माधव श्रीपाद सातवळेकर
(जन्म १२ ऑगस्ट १९९१५- मृत्यू १६ जानेवारी २००६)
चित्रकार माधवराव सातवळेकर समृद्ध व्यक्तिमत्वाचे सौंदर्यवादी कलादृष्टी असलेले चित्रकार. कलाशिक्षण क्षेत्रातली त्यांची कामगिरी आणि त्यांनी एक उत्तम प्रशासक म्हणून मिळवलेला नावलौकिक हे त्यांच्या समृद्ध व्यक्तिमत्वाचे दोन महत्वाचे पैलू.
माधवराव सातवळेकरांची चित्रं म्हणजे सौम्य, कमीतकमी रंगातली, निळ्या रेषांनी लपेटलेली, डौलदार, लयबद्ध सौंदर्याचा पदर जराही न ढळू दिलेली निसर्गचित्रे, रचनाचित्रे. काही चित्रांमधे रंगांची गडद उधळणही आहे परंतु त्यातही अभिजाततेचा तोल जराही विस्कळीत न झालेला. त्यांच्या पोर्ट्रेट्समधे, स्त्रियांच्या वैविध्यपूर्ण अभ्यासचित्रांमधेही खानदानी लोभस सौंदर्याचा आविष्कार प्रामुख्याने.
माधवराव सातवळेकरांच्या चित्रांची ही बलस्थानं निश्चितच होती आणि काही प्रमाणात त्या मर्यादाही होत्या. त्यांच्या चित्रांचे वैशिष्ट्य असलेली निळी रेषा जी त्यांच्या चित्रांना गूढ, अद्वितीय देखणेपणा बहाल करुन गेली त्या निळ्या रेषेच्या पलिकडे त्यांची चित्र फ़ार क्वचित पोचली. हा एकंदरीतच विरोधाभास होता.
समाजिक-सांस्कृतिक पर्यावरणाचा कलावंताच्या व्यक्तिमत्वावर, त्याच्या अभिव्यक्तीवर निश्चितपणे होत असतो. चित्रकार ख-या अर्थाने घडतो तो अशा कलासंस्काराच्या मुशीतूनच.
माधव सातवळेकरांच्या बाबतीत हे विधान थेट लागू होतं. त्यांच्याकडे कलेचा वारसा आला त्यांच्या वडिलांकडून आणि आजोबांकडून. माधव सातवळेकरांचे वडिल पं. श्रीपाद दामोदर सातवळेकर वेदवांग्मयाचे गाढे अभ्यासक. ते स्वत:ही चित्रकार. पं. सातवळेकरांनी भारतीय चित्रकलेवर बरंच लिखाण केलं होतं. ’स्पिरिच्युअल पर्स्पेक्टिव्ह’ ही त्यांची संकल्पना आजही चित्रकलेत महत्वाची मानली जाते.
माधवरावांचा जन्म १३ ऑगस्ट १९१५ ला लाहोर येथे झाला. पं. सातवळेकरांचा लाहोरला स्टुडिओ होता.
१९१८च्या सुमारास म्हणजे माधवराव तीन-एक वर्षांचे झाल्यावर कुटुंब सातारा जिल्ह्यातील औंध संस्थानात रहायला आलं. त्यांचे शालेय शिक्षण तिथेच झाले.
सातवळेकरांची आयुष्याची पहिली साधारण दोन दशके औंधसारख्या कलासमृद्ध संस्थानात गेली. औंधचे वातावरण शांत, शहरी खळबळीपासून दूर. कलात्मक पण आधुनिकतेच्या वा-यांपासूनही दूर. औंधचे राजे भवानराव पंतप्रतिनिधी हे विद्या व कला यांचे जाणकार. ते स्वत: चित्रकार आणि चित्रसंग्राहक. औंधच्या चित्रसंग्रहातील देश-विदेशांतील दर्जेदार व वैविध्यपूर्ण कलाकृती बघतच माधव सातवळेकरांची कलादृष्टी विकसित झाली.
सातवळेकरांच्या चित्रांमधे पुढे सातत्याने खेडेगावातले विषय येत राहिले. तिथलं जीवन, स्थानिक लोकांची कारागिरी, भांडी तयार करणं, शेतावरची कामे करणं इत्यादी. सातवळेकरांना शहरी आधुनिक चित्रविषयांबद्दल दारसा आपलेपणा कधीच वाटला नाही. त्यांनी स्वत:ही ते कबूल केले आहे. या सगळ्याचं बीज औंध संस्थानातच रुजलं.
औंधच्या शाळेत ’कला’ हा एक सक्तीचा विषय होता. त्यात चित्रकला, संगीतकला, सुतारकाम, इतरही अनेक गोष्टी शिकवल्या जात. पूर्ण हिंदुस्थानात असा आगळा प्रयोग कलेच्या बाबतीत कुठेच नव्हता. अशा वातावरणाचे संस्कार घेऊन माधवराव घडत गेले. औंधला अनेक नामवंत चित्रकार यायचे. धुरंधर, बाबुराव पेंटर, मुल्लर अशा अनेकांचा सहवास त्या काळात आणि नंतरही माधवरावांना बरंच काही कळत नकळत देऊन गेला. चित्रकलेची आवड, उत्तेजना मिळणे हे नैसर्गिकच होते अशा वातावरणात. घरी वडिलही चित्रकलेचे धडे देत. जलरंग, पेस्टलमधे चित्रं कशी रंगवायची याचं मार्गदर्शन त्यांच्याकडूनच मिळालं. सातवळेकरांचा नंतरच्या काळात स्वत:चा छापखाना होता. स्वाध्याय मंडळाची चित्रं त्यात छापली जायची. छापखान्यात बसून तिथे येणा-या लोकांचे स्केचेस करणं हा त्यांचा छंद. ’ओल्ड मास्टर्स’चं टेक्निक समजावं म्हणून वडिलांनी मोठ्या, पश्चात्य चित्रकारांच्या, ज्यात रेम्ब्रां, फ़्रन्स हाल्स सारखे चित्रकार होते त्यांच्या चित्रांच्या चांगल्या प्रिन्ट्स मिळवून दिल्या होत्या. माधवरावांवर पाश्चात्य चित्रकलेचे संस्कार पुढील काळात इतके प्रभावी कसे, याचे उत्तर यामधून सहज मिळते. पुढे हळदणकरांकडेही काही काळ चित्रकलेचे शिक्षण झाले.
औंध संस्थानातील कलात्मक वातावरणासोबतच त्यांच्या आयुष्यावर वडिल श्रीपाद सातवळेकर यांचा मोठा प्रभाव होता.
लॅन्डस्केपचे पेंटींगचे प्राथमिक धडे वडिलांनी स्वत:च दिले. ते चांगले पोर्टेट पेंटरही होते.
लहानपणातल्या या वातावरणात सातवळेकरांवर फ़क्त चित्रकलेचेच संस्कार झाले नाहीत. सातत्याने, निष्ठापूर्वक काम करणे, व्यवहारातली, कामातली शिस्त जी पुढे त्यांना कायमच उपयोगी पडली ती त्यांच्यामधे भिनली याचं कारण वडिल आणि औंधच्या राजेसाहेबांची कामावरची निष्ठा अनुभवतच ते मोठे होत गेले. पुढील काळात या सर्वाला जोड मिळाली पाश्चात्य कलाजगतातील शिक्षणाची, परदेशातील अनुभवांची.
सातवळेकर १९३४ मधे जे. जे. स्कूल ऑफ़ आर्ट, मुंबईला कलेतील पुढील शिक्षण घ्यायला आले. त्यांची तिथे येईस्तोवरच चित्रकलेची इतकी तयारी झालेली होती की जे.जे. चे तेव्हाचे प्रिन्सिपल ग्लॅडस्टन सॉलोमन यांनी त्यांचे आरेखनावरील प्रभुत्व पाहून सेकंड टर्मला थेट चौथ्या वर्षात बसायची परवानगी सातवळेकरांना दिली. १९३५ मधे त्यांना जी.डी. आर्ट इन ड्रॉइंग ही पदविका मिळाली. या काळात ते ’मेयो’ पदकासह अनेक पारितोषिकांचे मानकरी ठरले. त्यांनी १९३७ ते १९४० या काळात युरोपातील इटली, लंडन, पॅरिस येथे कलेचे उच्चशिक्षण घेतले.
माधवराव सातवळेकर आर्ट स्कूलमधे शिकत होते तेव्हा भारतात यूरोपियन किंवा पाश्चात्य वळणाचं कलाशिक्षण जवळपास स्थिरावलं होतं. भारतीय चित्रकला जगात बंगालमधे भारतीय कलेच्या पुरुज्जीवनवादी शैलीचा प्रवाह स्रुरु झाला होता, तसेच पाश्चात्य वास्तववादी शैलीतही चित्रे काढली जात होती.
माधवराव सातवळेकरांचे समकालिन चित्रकार म्हणजे गोपाळ देऊसकर, ज.द.गोंधळेकर, एम.आर.आचरेकर, शावक्ष चावडा, के.के. हेब्बर, एस.एम.जोशी इत्यादी.
पुढे १९३७ साली माधवराव युरोपला चित्रकलेतलं पुढचं शिक्षण घ्यायला गेले. फ़्लोरेन्सला प्रो. बस्तियानींच्या स्टुडिओत राहून शिकण्याची दुर्मिळ संधी त्यांना मिळाली. बस्तियानी फ़्लोरेन्सच्या ’रॉयल ऎकेडेमी’ मधे शिकवत असत. बस्तियानींच्या स्टुडिओमधे सातवळेकर लॅन्डस्केप, ड्रॉइंग, पेंटींग ख-या अर्थाने शिकले. त्यांच्या पुढील कलाकारकिर्दीवर ठसा उमटला तो याच शिक्षणाचा. इटालित राहून शिकणं सोपं व्हावम म्हणून माधवराव इटालियन भाषा शिकूनच तिथे गेले होते. त्याचा खूप मोठा फ़ायदा त्यांना झाला. माधवरावांनी या काळातल्या त्यांच्या आठवणी प्रा. रमेशचंद्र पाटकरांनी घेतलेल्या दीर्घ मुलाखतीत फ़ार सविस्तररित्या सांगितल्या आहेत. ते सांगतात, “बस्तियानींची रंगाची पॅलट माझ्या वडिलांच्या पॅलटपेक्षा अगदी निराळी होती. ’अर्थ कलर्स’ कसे वापरावे, का वापरावे हे मी प्रो. बस्तियानींकडून शिकलो. तीन-चार रंगांमधे चित्र ’जिवंत’ करायचे ते. मानवी शरिराचा अभ्यास, एक्शन ड्रॉइंग, स्केचिंग या सगळ्याचं एक वेगळं नविन शिक्षण या काळात मिळालं. याचा मला फ़ायदा झाला. पोर्टेटचं तसंच संपूर्ण मनुष्याकृती कशी काढायची याचे खरे धडे मी त्यांच्याकडे घेतले. बस्तियानींची चित्रातील बाह्यरेषेवरची नजर विलक्षण होती. एकदा मी केलेली काही चारकोलची ड्रॉइंग्ज पाहून ते म्हणाले, ’तुम्ही जुन्या ग्रीक पुतळ्यांवरुन ड्रॉइंगचा अभ्यास केलेला दिसतो?’ माझ्या प्रत्येक ड्रॉइंगमधे मनुष्याकृतीचे अवयव आहेत त्यापेक्षा जास्त चांगले काढण्याचा मी प्रयत्न करत असे. बस्तियानींच्या मते हा ड्रॉइंगमधला एक महत्वाचा दोष होता. तो कसा घालवायचा हे त्यांनी योग्य प्रकारे शिकवलं.”
सातवळेकरांनी युरोपातून परतल्यावर जी चित्रं काढली त्या सर्वांवर त्यांच्या या शिक्षणाचा प्रभाव पडलेला स्पष्ट जाणवतो. तो प्रभावच त्यांच्या पुढील सर्व चित्रकारकिर्दीवर ठळकरित्या राहिला.
सातवळेकर त्यानंतर लंडनच्या प्रसिद्ध ’स्लेड’ स्कूलमधेही शिकले.
सातवळेकरांची युरोप वास्तवाची दैनंदिनी १९३८ च्या ’पुरुषार्थ’ मासिकातून क्रमश: प्रसिद्ध झाली. त्यात त्यांनी केलेले कलेवरचे भाष्य आहे. दैनंदिनीतून त्यांची संवेदनक्षमता, विश्लेषक वृत्ती व भोवतालच्या अर्थकारणाचे भान विशेषत्वाने जाणवते. युरोपात दुसरे महायुद्ध सुरु झाल्याने ते १९४० मधे भारतात परतले.
यूरोपात या सर्व काळात कलाविषयक नवविचारांचा प्रवाह जोमाने वहात होता. मात्र शिकण्याच्या कळात आणि नंतरही चित्रकलेच्या आधुनिक प्रवाहांशी ते जवळून परिचित होते परंतु नवचित्रकलेच्या प्रवाहापासून मात्र ते जाणीवपूर्वक दूरच राहिले. त्यांना ब्राक, मातिस, गोगॅंच्या चित्रशैलीने प्रभावित केले मात्र पिकासो त्यांना अजिबात आवडत नसे. सातवळेकरांच्या पुढील चित्रकलेची दिशा त्यांच्या या आवडीद्वारे स्पष्ट अधोरेखित होताना दिसते. यूरोपातून भारतात परतल्यावर त्यांनी जी निसर्गचित्रे केली त्यावर इम्प्रेशनिस्ट चित्रकारांचा मोठा प्रभाव पडलेला दिसतो मात्र इतर नवविचारांपासून ते बरेचसे अलिप्त राहिले.
सातवळेकरांचे वेगळेपण, वैशिष्ट्य नेमके काय याचा आढावा घेताना काही वैशिष्ट्ये ठळकपणे जाणवतात. ती म्हणजे- भारतीय ग्रामिण व लोकजीवन. महाराष्ट्र, सौराष्ट्र, काठेवाड, राजस्थानातील जनजीवनाचे चित्रण करणारी त्यांची वैशिष्ट्यपूर्ण रचनाचित्रे लोकप्रिय झाली.
उदा. पतंगवाला, कुंभार, पाणवठा, संत्र्याचा मळा, जुन्या वास्तू, गावातील एखाद्या गल्लीचे किंवा बाजाराचे दृश्य, विविध आविर्भावातील स्त्रियांची चित्रे इत्यादी. या सर्व चित्रांमधे छाया-प्रकाश आणि आकार-रंगछटांचा खेळ त्यातली उजळ, तेजस्वी रंगसंगती मोह घालणारी, लक्षवेधक.
एकंदरीत दृश्यात्मक सौंदर्य हा त्यांच्या चित्रकलेचा स्थायीभाव. रेखाचित्रणात अचूकता व लालित्य यांचा सुंदर मिलाफ़ होता.
आकार अधिक देखणे करणारी ’निळी रेषा’ ही माधवराव सातवळेकरांच्या चित्राची एक महत्वाची ओळख आणि वैशिष्ट्य. ही निळी रेषा त्यांच्या चित्रांमधे सातत्याने अनेक वर्षं दिसली. अनेक चित्रांमधे लोभस दिसणारी ही निळी रेषा काही वेळा एरवी मुक्त होऊ शकणा-या चित्रविषयाला बद्ध करते असं माझं वैयक्तिक मत.
सातवळेकरांच्या मानवी रचनाचित्रांवर गोगॅं व मातिसचा प्रभाव जाणवण्याइतपत राहिला. त्यांचे चित्रविषय भारतीय असले तरी शैली आधुनिक पाश्चात्यकलेशी साधर्म्य सांगणारी, त्यांच्या आधुनिक कला दृष्टीकोनाशी सुसंगत.
व्यावसायिक व्यक्तिचित्रणात सातवळेकरांचा नावलौकिक होताच. पोर्टेट करताना ते व्यक्तीच्या वापरातील वस्तू, वस्त्रे, फ़र्निचर, तसेच एकुनच व्यक्तिमत्वाचा वेध घेऊन व्यक्तिचित्रण करत.
म. गांधी (१९५०) नैरोबी, एच. एच. कबाका (१९५०) नैरोबी, राष्ट्रपती राजेन्द्रप्रसाद (१९५६) रष्ट्रपती भवन, सभापती प.ग.मावळणकर संसदेत, स्वामी विवेकानंद (१९५९) स्कूल ऑफ़ इकॉनॉमिक्स दिल्ली, शंवा.कि. (१९४१) लक्षमणराव किर्लोस्कर (१९६२) किर्लोस्करवाडी, मनोरमा साराभाई (१९७७) अहमदाबाद ही त्यांची काही गाजलेली व्यक्तिचित्रणे.
नंतरच्या काळात त्यांनी आपल्या चित्रांमधे केलेलं आकारांचं आणि रंगांचं सुलभीकरण ही त्यांच्या चित्रशैलीची अंतिम परिणती होती. त्यापुढे जाऊन चित्रविषयाचं विरुपीकरण त्यांनी कटाक्षाने टाळलं.
सातवळेकरांनी मराठी मासिकांच्या मुखपृष्ठासाठीही चित्र काढली. किर्लोस्कर मासिकाच्या मुखपृष्ठावरील त्यांच्या चित्रांनीच बहुधा महाराष्ट्रातील सामान्य रसिकांना या चित्रकाराची ओळख झाली.
व्यासायिक कामे व सर्जनशील चित्रनिर्मितीतला तोल त्यांनी उत्तम सांभाळला. मात्र अमूर्त चित्रणाकडे त्यांच्यातील प्रयोगशिलतेचा प्रवाह कधीच वळला नाही.
नवचित्रकलेपासून जाणीवपूर्वक दूर रहाण्यासंदर्भातली त्यांची भूमिका ठाम होती. ते म्हणतात- “आधुनिक युरोपियन चित्रकला विरुपीकरणाकडे- डिस्टॉर्शनकडे- वळली कारण तिथल्या दररोजच्या जीवनात झालेली क्रांती, युद्धांमुळे आमुलाग्र बदललेलं वातावरण. जागतिक युद्धातील संहारामुळे जगाबद्दलचा एक तिटकारा निर्माण झाला होता आणि तिथल्या लोकांच्या जीवनातून तो कुठंतरी व्यक्त होत होता. कला ’मॉडर्न’ होण्यामागे ते एक कारण होतं.”
कारण हे असलं तरी बदललेल्या चित्रकारितेचा प्रवाह जागतिक स्तरावर अनेक कलावंतांनी आपलासा केला कारण त्यांनाही आधुनिक जगातील बदललेल्या विचारांचे, संकल्पनांचे वारे कुठेतरी स्वत:च्या वैयक्तिक आयुष्याला स्पर्शणारे वाटत होते, मात्र सातवळेकरांना ते तसे वाटू शकले नाहीत ही त्यांची मर्यादा.
तशी ती त्यांच्या पिढीतल्या अनेक चित्रकारांची होती. नव्या पिढीतल्या चित्रकारांची नाळ त्यांच्या पासून ब-याचशा प्रमाणावर तुटली त्यामागे हे कारण महत्वाचे. सातवळेकरांना चित्रकलेतील नाविन्याविषयी अढी नव्हती परंतु त्यांनी त्याकडे फ़ारशा आपलेपणाने, सहानुभूतीने पाहिल्याचंही फ़ार दिसत नाही. नवीन भारतीय चित्रकार पुढे येण्याकरता काहीतरी नवीन करायचं म्हणून करतात आणि ते वरवरचं असतं, हे चित्रकार आपल्या कलेशी प्रामाणिक नाहीत असं सातवळेकरांचं मत यासंदर्भात बरंच काही व्यक्त करुन जातं.
’मला विकृत विषय आवडत नाहीत,” सातवळेकर रमेशचंद्र पाटकरांना दिलेल्या मुलाखतीत म्हणाले होते. चित्रविषय आनंददायीच असावेत या विचारांच्या चित्रकारांच्या पिढीचे प्रतिनिधित्व करणारे सातवळेकर. त्यांच्या मते जीवनात दु:खदायक गोष्टी अनेक असतात. चित्रांचा किंवा कोणत्याही कलेचा हेतू पाहणा-याला आनंद मिळावा हाच असायला हवा. साहजिकच त्यांचे चित्रविषय निसर्गचित्र, व्यक्तिचित्रण, रचनाचित्र इतकेच मर्यादित होऊ शकले.
सातवळेकरांनी समाजातील कटू वास्तवाचे, दारिद्र्याचे चित्रण करणारी चित्रे रंगवली नाहीत. त्यांच्या स्वभावधर्माशी, विचार प्रवृत्तींशी ते न जुळणारे होते. “मला ती दृष्टी नाही आणि त्यापासून आनंदही मिळत नाही. काही चित्रकारांना अशी चित्रे काढण्यात आनंद मिळतो, त्याकरता ते गरीब वस्तीतही जातात, त्यांचे आयुष्य रंगवतात.” सातवळेकर एकदा म्हणाले होते. अशा ’सौंदर्यवादी’ चित्रकारांच्या कलेमधे साहजिकच ज्या मर्यादा येतात त्या सातवळेकरांच्या चित्रकलेतही होत्याच. स्त्रीविषय, स्त्रीचे सौंदर्य, फ़ॉर्म सातत्याने कलेत डोकावतात याबद्दल त्यांच्यावर टीकाही झाली. त्यांना ते मान्य नव्हते. आपल्या चित्रात स्त्रीच्या फ़ॉर्मला महत्व असतं, तिच्या देहाला नाही असं त्यांचं मत होतं.
उत्कृष्ट कॉम्पोझिशन ही माधवराव सातवळेकरांच्या कलेतली स्ट्रेन्ग्थ होती. अहमदाबादला दिसलेलं पतंगांचं दुकान किंवा सौराष्ट्रामधलं कपड्यांचं दुकान यातला साधेपणा, रंगांची मनोहारी उधळण त्यांनी याच स्ट्रेन्ग्थचा वापर करुन आपल्या चित्रमालिकेतून अतिशय सुंदररित्या मांडली.
चित्रकाराच्या चित्राचं महत्व त्याने निवडलेल्या विषयावर किंवा शैलीवर नाही, तर त्याची अंतिम कलाकृती कशी झाली त्यावर आहे असं त्यांना वाटे.
मला सर्वात आवडतं जेरुसलेमच्या एका रस्त्याचे त्यांनी केलेले लॅन्डस्केप. फ़ार लोभसवाणे आणि वेगळे चित्र आहे हे. काही चित्रं पुन्हा पुन्हा बघाविशी वाटतात आणि प्रत्येक वेळी बघताना त्यात काही नवे सापडत जाते त्यापैकी एक. ऎकेडेमिक रिऎलिस्ट शैलीतल्या चित्रांमधे क्वचित येणारा हा अनुभव. या लॅन्डस्केपमधे रंगांची उधळण नाही किंवा शैलिदार फ़टकारे नाहीत. अगदी मोजक्या एक-दोन रंगात रंगवलेले हे लॅन्डस्केप त्यांच्या इतर राजस्थानी, सौराष्ट्री रंगिबेरंगी लॅन्डस्केप्सपेक्षा खूपच वेगळे. निळसर- राखाडी छटा संपूर्ण चित्रात आहे. जुनं जेरुसलेमचं एक विलक्षण सौंदर्य त्यात भरुन आहे. अरुंद रस्ते, पाय-या, कमानी असलेलं शहर. फ़ार काही आगळं निसर्गसौंदर्य, छाया प्रकाशांचा खेळ किंवा वस्तुरचनेच्या कसबी कलात्मक रचना यात नाही. पण या लॅन्डस्केपचा फ़ॉर्म मोहात पाडतो. संपूर्ण पेंटींगमधे एक गूढ वातावरण भरुन आहे.
अगदी सुरुवातीला, म्हणजे ५० च्या दशकात ’शाकुंतल’ आणि इतरही पौराणिक विषयांवर त्यांनी चित्र केली. पण त्यात ते रमले नाहीत. त्यांच्या वडिलांची इच्छा होती की मुलाने रामायण, महाभारतावर चित्रे काढावी. त्यांनी रामायणाचे काही भाग लिहिले होते. परंतु यूरोपमधून चित्रकला शिकून आल्यावर या विषयांमधे रमायची माधवरावांची अजिबात इच्छा नव्हती. ग्रामीण जीवनाचे मात्र त्यांना वाटणारे आकर्षण यूरोपातून आल्यावरही कायम होते. त्या प्रदेशातील विविध रंग, घर, वस्तूंमधला, एकंदरीतच रचनेतला साधेपणा, अकृत्रिमता याचा मोह त्यांना होता.
सुरुवातीच्या काळात सातवळेकरांनी ’किर्लोस्कर’ सारखी मासिके व पुस्तकांसाठी कथाचित्रे व मुखपृष्ठे केली. याशिवाय व्यक्तिचित्रांची व्यावसायिक कामे केली. त्यांची वैयक्तिक चित्रनिर्मितीही सुरु होती. हैद्राबादच्या कुसुम नाखरे यांच्यासोबत १९४३ मधे त्यांचा विवाह झाला.
माधवरावांनी त्यानंतरच्या काळात भरपूर प्रवास केला. गुजरात, राजस्थानात ते हिंडले. मांडवगडाच्या चित्रमालिकेची त्यांची प्रदर्शनं गाजली. अफ़्रिकन जनजीवनाची, तिथल्या निसर्गदृश्यांचीही त्यांनी भरपूर चित्र काढली. या सर्व चित्रांमधे टेक्स्चरचे फ़ार प्रयोग नसले तरी आकार, रचनांचे सुलभीकरण, रंगछटांचा कमीतकमी पण अतिशय परिणामकारक वापर सातवळेकरांनी प्रगल्भतेने करीत गेले.
पूर्ण वेळ व्यावसायिक चित्रकार म्हणून काम करण्याचा त्यांचा निर्णय नक्कीच धाडसाचा. जीवन जगण्यासाठीची धडपड पूर्ण वेळ चित्रकाराच्या नशिबी जास्त खडतर असते. अनेक तडजोडी, न पटणारी व्यावसायिक कामे करावी लागतात. मात्र सातवळेकरांनी अशा कामांमधेही आपली गुणवत्तापूर्ण छाप मागे सोडली. पोल्सन किंवा फ़िलिप्स कॉफ़ीकरता काढलेली चित्रे, कॅलटेक्ससाठी केलेली चार ऋतूंचं सौंदर्य दर्शवणारी कॅलेंडर्स त्याची साक्ष देतात.
युरोपातून प्रतल्यावर त्यांचे पहिले कला प्रदर्शन १९४५ मधे व दुसरे १९४७ मधे मुंबईला झाले. फ़क्त व्यक्तिचित्रांचे प्रदर्शन १९५६ मधे जहांगिर आर्ट गॅलरीत झाले. आयुष्यभरात त्यांची एकंदर साठ ते सत्तर चित्रप्रदर्शने झाली. वांद्रे येथील कलानगरात त्यांचे वास्तव्य व स्टुडिओही होता.
देश परदेशात भरपूर भ्रमंती केली आणि या भ्रमंतीदरम्यान ते प्रत्यक्ष जागेवर आवर्जून स्केचेस करत. हा सराव त्यांनी आयुष्यभर केला. व्यक्तिचित्रे, मानवी रचनाचित्रे, निसर्गचित्रे, युद्धचित्रे, न्यूड स्टडीज अशी वैविध्यपूर्ण चित्रकला अभ्यास आणि परिपूर्णतेचा ध्यास त्यांच्या स्वभावातच होता.
चित्रनिर्मिती त्यांनी प्रदीर्घ काळ शिस्तीने केली. चित्रांची प्रदर्शनंही सातत्याने भरवली. चित्रं काढण्यावाचून जणू त्यांना चैन पडत नसे. बालपणापासून वडिलांना आणि औंधच्या राजेसाहेबांना सतत काम करत असताना पाहिल्याचे हे संस्कार होते.
माधवराव स्पष्टवक्ते, शिस्तप्रिय, नीटनेटके, अत्यंत काटेकोर, पराकोटीचे वक्तशिर होते. वैयक्तिक जीवन व कला हे दोन अलग कप्पे ठेवणे त्यांनी याकरता महत्वाचे मानले.
प्रत्येकाच्या स्वभावानुसार त्याची कलानिर्मिती होते यावर त्यांचा दृढ विश्वास. जे काही व्यक्त करायचे ते आतून जाणवायला हवे. केवळ फ़ॅशन म्हणून एखादी शैली, इझम, तंत्राचा पाठपुरावा करता कामा नये. चित्राचे मूल्य त्यावर ठरत नाही असे ते मानत.
शालेय शिक्षणात गणित आणि विद्न्यान विषयाला दिल्या जणा-या अवास्तव महत्वामुळे मुलांचा एकांगी विकास होतो. कलेबाबत उदासिनता, अनभिद्न्यता निर्माण होते ही त्यांची मते ते स्पष्टपणे व्याखानांमधून मांडत.
माधवराव सातवळेकरांची अजून एक महत्वाची ओळख म्हणजे त्यांचे उत्तम प्रशासक असणे. युरोपातून परतल्यावर तेथील शिक्षणाचा उपयोग करण्याच्या हेतूतून १९५४ मधे ’इंडियन आर्ट इन्स्टीट्यूट’ या शैक्षणिक संस्थेची त्यांनी नव्याने उभारणी केली. ही संस्था चर्नीरोडला आजही आहे. ते स्वत: तिथे शिकवीत. महाराष्ट्रातील कलाशिक्षणविषयक प्रश्न सोडवण्याकरता प्रयत्न १९६० मधे स्थापन झालेल्या द फ़ेडरेशन ऑफ़ आर्ट इन्स्टीट्यूटचे ते सलग दहा वर्षे अध्यक्ष होते. १९६९ ते १९७५ या कालावधीत महाराष्ट्र राज्याचे कलासंचालक. त्यांच्या कारकिर्दीत जर्मनीतील बाउहाउस धर्तीवरील नवीन मूलभूत अभ्यासक्रमाची कार्यवाही करण्यात आली. राज्य कलाप्रदर्शनांमधे व्यक्तिचित्रे, निसर्गचित्रे अशा कलांना महत्व देऊन बक्षिसे देण्याची प्रथा पुन्हा रुढ केली.
वयाच्या ९१ व्या वर्षांपर्यंत माधवरावंनी सातत्याने चित्रनिर्मिती करत राहिले.
मुंबईत २६ जुलै २००५ साली जलप्रलय झाला. बांद्र्याला असणा-या त्यांच्या स्टुडिओत पाणी शिरले. त्यांच्या चित्रांचे, कॅनव्हासेसचे यात जबरदस्त नुकसान झाले. आयुष्यभराच्या निर्मितीची एका रात्रीत वाताहत झाली. उतारवयात हा धक्का त्यांना सहन झाला नाही.
जानेवारी २००६ मधे ते अहमदाबादला नॅशनल इन्स्टीट्यूट ऑफ़ डिझाईन येथे संचालकपदावर असलेल्या विकास सातवळेकर या आपल्या मुलाकडे राहण्यास गेले. खराब झालेल्या काही चित्रांच्या रिटचिंगचे काम सुरु केले होते. अल्प आजाराचे निमित्त होऊन तिथेच माधवराव सातवळेकरांचे निधन झाले.
लेखातील संदर्भांकरता आभार-
माधव सातवळेकर- मुलाखत रमेशचंद्र पाटकर (ज्योत्स्ना प्रकाशन)
चित्रकार-शिल्पकार चरित्रकोश, संपादक सुहास बहुळकर, दीपक घारे (हिंदुस्थान प्रकाशन संस्था)
No comments:
Post a Comment