Saturday, October 8, 2016

टॅपेस्ट्री पेंटींग्ज..

Wovenscapes: By Dinesh Kurekar
At- Jahangir Art Gallery

आर्ट आणि क्राफ़्ट या दोन्हीचा मनोरम सुंदर आविष्कार पहायचा असेल तर जहांगिरमधे भरलेले दिनेश कुरेकर या मास्टर आर्टिस्टच्या ’टॅपेस्ट्री पेंटींग्ज’चे ’वोव्हन्स्केप्स’  हे प्रदर्शन बघायलाच हवे. जहांगिरच्या कलादालनात पाय ठेवल्याबरोबर तोंडातून ’अहा..’ असे शब्द उमटतील आणि आपण थक्क होऊन चारी भिंतींवर पहातच राहू असे कला-प्रदर्शन कितीएक काळानंतर पहायला मिळाले आहे.


अतिशय सुंदर त्रिमीत परिणाम, गडद, झळाळत्या रंगसंगतीतली डिझाइन्स.. ही विणलेली पेंटींग्ज आहेत हे आधी माहित नसतं तर विश्वासही बसला नसता इतक्या सूक्ष्म, एकमेकांमधे मिसळून गेलेल्या रंगछटा.. कधी काळ्यावर किंवा गडद निळ्यावर डीप ऑरेंज, मॅजेन्टा, व्हर्मिलिऑन सारख्या सॉलिड, सॅच्युरेटेड उबदार रंगांचा खेळ, कधी म्यूटेड इंग्लिश पॅलट, ब्राऊन, ग्रे, करडा.. काही कॅनव्हास नजरेत मावणार नाहीत इतके भव्य.. काहीही लहानसे चौकोनी.. पण कशावरुनही नजर हटत नाही. त्रिमित परिणामाची मजा अशी की पेंटींगच्या एका फ़्रेममागे दुसरी फ़्रेम आहे असा भास होत रहातो बघताना. नजर त्यातल्या लेयर्सवरुन, मऊ पोतावरुन घसरत रहाते.. रंगांमधे अडकून रहाते.

ऑइल पेंटींगमधले ब्रशस्ट्रोक्स वाटावे इतकं सुंदर, तांत्रिक सफ़ाई असलेलं उच्च कलात्मक दर्जाचं हे काम आहे.
कमळे, सूर्य, पाण्यातली प्रतिबिंब.. अशा पारंपरिक, निसर्गातल्या मोटिफ़्स मधून विकसित होत ऎबस्ट्रॆक्शनकडे गेलेली डिझाईन्स.. अवकाश आणि काळाच्या सीमेपार पोचलेले त्यातले अर्थ. कुरेकरांमधल्या आर्टिस्टचा वैयक्तिक प्रवासही त्यात आपसुक दिसतो.

गालिचा विणकामाच्या पारंपरिक पद्धतीला कुरेकरांनी एका फ़ार सुरेख कटेम्पररी आर्ट फ़ॉर्ममधे विकसित केले आहे. त्यामागे त्यांची गेल्या तीसहून अधिक वर्षांची मेहेनत आहे. आपल्याला हवा तो परिणाम अचूक साधण्याकरता, आपण पेंट केलेल्या पेंटींगला, त्यातल्या रंगाच्या, रेषेच्या प्रत्येक छटेला टॅपेस्ट्री फ़ॉर्ममधे साकार करण्याच्या प्रोसेसमधली प्रत्येक स्टेप त्यांनी स्वत: विकसित केली. कार्पेट नॉटींग आणि टॅपेस्ट्री या दोन्ही पारंपरिक कलाप्रकारांचा मेळ घातला. विणकामातल्या उभ्या धाग्यांची एक विशिष्ट गाठ त्यांनी शोधून काढली आहे. खास जातीच्या लोकरीचे धागे मागवून त्यांचे रंग आपल्याला हव्या त्या छटेमधे ते बनवून घेतात. एकेक टॅपेस्ट्री पेंटींग विणायला सहज चार ते पाच महिने लागतात. त्यानंतरही ते कायम टिकावे, धूळ किंवा वातावरणातल्या इतर घटकांचा त्यावर परिणाम होऊ नये म्हणून त्यावरची प्रक्रिया.. कला आणि कारागिरी यांचा आकर्षक मेळ आपल्याला दिसतो तेव्हा त्यामागची मेहेनत आणि कौशल्यही जाणवते. 



















दिनेश कुरेकर मुळातले जे जे स्कूल ऑफ़ आर्टचे फ़ाईन आर्टचे विद्यार्थी. विव्हिंग आणि डिझाइनमधला त्यांचा अनुभव, औरंगाबादसारख्या वस्त्रकलेचा वारसा असलेल्या शहरातले वास्तव्य, प्रयोगशील वृत्ती हे सगळंच या वोव्हनस्केप्समधे प्रतिबिंबित होतं. टॅपेस्ट्री पेंटींग्जची त्यांची आजवर अनेक प्रदर्शने भरली आहेत, अनेक मान सन्मान, पुरस्कार त्यांना मिळाले आहेत. अशा मास्टर विव्हर आर्टिस्टचे काम पहायला मिळणं ही खरंच अनमोल संधी आहे.  

पारंपरिक कला टिकवायच्या असतील तर त्यांना अशा त-हेने आजच्या युगाला साजेशा कलात्मक पद्धतीनेच कलावंतांनी साकार करायला हवे. कुरेकरांचे काम त्या दृष्टीनेही महत्वाचे आहे.
गालिचा विणकामातल्या पारंपरिक, नजाकत आणि सौंदर्याला आधुनिक तंत्रद्न्यान आणि समकालिन कलादृष्टीची जोड मिळाली की काय होते ते पहायला तरी जहांगिरमधे जायलाच हवे.  





No comments:

Post a Comment