली, एक लायब्ररी.
शहरात अनेक लायब्र-या असू शकतात, असतात.
त्यातली एखादी खूप जुनी, सार्वजनिक असते. कदाचित शहर वसलं तेव्हाच तिची योजना झालेली असते.
 मग शहर वाढतं तसं तीही वाढत जाते, समृद्ध होत जाते.
प्राचीन ग्रंथ, संदर्भाकरता, अभ्यासाकरता त्यात जमा होत जातात.
गाजलेली पुस्तकं, लेखकांचे नाव मोठं करणारी, बदनाम करणारी, लोकप्रियतेच्या शिखरावर आरुढ झालेली, लाटेसारखी विरुन गेलेली, वादळ उठवणारी, गदारोळ माजवणारी, चर्चा घडवून आणणारी, कोर्टाच्या पाय-या चढायला लावणारी वादग्रस्त.
 शास्त्राची, इतिहासाची, रुढी-परंपरांची, अभ्यासाची, मनोरंजनाची, पुन्हा पुन्हा परतून यायला आव्हान करणारी किंवा नुसतीच जागा भरणारी.
चाळवणारी चटोर किंवा जडजंबाळ गंभीर...
असंख्य, हजारो, लाखो पुस्तकं तुमच्या शहरातल्या लायब्ररीतल्या शेल्फ़ांवर, कपाटांमधे, रॅकवर ओळीने विराजमान झालेली.


एकेकाळी उत्सुकतेने तुम्ही लायब्ररीच्या पाय-या चढलेल्या असता, तिथे बसून एका मागोमाग एक पुस्तकांची पाने खाल्लेली असतात.
लायब्ररी तुमच्या शहरातले एक वाजते गाजते, नांदते, जिव्हाळ्याचे, सांस्कृतिक घडामोडींचे केंद्र बनते. तिथे लेखक भेटीला येतात, व्याख्याने होतात.
 पण मग दशकं उलटतात, पिढी बदलते. संदर्भाची, मनोरंजनाची साधने बदलतात.
लायब्ररी बदलतेच असं नाही. शहर वाढतं त्या प्रमाणात सदस्य संख्या वाढतेच असं नाही.
मग टेबल खूर्च्या जुन्या होतात, शेल्फ़ांवर धूळ साचते, पुस्तकांची पानं महिनोन महिने, वर्षानुवर्षे उलटूनही पाहिली जात नाहीत, घरोघरी आपला स्वतंत्र पुस्तकांचा साठा करणारी वाचनप्रिय पिढी लायब्ररीचा पत्ता विसरुन जातात. त्यांना लायब्ररीची गरजच वाटत नाही.
कोप-यात सारुन दिलेल्या अडगळीचं विधीलिखित लायब्ररीच्या माथी लिहिलं जातं.
तुमच्या शहरात अशा जीर्ण झालेल्या, कसर लागलेल्या, पिवळ्या पडलेल्या, उंदरांनी कुरतडलेल्या पुस्तकांच्या थप्प्यांनी वाकलेल्या, खिळखिळ्या झालेल्या कपाटांमधे उत्थानाची वाट पहात मलूल पडून राहिलेल्या पुस्तकांनी भरलेल्या किती लायब्र-या आहेत याची तुम्हाला जाणीवही होत नाही. झाली तरी काय करणार असता तुम्ही त्याचं?


लायब्ररी म्हणजे नेमकं काय असते? पुस्तकांचे संग्रहालय? की वाचकांची पाणपोयी?
पुस्तके आणि वाचक दोन्ही एकमेकांशी संवाद करतात त्यालाच लायब्ररी म्हणता येईल.
वाचक फ़िरकलाच नाही, पुस्तकांची पानं उलटलीच गेली नाहीत तर ती लायब्ररी नाही, ते पुस्तकांचं कब्रस्तान.
तुमच्या शहरात अशी किती कब्रस्तानं आहेत, ज्यांना एकेकाळी लायब्ररी म्हणत?
मुंबई शहरामधे नेमक्या किती लायब्र-या आहेत, त्यातल्या किती जिवंत, किती धुगधुगी असणा-या, किती मृत आहेत? माहित नाही याचा कधी कोणी सर्व्हे केला आहे का?
मात्र चिरोदीप चौधरी आणि जेरी पिंटो या दोघांना शहरातील अशाच एका एकेकाळी जिवंत, नांदत्या, आता मृतवत झालेल्या प्राचीन, सार्वजनिक लायब्ररीची विचारपूस कराविशी वाटली.
 या दोघांपैकी एक फोटोग्राफ़र आणि एक लेखक.
ज्या अर्थी त्यांना हे करावसं वाटले त्या अर्थी दोघेही अर्थातच संवेदनाशील..
त्या दोघांनी लायब्ररीमधे अनेक दिवस, तास घालवले. कित्येक दशकं कधीही कोणी ज्याची पानं उलटली नाही त्या पुस्तकांच्या अंतर्भागात ते डोकावले.
तिथे त्यांना काही विलक्षण गोष्टी सापडल्या, ज्यांच्या वरुन अनेक कथांचा, नव्या पुस्तकांचा जन्म होऊ शकतो अशा गोष्टी.. फ़ार काही वेगळ्या, दुर्मिळ नाही, पण विलक्षण.
कोणाला तरी आलेलं पत्र, ज्यावर सत्तर वर्षांपूर्वीची तारिख आहे, सुंदर स्केच आहे, पानांमधे ठेवलेलं आता फ़ॉसिल झालेलं फ़ूल, ट्रामचं तिकिट, बसचं तिकिट- ज्याचे थांबेही शहराच्या नकाशावरुन आता अस्तंगत झालेले, कोणाला तरी कोणीतरी लिहून ठेवलेला निरोप, केलेली कविता, किराणामालाचे हिशोब..



बदललेल्या, जीर्ण झालेल्या, थांबलेल्या, नाहिशा झालेल्या काळाच्या खूणा पुस्तकांच्या पानांमधे गोठलेल्या होत्या.
प्राचीन झालेली, ओसाड पडलेली लायब्ररी आणि जीर्ण झालेली, संदर्भ हरवलेली पुस्तकं.. नेमकं कसं बघायचं यांच्याकडे?
वाचक पुस्तक वाचतात म्हणजे नेमकं काय करतात?
सार्वजनिक मालकीच्या पुस्तकांकडे बघण्याचा त्यांचा दृष्टीकोन कसा असतो?
काळाच्या कोणत्या खूणा वाचक आपल्याही नकळत मागे सोडतो?
वाचक आणि पुस्तक यांच्यातलं नातं किती जिव्हाळ्याचं, तटस्थतेचं, लोभाचं, हिंस्त्रपणाचं असतं?
चिरोदीप आणि जेरीने हे सर्व जाणून घेतलं. त्याचे त्यांनी फोटो काढले, त्यावर लिहिलं आणि मग त्याचं प्रदर्शन भरवलं.
प्रोजेक्ट ८८ या कुलाब्याच्या आर्ट गॅलरीमधे ते गेल्या महिन्यापासून चालू आहे.
या प्रदर्शनातले फोटो हे अनेकदा सेल्फ़ी वाटतात. त्या त्या काळातल्या वाचकाने आपल्या वास्तवाला कैद करुन ठेवलेली सेल्फ़ी.
तुम्ही लायब्ररीची पायरी शेवटची कधी चढलात?
तुमच्या मुलांना लायब्ररीचं सदस्यत्व घ्यायला आणि तिथे जायला सांगीतलत?
ती जातात?
In the City, a library हे प्रदर्शन आपल्याला हे प्रश्न विचारते.
आपल्या शहरातल्या लायब्ररीच्या जीवन-मरणाला कारणीभूत ठरतील यांची उत्तरं.


In the City, a library
Chirodeep Chaudhuri and Jerry Pinto
Project 88
Exhibition up to 15th April.

No comments:

Post a Comment