Sunday, October 2, 2016

“द थिएटर ऑफ़ इब्राहिम अल्काझी”


तीन महिन्यांच्या गॅपनंतर टाऊनमधे चक्कर झाली.
अर्थातच मुंबईतल्या कला-क्षेत्रात काय चालू आहे, काय बघायचं मिस केलं हे जाणून घ्यायची उत्सुकता होती.
आणि अशावेळी एनजिएमए मधे भरलेल्या द थिएटर ऑफ़ इब्राहिम अल्काझीया प्रदर्शनाद्वारे एक दुर्मिळ रत्नभांडार नजरेसमोर खुले झाले.
थिएटर, चित्रकला, सिनेमा, समाज, राजकारण, प्रवास, संगीत, नृत्य.. कोणाही व्हिज्युअल-फ़ाईन आर्टप्रेमीचे मन समाधानाने ओसंडून वाहू लागेल असे हे मल्टीमिडिया प्रदर्शन.



थिएटर लिजन्ड अल्काझी- हा माणूस शब्दश: एक संस्था आहे.
भारतीय आधुनिक कलायुगाचा उदय आणि अल्काझींची गोष्ट एकत्रच सुरु होते. अल्काझींचा सगळा इतिहास, विशेषत: ४०-५० च्या दशकात त्यांनी थिएटरच्या क्षेत्रात केलेलं पायाभूत काम, १९६२ मधे स्थापन केलेली राष्ट्रीय नाट्य प्रशिक्षण संस्था.. थिएटर बद्दलच्या त्यांच्या क्रांतिकारी कल्पना, विचार, त्यांची अत्याधुनिक ट्रेनिंग मेथॉडॉलॉजी, दिग्दर्शन, अभिनय, सेट डिझाईन, लायटिंग या प्रत्येक गोष्टीत त्यांनी घातलेला आंतरराष्ट्रीय संकल्पना आणि भारतातील लोककला परंपरा यांचा क्रांतिकारी मेळ.. याची कल्पना हे प्रदर्शन पहाताना येते.

थिएटर वर्कशॉप्सचे व्हिडिओज आणि शेकडो, हजारो कृष्णधवल, दुर्मिळ देखणी छायाचित्रे, वस्तु, कागदपत्र, स्टेज सेट्सची मॉडेल्स, कॉस्च्यूम्स... या सगळ्यातून अल्काझींच्या तालमीत तयार झालेले अनेक कलाकार दिसत रहातात. ओम शिवपुरी, मनोहर सिंग, सुरेखा सिक्री, उत्तरा बावडेकर, रोहिणी हत्तंगडी, नासिरुद्दीन शाह, ओम पुरी, अनुपम खेर, पंकज कपूर.. हिंदी सिनेमाचा पडदा उजळून टाकणारे हे कलाकार, बी.व्ही. कारंथ, नीलम मानसिंग, मोहन महारिषी, रंजित कपूर, रतन थिय्याम, अमल अल्लान, एम.के,रैनासारखे गुणी दिग्दर्शक.. या सर्वांचं उमेदवारीतलं काम, त्यांची त्या काळातली इन्टेन्सिटी जाणवत रहाते.
अनेक गमती जमतीही.. ओम शिवपुरी तरुणपणी ऎक्चुअली हॅन्डसम दिसायचा आणि सुधा शिवपुरी देखणी दिसायची. रोहिणी ओक (हत्तंगडी) तशीच दिसायची, नासिर, अमरिश पुरीला तरुण पाहिलेलं आठवत असल्याने ते काही फ़ार वेगळे नाही वाटले. खूप मजा येते जे पहाताना.

इंडियन कॉस्च्यूम्स वरची अल्काझींची पुस्तकंमराठी नाटकांचा इतिहास, भुलाभाई देसाई मेमोरियल संस्थेची इमारत जिचा स्वत:चा एक सांस्कृतिक इतिहास आहे त्यातील दुर्मिळ, महत्वाची छायाचित्रे, सुलतान अकबर यांची, अल्काझींची स्वत:ची अतिशय सुंदर, दुर्मिळ पेंटींग्ज.. ते इतके छान चित्रकार होते ही गोष्टच आजवर माहित नव्हती. अशा असंख्य गोष्टी आहेत प्रदर्शन पहाताना पहिल्यांदाच जाणवतात, कळतात.
अनमोल आर्काइव आणि डॉक्यूमेन्टेशन आहे हे प्रदर्शन.


अल्काझी टाइम्स हा तर अफ़लातून प्रकार. आर्ट आणि थिएटर टाईम्स हे एक काल्पनिक वर्तमानपत्र इथे डिझाईन केलं आहे. यातल्या पानांवर व्हिन्टेज आर्काइवचा मनोरम आविष्कार  या कोलाजमधे आहे. नाट्य, चित्रकला क्षेत्रापासून आर्किओलोजी, लॅन्डस्केप्स, मिलिटरी स्टडीज, भारतीत स्वातंत्र्याची चळवळ, त्याच काळात उदयास आलेली भारतीय आधुनिक कलेच्या चळवळीतले महत्वाचे टप्पे, अगदी चित्रकार धुरंधरांच्या निधनाची वर्तमानपत्रात आलेल्या बातमी पासून केनेडींची हत्या, गांधीजींची हत्या, त्यांची आधीची उपोषणे, सत्याग्रहाच्या बातम्या, पाकिस्तान, चीनचा हल्ला झाला.. अकबर पदमसींवरच्या केसचे तपशील, जहांगीरची स्थापना,.. अनेक बातम्या वाचायला मिळतात. ४० ते ५० च्या दशकापासूनचा भारतीय उपखंडाचा सामाजिक-राजकीय-सांस्कृतिक इतिहास नजरेसमोर जिवंत होतो.



अल्काझी हे व्हिन्टेज फोटोग्राफ़्सचे एक मोठे, खाजगी संग्राहकही होते. १९ आणि २० व्या शतकातल्या भारत आणि दक्षिण आशियातल्या दुर्मिळ कृष्ण-धवल छायाचित्रांचा सर्वात मोठा आणि महत्वाचा संग्रह त्यांनी केला. अल्काझी कलेक्शन ऑफ़ फ़ोटोग्राफ़ी सुप्रसिद्ध आहे. प्रदर्शनात ४० ते ५० च्या दशकातले आणि नंतरच्या काळातले भारतातील महत्वाचे फोटोग्राफ़र्स, स्टुडिओ फोटोग्राफ़ीतलं काम मांडले आहे.
फोटोग्राफ़िक आल्बम्स, सिंगल प्रिन्ट्स, पेपर निगेटीव्ज, ग्लास प्लेट निगेटीव्ज. पेन्टेड फोटोग्राफ़्स, इंडिया, बर्मा, सिलोन, नेपाळ, अफ़गाणीस्तानात, तिबेटमधून जमा केलेली पिक्चर पोस्टकार्ड्स.. अशा अनेक गोष्टींमधून त्यांचं फोटोग्राफ़ीवरचं प्रेम, सौंदर्यदृष्टी, व्हिज्युअल आर्टच्या संदर्भातला त्यांचा कल्चरल, मॉडर्निस्ट ऎटीट्यूड दिसतो.

एखाद्या माणसाच्या अंगातल्या कला कर्तुत्वाला किती मिती असाव्यात याची सगळी परिमाणं, सगळी गणितं अल्काझींच्या बाबतीत खोटी ठरावीत. त्यांच्या ५० हून अधिक वर्षांमधे केलेल्या अवाढव्य कामाचे रेट्रोस्पेक्ट्व करणे हे काम सोपे नाही. अमल अल्लाना यांनी क्यूरेट आणि निस्सार अल्लाना यांनी डीझाईन केलेल्या या प्रदर्शनातला अनेक व्हिडिओज, लाईट बॉक्सेस आहेत, प्रिन्ट्स, फोटोग्राफ़्स, पेंटींग्ज.. असा सगळा अल्काझींचा क्रिएटीव पसारा पहात असताना मनात येतं या मल्टीमिडियालाही अल्काझींची व्हिजन, त्यांची कल्पनाशक्ती कॅप्चर करता आली असेल का?



अल्काझींच्या थिएटर, आर्ट आणि फोटोग्राफ़ी क्षेत्रातल्या कामाचे दुर्मिळ रत्नमाणकांनी खचाखच भरलेलं अनमोल भांडार पहाण्याची महान आणि दुर्मिळ संधी एनजिएमएनी १८ ऑक्टोबर २०१६ पर्यंत दिलेली आहे.


No comments:

Post a Comment