Monday, March 21, 2016

देवदत्त पाडेकर आणि न्यूड स्टडी

रेन्वा --"मी नग्न देहाकडे पहातो, अनंत सूक्ष्म रंगच्छटा असतात त्यात. कोणत्या छटा माझ्या कॅनव्हासवरच्या पार्थिवात केवळ प्राण भरणार नाहीत तर त्याच्या अंगावर रोमांच फ़ुलवतील हे मला शोधता यायला हवे."





देवदत्त पाडेकरचं नाव आजच्या सर्वश्रेष्ठ, तरुण चित्रकारांमधे मानाने घेतलं जातं. देवदत्त नियमितपणे न्यूड पेंटिंग्ज करतो. अलिकडच्या काळात प्रत्यक्ष मॉडेलवरुन न्यूड करणारा हा आपल्याकडचा एकमेव चित्रकार. त्यासाठी दरवर्षी तो फ़्लॉरेन्स या युरोपमधल्या कलापंढरीची नियमित वारी करतो. तिथे स्टुडिओ बुक करतो. २००६ ते २०१० या काळात त्याने तिथे जाऊन जी चित्रमालीका केली ती ’चिन्ह’च्या आगामी ’नग्नता-चित्रातली, मनातली’ विशेषांकामधे आम्ही छापत आहोत. नुसती चित्रेच नव्हे तर त्यासोबत स्वत: देवदत्तने आपला परदेशात जाऊन न्यूड्स रंगवण्याचा अनुभव, नैसर्गिक नग्न त्वचेवर छायाप्रकाशाचे विभ्रम आणि त्यातून मिळणारा आकृतीबंध रंगवताना येणारा अनुभव फार उत्कटतेनं शब्दांमधे रंगवून मांडलेला आहे.

युरोपमधे देवदत्तच्या न्यूडस्टडीला एक वेगळं परिमाण मिळालं. तिथे न्यूड करताना उजळ त्वचेचं रंगलेपन करण्याचा एक वेगळा अनुभव त्याला मिळाला जो भारतात मिळणं अवघड होतं. गो-या त्वचारंगावर, लालसर केसांवर दिवसाच्या विविध प्रहरांमधे पडणारे प्रकाशाचे कवडसे रंगछटांचे जे मनोहारी खेळ मांडतात ते कुंचल्यात पकडून कॅनव्हासवर खुलवण्यात एक आगळं आव्हान आहे असं त्याला वाटतं.

फ़्लॉरेन्ससारख्या युरोपमधल्या चित्रपंढरीत जाऊन न्यूड रंगवण्याचा आपला अनुभव सांगण्याच्या निमित्ताने देवदत्त आपल्या आणि तिकडच्या एकंदरीतच चित्रसंस्कृतीमधला जो फ़रक अधोरेखीत करत जातो तोही खूप महत्वाचा. कला ही युरोपमधे नुसती परंपरा नाही तर संस्कृती आहे, तो तिथला उपजत स्वभाव आहे. न्यूड मॉडेल्सची व्यावसायिकता, शिस्त, त्यांच्याकडे बघण्याची तिथल्या कलाशाळेतल्या शिक्षक, विद्यार्थ्यांची किंवा चित्रकार, कलारसिकांची आदरमिश्रीत मोकळेपणाची दृष्टी आणि त्याबरोबरच एक अलिप्त व्यावहारिकता ही कलाविषयक जाणीवा प्रगल्भ असल्यानेच विकसित झालेली आहे असं देवदत्तला वाटतं.

’चिन्ह’च्या अंकात येणारा देवदत्त पाडेकरचा हा लेख वाचत असताना नव्या पिढीचा चित्रकार न्यूडकडे कसा बघतो, न्यूड पेंटिंग या संवेदनशील विषयाचा नुसत्या शरिराकृतीच्याच नाही तर रंगांच्या आणि पार्श्वभूमीच्या संदर्भातून किती तरलतेनं विचार करु शकतो हे जाणून घेणे कलारसिकांसाठी एक अत्यंत आगळा अनुभव ठरु शकतो.

’चिन्ह’चा ’नग्नता-चित्रातली, मनातली’ हा विशेषांक फ़क्त ज्यांनी आगावू प्रतनोंदणी केलेली आहे त्यांच्यासाठीच सवलतीच्या किंमतीत उपलब्ध आहे. अंकामधे या विशेषांकाच्या निमित्ताने अजूनही जे विषय आम्ही मांडलेले आहेत त्यांच्याबद्दलची माहिती इथे पुन्हा लवकरच वाचायला मिळेल. त्या आधी तुम्ही जर अजूनही आपली प्रत नोंदवली नसेल तर लगेच या ठिकाणी नोंदवा- ’चिन्ह’

-शर्मिला फडके

No comments:

Post a Comment