Tuesday, January 3, 2017

चित्रकाराच्या प्रदेशात: स्टुडिओ पोर्ट्रेट्स

आर्ट गॅलरीमधे, पांढर्‍याशुभ्र भिंतीवर, देखण्या फ्रेम्समधे सजलेली, सुयोग्य प्रकाशयोजनेत झळाळून उठलेली पेंटींग्ज पहाताना हे विसरणं इतकं सोपं असतं- की ही पेंटींग्ज एका दीर्घ प्रक्रीयेचा प्रवास पार करुन इथवर पोचलेली आहेत. चित्रकाराच्या स्फ़ुर्तीचा, सर्जनाचाच नव्हे तर परिश्रमाचा, नियोजनाचाही हा प्रवास असतो.
आणि हा प्रवास ज्या प्रदेशातून घडतो तो प्रदेश खास त्या चित्रकाराच्याच मालकीचा.
पेंटीग्ज सार्‍या जगाकरता असतीलही पण हा प्रदेश नाही. 
चित्रकाराचे खाजगी क्षण, घाम,अश्रू, वैफ़ल्य, इर्षा, निराशा, आनंद, उत्साह..सगळ्याचा उगम आणि अस्त केवळ या प्रदेशापुरतेच मर्यादित. त्यातून जन्माला आलेलं पेंटींग जग बघतो. जन्मापूर्वीचा हा प्रवास बाहेरच्या जगाला अनभिज्ञच रहातो.
काय असतं त्या निळ्या,सुंदर पक्ष्याचं नाव जो स्टुडिओच्या खिडकीत बसून चित्रकाराला स्फ़ुर्ती पुरवतो?
ते जाणून घ्यायचं एक कुतूहल.. ते मनात नेमकं केव्हा रुजलं सांगता यायचं नाही तरी ते रुजलं याचं आश्चर्य अजिबात नाही. चित्रकार समजला तर चित्र समजणं जास्त सोपं असा एक विश्वास मनात नेहमीच होता.

चित्रनिर्मिती होत असताना, अपूर्ण रंग ल्यायलेल्या इझलसमोर उभा असलेला चित्रकार नेमका कसा असतो?
इझलसमोरचा चित्रकार हा बेटावरच्या एकाकी प्रवाशासारखा असतो असं रेम्ब्राचं एक विधान आहे.
त्या बेटावरचा त्याचा दिनक्रम नेमका असतो तरी कसा?..


बोस्टनच्या म्युझियम ऑफ़ फ़ाईन आर्टमधे रेम्ब्राचं ’द आर्टिस्ट इन हिज स्टुडिओ’ पहाताना त्याचं हे विधान आठवलं. लहानशा स्टुडिओतलं भव्य, पाठमोरं इझल.. स्टुडिओतला सर्व भौतिक अवकाश त्याने व्यापलेला आहे, चित्रकार जरा लांब उभं राहून इझलकडे पहातो आहे, कदाचित तो रेम्ब्रां स्वत:च आहे. इझलवरचा कॅनव्हास कोरा आहे की चित्र काढून पूर्ण झालेलं आहे काहीच माहित नाही. पण चित्रकार विचार करतो आहे, त्याच्या हातात ब्रश आहे, तडा गेलेल्या भिंतीवर पॅलेट आहे. स्वत:च्या दुनियेत हरवलेला कलावंत, स्टुडिओतला बंदिस्त, बाहेरच्या जगापासून आयसोलेटेड असलेला अवकाश, चित्रकाराच्या चेह-यावरचे पूर्ण काळे डोळे, आतमधे पहाणारे.. या अवकाशात आपल्याला इझलवरचं चित्र फ़क्त दिसत नाही, पण चित्रकार, त्याची वैचारिक क्षमता, कल्पनाशक्ती, शिस्त, कौशल्य.. सगळं स्पष्ट दिसतं, जाणवतं.
चित्रकार आणि त्याच्या भोवतालचा अवकाश हे सगळं घेऊन येतो. त्यांच्या दरम्यान असतं त्याचं चित्र. 
आपल्याला या तिनही गोष्टींबद्दल सारखंच कुतूहल वाटत आहे हे ठामपणे कळण्याचा हा क्षण होता.
त्यानंतर मग मनात कुतूहल, चौकसपणा घेऊन चित्रकारांच्या स्टुडिओंची.. लहान, मोठे, जुने, नवे, नीटनेटके, अस्ताव्यस्त, कलात्मक, प्रॅक्टीकल, गोडाऊनमधले, नदीकाठचे, पर्वतावरचे, समुद्रकाठचे.. चित्रकाराच्या व्यक्तिमत्वाचा अविभाज्य भाग असलेल्या या प्रदेशाची मी बिनदिक्कत सैर केली. 

हिमालयात मनालीच्या वाटेवरचा देखण्या निसर्गचित्रांची उधळण असलेला चित्रकार रोरिकचा स्टुडिओ,  कोल्हापूरचा बाबुराव पेंटरांचा भव्य, अनेक कौशल्यपूर्ण करामती असलेला स्टुडिओ,  आर्टफ़ेस्टीवलमधे पाहिलेली वयोवृद्ध चित्रकार रायबांच्या  कापडाचे तागे पसरुन ठेवलेल्या अंधा-या स्टुडिओची प्रतिकृती आणि सर्वात अस्वस्थ करुन गेलेलं रविवर्माच्या गिरगावातल्या चंद्रमहाल इमारतीत आता अवशेषांची एकही खूण मागे न उरलेल्या स्टुडिओचं काळाच्या पोटात गडप झालेलं अस्तित्व..
इझलच्या मागे पेटती फ़ायरप्लेस असलेला, एका ब्लॅक अ‍ॅन्ड व्हाईट चित्रात पाहीलेला अमृता शेरगिलचा स्टुडिओ, व्हिन्सेन्टचा पिवळ्या सूर्यफ़ुलांची फ़ुलदाणी स्टुलावर ठेवलेला, सुहृदाची वाट पहात राहिलेला यलो हाऊसमधला एकाकी स्टुडिओ, मातिझने त्याच्या चित्रातूनच अजरामर करुन ठेवलेला रेड स्टुडिओ,  गोगॅंचा ताहिती बेटावरचा बांबूच्या पडद्याची भिंत असलेला स्टुडिओ.. वाळकेश्वरचा सर्व्हन्ट्स क्वार्टरमधला आरांचा स्टुडिओ, गायतोंडेंचा निजामगंजच्या बरसातीतला धूळीचे ठसे उमटवणारा स्टुडिओ, ग्रेसच्या कवितांच्या ओळी ल्यायलेला शुभा गोखलेंचा कलात्मक गोंदणगाव नावाचा स्टुडिओ, भानू अथैयांचा आलिशान इमारतीच्या तळमजल्यावर लहानशा गॅरेजमधला भिंतीवर मीना कुमारीचं देखणं कृष्णधवल छायाचित्र आणि काचेच्या शोकेसमधे ऑस्करचा सुवर्णपुतळा मिरवणारा स्टुडिओ, अतुल दोडियांचा सुरुवातीच्या काळातला बैठ्या चाळीतला, मोकळा ढाकळा आणि मग आताचा आपल्या आत लहानसा कारखानाच वागवणारा स्टुडिओ.. देवदत्त पाडेकरचा परदेशातला एफ़िशियन्ट स्टुडिओ, जमिनीवर रंगांच्या शिंतोड्यांची कलात्मक रांगोळी असलेला प्रभाकर कोलतेंचा हवेशीर, प्रसन्न स्टुडिओ, बघायची तीव्र इच्छा असलेला जॉर्जिया ओकिफ़चा सान्टा फ़ेमधला अडोब स्टुडिओ..
अशा असंख्य पाहिलेल्या, न पाहिलेल्या, ऐकलेल्या स्टुडिओंच्या कथा आणि त्यातल्या चित्रकारांच्या कहाण्या मनात आहेत ज्या तुमच्यासोबत शेअर करायच्या आहेत.   

स्वत:च्या मालकीचा स्टुडिओ हे प्रत्येक चित्रकाराचं स्वप्न असतं. ते तो नेमकं कधी बघायला सुरुवात करतो?
चित्रकाराचा खाजगी प्रदेश स्टुडिओच्या चार भिंतींमधे सामावलेला असतो हे खरं पण चित्रकार काही जन्माला येतानाच हा स्टुडिओ सोबत घेऊन येत नाही. तो मिळवण्याकरता त्याला स्ट्रगलचा, अनुभवाचा एक निश्चित टप्पा पार करावा लागतो. प्रत्येक चित्रकाराची चित्रांची स्टाईल जशी वेगळी, खास त्याची, तशी त्याच्या स्टुडिओतल्या प्रदेशाची संकल्पनाही खास त्याचीच असणार..
सुभाष अवचटांनी त्यांच्या ’स्टुडिओ’ पुस्तकामधे चित्रकाराच्या मनातल्या आणि भोवतालच्या, अमूर्त आणि मूर्त दोन्ही अवकाशांचा वेध जाणतेपणाने घेतला आहे. आपल्या मनातल्या स्टुडिओच्या शोधाचा प्रवास वाईतल्या तर्कतीर्थांच्या वाड्यापासून खंडाळ्याच्या स्कॉटिश चॅपेलपर्यंत करत असताना चित्रकाराला त्याचा प्रदेश आणि अवकाश दोन्ही सापडणं किती कठीण हे त्यांनी नेमकेपणानं शब्दात उतरवलं.
प्रत्येक कलाकाराची स्वत:ची अशी एक ओळख असते जी त्याच्या कलाकृतीतून दिसते आणि त्याच्या व्यक्तिमत्वातूनही. कलाकाराच्या जीवनखूणा कलेत उमटलेल्या असतात. त्याच्या वाचूनही कला असतेच कारण कलेला स्वत:चं स्वयंभू व्यक्तिमत्व असतं.
स्टुडिओमधे काम करत असताना बंदिस्त, एकाकी अवकाशात चित्रकार या स्वत:च्या ओळखीचा अखंड शोध घेत रहातो. अनेक चित्रकारांनी अगदी व्हर्मिए, पिकासोपासून फ़्रिडा काहलो, अमृता शेरगिलपर्यंत अनेकांनी, स्टुडिओत काम करतानाचं, बहुतेकदा सेल्फ़ पोर्टेट रंगवलं, ते आपल्या शोधाच्या प्रवासातील एक स्थानक म्हणूनच कदाचित. चित्रकारांनी न लिहिलेल्या आत्मचरित्रातलं ते एक महत्वाचं प्रकरण. त्यात त्यांनी आपलं तांत्रिक कौशल्य, आपल्या सवयी, आपली मॉडेल, आवडीच्या, प्रेरणा देणा-या गोष्टी यांची एक ठळक कालनोंद करुन ठेवली.
 कला म्हणजे फ़क्त रंग रेषा, आकार नाही.. त्या चितारणारे ब्रश, पॅलेट, ट्यूबा, अवजारे, इझल आणि त्यामागचा सदेह चित्रकारही. कलाकाराच्या व्यक्तिमत्व घडणीत जे असंख्य घटक सामावलेले असतात, त्यांचे अस्तित्त्व स्टुडिओत विखुरलेले असते. पाब्लो पिकासोच्या स्टुडिओमधे पाऊल ठेवल्यावर म्हणूनच व्हॅनेसा बेल ही कला-समिक्षक लिहिते:  “The whole studio seemed to be bristling with Picassos. All the bits of wood and frames had become like his pictures...”


अर्थातच स्टुडिओच्या चार भिंतींमधलं इझल लावलेलं, रंग, ट्यूब्ज, पॅलेट-ब्रशचा पसारा मांडलेलं जग नुसतं बघून ना आपल्याला चित्रकाराच्या जाणीवांच्या प्रदेशात प्रवेश मिळतो, ना आपल्या मनातल्या असंख्य कलाविषयक प्रश्नांची उत्तरं मिळतात. त्याकरता त्या चित्रकारानेच बोलायला हवं. त्याला बोलतं करण्याकरताच हा खटाटोप.
चित्रकाराच्या प्रत्यक्ष स्टुडिओत जाऊन त्याच्या चित्रनिर्मितीमागची स्फ़ुर्ती, परिश्रम,नियोजन यासकट तो चित्रकार जाणून घेणं आणि ते तुमच्यापर्यंत पोचवणं आव्हानात्मक निश्चितच.. पण मजेदारही ठरेल.  

(लोकमतच्या मंथन या रविवार पुरवणीमधे जाने.२०१७ पासून सुरु झालेला हा कॉलम आहे. दर पंधरा दिवसांनी यात एक चित्रकार त्याच्या स्टुडिओसकट तुमच्या भेटीला येईल. तेव्हा वाचत रहा..)

No comments:

Post a Comment