Sunday, October 30, 2016

शून्य काळ

संजय सावंतचं जहांगिरच्या कलादालनात भरलेलं "शून्य काळ/झीरो टाईम" हे प्रदर्शन. दिवाळीच्या गडबडीत उशीरच झाला या सुंदर, वेगळ्या प्रदर्शनाबद्दल लिहायला.

समोर एक अखंड, मोठ्ठं पेंटींग, साडेसात बाय साडेसात फ़ुटांचं. काही वेगवेगळे त्रिमित आकार कागदातून बनलेले, त्यातल्या छिद्रांमधून, फ़टींमधून, घड्यांमधून येणारा, दिसणारा प्रकाश, वेगवेगळे टोन, लेयर्स..
संजयच्या प्रदर्शनात कागदांचं अद्भुत विश्व आहे. कागद दुमडणे, मुरडणे, त्यांना छिद्र पाडणे या प्रक्रियेतून बनत गेलेले आकार, त्यात काही चांदीच्या कागदावरच्या प्रकाशाचे खेळही आहेत.
मिक्स मिडियातील कामातही कागद त्याच्या ठळक, स्वतंत्र व्यक्तिमत्वासह आहेच. कागदावर त्याने लेपलेले रंग आणि त्यांना दिलेले आकार फ़सवे, भासमान आहेत. ठोस, सघन जड वाटू शकणारे आकार फ़ुलांसारखे तरल, काही कुशीत घेऊन थोपटावेत असे निष्पाप.. कागदावरच्या अवकाशाचं त्रिकोणी विभाजन, कधी समांतर, कधी असमांतर. त्यात पाय-या ओलांडून वर जाणारा अवकाश. त्याचे रंग ठोस, सघन आहेत, जिवंत आहेत. ते अस्वस्थ करतात, पण परिसरातल्या कोलाहलाशी ते नातं जोडणारे आहेत, काही विरोधात जाणारेही. ब्रशस्ट्रोक्सची जादू कागदाच्या उकलत गेलेल्या पोतामधे आहे.
हे काम जितकं खोलात जाऊन बघाल तितके त्यातले लेयर्स, सटलिटी, पोत जाणवत रहातील. सहज नजर टाकून पुढे सरकावं असं हे काम नाही, तसं तुम्ही सरकूही शकत नाही. त्यात खोलवर ओढले जाता, चंदेरी, सोनेरी प्रकाशांचे परावर्तित कवडसे तुम्हाला आवडतात, कधी एकातएक गुंतलेले पॅटर्नस, कधी फ़ॅब्रिकचे धागे, दुमडलेले कागदांचे कोन, बारीक छिद्रांमधून डोकावणारा मागचा अवकाश, रंगांचे थर.. अरुपातून विरुपाकडे जाताना अधल्या मधल्या सर्व आकारांचे नेमके काय होत असते हे त्यात दिसू शकतं.



संजय गेली बरीच वर्षं कागदाच्या अंतरंगातून बाहेरचं जग नेमकं कसं दिसतं हे तपासण्याच्या प्रयत्नात आहे. तो कॅनव्हासवर रंग न वापरता कागद वापरतो, किंवा फ़क्त कागद याच माध्यमाची चित्रं बनवतो, त्यांच्यात पुन्हा रंग असतात, आकार असतो, त्रिमिती असते, पण त्यांना रुढ शिल्पही म्हणता येणार नाहीत. माहितीतल्या, नेहमीच्या वळणातल्या आकार-उकारांच्या पलीकडे, वेगळ्या मितीतले, एकातून अनेकात नेणारी वलयं, आणि त्यातून पुन्हा संकोचत गेलेला अवकाश.. काय शोधत आहे तो? अवकाशनिर्मितीचे गूढ? की काळाला पडलेल्या घड्या..

पुठ्ठे, जाड कागदी खोके, पाकिटे, खाकी कागदांच्या घड्या, पोस्टकार्ड्स.. खडबडीत, पिवळसर कागदी पृष्ठभाग ज्यावर स्पर्शाचा ठिपका उमटवणे अपरिहार्य होऊन बसावे असा पोत बाळगणारे कागद, कधी चकचकीत चांदी.. ही तर संजयच्या फ़ार पूर्वीपासूनची, कदाचित अगदी सुरुवातीपासूनच प्रेरणेतली सहभागी. वाण्याकडच्या रिसायकल्ड कागदी पिशव्या, भासमय विश्वातले वास्तव आकार, त्या कागदाचे स्वरुप, मूळ रुप अंतर्बाह्य बदलून, काय नविन बनू शकेल हे पहाण्यातली नजर लहान मुलाची, खाचखळगे, खड्डे सहजतेनं ओलांडून पुढे जाणारी. त्या आकारांमधे असलेला लवचिकपणा, कागदाचे अंगभूत सामर्थ्य एक्स्प्लोर करणारे, कागदाचं एक स्वतंत्र अस्तित्व, वेगळं व्यक्तिमत्व त्याने मान्य केलं आहे.


संजय जेव्हा सांगतो पोर्ट्रेट्स हा त्याच्या आवडीचा विषय होता, हातखंडा.. तेव्हा आश्चर्य वाटत नाही, कागदांची ही एकेक स्वतंत्र व्यक्तिचित्रे आहेत. पोर्टेट काढताना व्यक्ती जशी दिसते आहे त्यापेक्षा कशी नेमकी आहे हे शोधत जाणे, त्याकरता त्वचेचे स्तर उकलून आत जात, बाह्यत्वचा सोलून आंतरत्वचेत शिरण्याचा प्रयत्न इथेही आहे, कधी ती व्यक्ती सहृदयी असेल, कुरुप असेल किंवा सुंदर..पण हा शोध महत्वाचा, आव्हान त्यात आहे. तो कागदावर नेमकी काय प्रक्रिया करत असावा याचे सुरुवातीचे कुतूहल नंतर दुय्यम झाले.

तब्बल नऊ वर्षांनी संजय पुन्हा जहांगिरच्या कलादालनामधे त्याचं काम प्रदर्शित करत आहे हे कळल्यावर संजयने आपलं हे काम जिथून सुरु केलं त्या टप्प्यापासून इथवरचा प्रवास त्याच्या स्टुडिओत, त्याच्या एकरेषीय नसणा-या शैलीत त्याचं काम बघत असतानाच जाणून घेणं माझ्या दृष्टीने आवश्यक ठरलं.

संजय मुळातला जे जे स्कूल ऑफ़ आर्टचा चित्रकार, शिकत असताना फ़िगरेटीव आणि पोट्रेचर या चित्रप्रकारांवर विलक्षण प्रभुत्व असणारा, त्या विषयातली अनेक मोठमोठी बक्षिसं मिळवणारा संजय सावंत. नंतरच्या काळात वेगवेगळ्या आर्ट कॉलेजेसमधे शिकवणारा. आणि आता गेली निदान सोळा सतरा वर्षे स्वतंत्रपणे अमूर्त शैलीत काम करणारा.

अनेकदा म्युझियम्समधे, आर्ट गॅलरीत, आर्ट टॉक्सना संजय सावंत भेटत असतो. त्यावेळी चित्रकलेवरच गप्पा होतात असंही नाही, त्याच्या स्वत:च्या कामावर तर फ़ारच कमी होतात. नवीन वाचलेलं, ऐकलेलं, पाहिलेलं असं तो काही ना काही सांगत असतो. तो लिहितो, कविता करतो. देशापरदेशात वेगवेगळ्या कॅम्प्स, रेसिडेन्सीजना जात असतो, त्यामुळे बोलण्यासारखं खूप असतंच त्यावेळी. वेगवेगळ्या प्रदेशांमधलं पर्यावरण, संस्कृती, सामाजिकता अनुभवणं त्याला आवडतं. सोनेरी आणि चंदेरी रंगाच्या चांद्या, फ़िकट हिरवे जाडसर, हॅन्डमेड कागद वापरुन त्याने केलेलं पाकिटांचं आधीचं काम पाहिलंही होतं. त्याने ही पाकिटं किंवा लिफ़ाफ़े वेगवेगळ्या आकारांच्या कॅनव्हासवर लावले होते, रंगांच्या लेपांमधे. असं वेगळं, ठाम अभिव्यक्ती असलेलं काम पाहिल्यावर साहजिकच त्या चित्रकाराच्या प्रेरणा, त्याचा पुढचा प्रवास या सगळ्याबद्दल आपल्याला कधी ना कधी सविस्तरपणे जाणून घ्यायची नोंदही मनाने केली होती. ती संधी आज मिळाली.

संजयसोबत त्याच्या स्टुडिओमधे झालेला संवाद "खेळ ३५" या मंगेश काळे संपादित दिवाळी अंकामधे प्रकाशित झाला आहे. जरुर वाचा.


No comments:

Post a Comment