आबालाल रेहमान (१८५६/६० ते १९३१)
आधुनिक भारतीय चित्रकलेच्या इतिहासात नॅचरिलिस्टीक किंवा निसर्गानुसारी काम करणा-या चित्रकारांची कमी कधीच नव्हती. नॅचरलिझमची एक मोठी परंपराच भारताच्या सर्व भागांमधे कदाचित रविवर्माला लाभलेल्या लोकप्रियतेमुळे निर्माण होत गेली. नॅचरलिझमचं तंत्र आणि शैली या चित्रकारांनी आपलिशी केली खरी पण युरोपात ज्या पद्धतीने हे तंत्र विकसित होत गेलं, जे प्रयोग या चित्रशैलीत होत गेले तसे भारतात झाले नाहीत. नॅचरलिझमचा शब्दश: अर्थच तेव्हढा लक्षात घेऊन, निसर्गात समोर जे दिसतं आहे ते तसच्या तसं चितारण्यातच बहुतेक भारतीय चित्रकारांनी समाधान मानलं. याला सणसणीत अपवाद फ़क्त एकच. बुद्धीवादी पद्धतीने नॅचरलिझमचा वापर करणारे आबालाल रेहमान.
बाह्य निसर्गातली प्रत्येक वस्तू नैसर्गिक उजेडात कधी उजळून कधी मंदावून जात असते, प्रकाशाच्या तीव्र-मध्यमतेनुसार वस्तूंमधले रंग स्पंदन पावत असतात हे ओळखून मग त्यांची आपल्या मनात उमटलेली रुपं अभिव्यक्त करणारे आबालाल रेहमान.
काही वर्षांपूर्वी एका खाजगी चित्र-संग्राहकाकडे त्यांचं ’संध्यामठ’ पहायला मिळालं होतं. त्यानंतर मग त्यांची बरीचं चित्र कोल्हापूरला मुद्दाम जाऊन पाहिली. बॉम्बे स्कूलच्या ’प्रवाह’ कला-प्रदर्शनात ’रावणेश्वर’ पाहिलं.
या प्रत्येकवेळी त्यांच्या चित्रांमधल्या चैतन्यमय निसर्गाने, सदैव बदलत्या निसर्गातील एक विशिष्ट क्षण रंगांच्या माध्यमातून इतक्या अचूकतेनं कागदावर गोठवून ठेवण्याच्या कसबामुळे मन थरारुन गेलं. आबालाल रेहमान यांच्या चित्रकारकिर्दीचा काळ पहाता हे कसब नुसतं मोहवून टाकणारं नाही तर थक्क करुनही सोडणारं आहे हेही प्रकर्षाने जाणवलं.
रेहमानांचं ’संध्यामठ’ पहायच्या आधी ते कोल्हापूरचे ते आद्य चित्रकार, ’जे जे स्कूल ऑफ़ आर्ट’ मधे शिक्षण घेतलेले कोल्हापूरचे ते पहिले चित्रकार इतकीच मोजकी माहिती मला होती. पुस्तकांमधून पाहिली गेलेली त्यांची छापिल चित्रं अस्पष्ट, लहान आकारांतली त्यामुळे मनावर फ़ारसा ठसा उमटवू न शकलेली.
’संध्यामठ’ जेव्हा प्रत्यक्ष पाहिलं तेव्हा त्यातला पाण्यावरच्या मावळत्या सूर्यप्रकाशाचा तरल खेळ, वाहत्या वा-याचा आभास, रंगांचा तजेला, मन मोहून टाकणारं निर्दोष तंत्रकौशल्य.. पुन्हा पुन्हा पाहिल्यावर नव्याने दिसणारा निसर्गातल्या रंगांचा, प्रकाशाचा खेळ.. अगदी प्रत्यक्षात दिसतो तसाच; मन थक्क झालं.
टर्नर, मोने, माने इत्यादी इम्प्रेशनीस्ट मास्टर्सची पेंटींग्ज कित्येकदा पाहिली होती, मोनेच्या गिव्हर्नीच्या कमळांनी, सोनेरी सूर्यप्रकाशात झळाळून उठलेल्या मनो-यांनी, पुलांच्या कमानीखालील मोरपिशी सावलीत निरवतेनं विसावलेल्या तळ्याच्या पाण्यावर वा-याच्या लहरींनी उमटवलेला सूक्ष्म थरार पहाताना चित्र आणि निसर्गातल्या भास-आभासाची सीमारेषा पुसून टाकली होती.
आबालाल रेहमानांची चित्रे त्याच तोडीची आहेत, आणि ती त्याच काळात रंगवलेली आहेत.
जगाच्या दोन टोकांवर साधारण एकाच सुमारास एकच चित्रभाषा वापरली जावी हे खरंच थोर.
आबालाल रेहमानांची काही चित्रं कोल्हापूरला डॉ. काटेंच्या खाजगी संग्रहात, चंद्रकांत मांडरेंच्या संग्रहालयातही काही आहेत.
आकारानी अगदी लहान, शतकभरापूर्वीचं वय सांगणारी, फ़ारशी निगा न राखली गेलेली अशीच आहेत ही सारी चित्रं. पण रंगांमधे, शैलीमधे विलक्षण ताजेपणा मिरवणारी. जी काही मोजकी चित्र पाहिली त्यांचा ठसा मनावरुन पुसला जाणं अशक्य होतं.
आबालाल रेहमानांचं स्वत:चं कृश, दाढीदारी फ़किरसदृश चेह-याचं स्केच पाहिलं. त्यांच्यावर उपलब्ध असलेली माहिती कुतूहलाने वाचली, मोजकीच माहिती उपलब्ध होती; आणि जाणवलं की या सगळ्यात एक विलक्षण कहाणी दडलेली आहे.
आबालाल रेहमानांना अधिक जाणून घ्यायला हवं असं कितीही तीव्रतेनं वाटलं तरी त्यांच्याविषयी ऑथेन्टिक माहिती मिळवण, संकलित करणं खूप कठीण आहे याचा प्रत्यय येत गेला. काही तुरळक लेख उपलब्ध होते, उदा. कोल्हापूरच्या माधवराव बागलांचा ’कला आणि कलावंत’ मधील लेख, बाबुराव सडवेलकरांनी ’चित्रसूत्र’ मधे कोल्हापूरातील कलापरंपरा या विषयावर लिहिताना दिलेली माहिती किंवा शामकान्त जाधव यांच्या ’रंग चित्रकारांचे’ मधील एक लेख. त्यातून पदरात पडणारी माहिती त्रोटक होती, सगळ्या लेखांमधून एकच माहिती फ़िरवून दिली जात होती. नव्याने काही मिळत नव्हतं.
खरी माहिती दुर्मिळ असली की काल्पनिक कहाण्यांना पेव फ़ुटतं. रेहमानांच्या बाबतीत तसंच झालेलं होतं. जे वाचलं त्यातले किस्से कोणते आणि ख-या कहाण्या कोणत्या हे कळेनासं झालं. आबालाल हे निरिच्छ, पैशाची किंमत न करणारे, दारिद्र्यात सुख मानणारे, कलेसाठी जीवन वाहून घेतलेले नि:संग फ़किरी जीवन जगणारे होते, त्यांना अनेक व्यसनेही होती अशी एक प्रतिमा काही लेखांमधून समोर आली.
दारिद्र्याचे, फ़किरीचे उदात्तीकरण, रोमॅन्टीसिझम याचे आपल्याकडे नको इतके कौतुक असते. आबालाल खरंच असे होते का? की ही प्रतिमा त्यांच्यावर लादली गेली होती?
समाजाला चित्रकाराची, कलावंताची कदर कधीच नव्हती. आजही नाही, शंभर-सव्वाशे वर्षांपूर्वीच्या काळात तर चित्र अजूनच उदास होते. अशा वेळी आबालाल रेहमानांची केवळ कलेवर जगताना, तेही शहरी झगमगाटापासून दूर राहून.. काय परिस्थिती झाली असेल? त्यांच्यासारख्या कलावंताला योग्य आर्थिक सन्मानामधे जगता आलं नाही, आपण त्यांच्याकरता काही केलं नाही याची खंत त्यांच्या समकालिनांच्या मनात होती का? ती असेल तर त्यावर पांघरुण घालताना नंतरच्या काळातील, त्यांच्या ’शिष्य’ म्हणवल्या गेलेल्या चित्रकारांनी, त्यांच्याकडून ’फ़ुकट’ चित्र उचललेल्या कला-रसिकांनी आबालाल रेहमानांची नि:संग फ़किर ही प्रतिमा जाणून बुजून रंगवली असण्याची शक्यता जास्त आहे.
आबालाल रेहमानांनी कलासाधनेकरता पाच वर्षं कोल्हापूरजवळील कोटीतीर्थावर एकांतात वास्तव्य केले होते. कलेकरता निसर्गाची साधना करणे त्यांना आवश्यक वाटले. त्या वास्तव्यात त्यांनी एक डायरी लिहिली ती मराठीत होती. परंतु ती आता खाजगी संग्राहकाकडे असल्याने संदर्भाकरता उपलब्ध नव्हती. त्यातली काही पाने मात्र वाचायला मिळाली.
डायरीतल्या एका पानावर एक उदास उल्लेख आहे- "चित्रकला ही श्रीमंत कला आहे. मध्यम स्थितीतल्या माणसाचे ते काम नाही."
या एका वाक्यातून या चित्रकाराच्या मनातल्या कितीतरी खंती, किती तरी ओझी, तणाव समोर येतात, पैसे मिळवण्याकरता केलेल्या तडजोडी, खटपटी, उधारी.. अनेक ख-या कहाण्या ज्या त्यांच्या ’फ़किरी’ प्रतिमेमागे दडलेल्या आहेत त्या नजरेसमोर येतात.
बाबुराव सडवेलकरांनी त्यांच्या लेखामधे एका ठिकाणी लिहिले आहे- "आबालाल मास्तरांना त्यांच्या चित्रांचे पैसे कुणीच वेळेवर दिले नाहीत. त्यांना रंगसाहित्य विकत घेता येत नव्हते, त्यापायी आपल्याला चित्र रंगवता येत नाहीत ही खंत त्यांच्या मनात सदैव होती. मोठ्या आकाराची चित्रं त्यांना काढायला आवडले नसते असे नाही. पण हलाखीच्या आर्थिक परिस्थितीमुळे त्यांना ते परवडणारे नव्हते."
आबालाल रेहमानांची सगळी चित्रे इतक्या लहान आकारांची का आहेत, त्यांच्या चित्रविषयांमधे विस्तारित आशय असूनही त्यांनी इतक्या लहान अवकाशात तो का सिमीत केला याचे करुण रहस्य हे आहे.
आबालाल रेहमानांनी कोल्हापूर, कोटीतीर्थमधे वास्तव्याला असतानाच्या काळात त्यांनी हजारो चित्रे काढली. त्यांना शाहूमहाराजांचा राजाश्रय होता तरीही त्यांची आर्थिक परिस्थिती इतकी हलाखीची की त्यांना मोठ्या आकाराची चित्रे काढणेही परवडू नये? हे खरेच आश्चर्याचे आहे.
शाहूमहाराजांनी त्यांच्या पोटाचा प्रश्न सुटेल आणि ते एकाग्रतेनं फ़क्त कलासाधना सुरु ठेवू शकतील अशी तरतुद केली होती परंतु आबालाल तनखा घ्यायलाही राजवाड्यावर जात नसत असा उल्लेख एका ठिकाणी आढळतो. त्यांच्या चित्रांचे भरपूर कौतुक त्या काळात करवीरवासियांनी केले, त्यांच्याकडून असंख्य चित्र आपल्याकरता काढून घेतली मात्र त्याचे मोल पैशाच्या रुपात चुकते करण्याचे त्यांच्या मनातही आले नाही हा उल्लेख ’कला आणि कलावंत’ मधे स्पष्टपणे केला गेला आहे.
स्वत: रेहमान यांनी मात्र “आपल्या संकटकाळात आपले मित्र आपल्याला नेहमीच मदत करतात” असेच आपल्या डायरीच्या पानांवर नोंदवलेले आहे. डायरीतल्या नोंदींवरुन ते चांगले व्यवहारवादी होते हेही लक्षात येतं. बारीक सारीक जमाखर्चाचा त्यात उल्लेख आहे. चांगली वचनं लिहिलेली आहेत, अनेक भल्याबु-या माणसांचा अनुभव आहे.
बाबुराव सडवेलकर आपल्या लेखात लिहितात -" आमच्या पिढीला आबालाल मास्तरांच्या कलागुणांचा साक्षात्कार कुणीही घडवला नाही. त्यांच्याबद्दलच्या अद्भूतरम्य गोष्टी ऐकल्या पण ते चित्रकार म्हणून किती श्रेष्ठ, त्यांच्या चित्रात नेमके कोणते गुण, तंत्रदृष्ट्या त्यातून काय शिकण्यासारखं याचा कोणी विचारच केला नाही. आजही तो कुणी करत नाही. त्यांच्या चित्रांचा संग्रहही कुठे उपलब्ध नाही, त्यामुळे अभ्यासाची इच्छा असणा-यांनाही ती संधी मिळत नाही. आजच्या पिढीला मोने, मॅने, पिसारो माहीत असतात पण आबालाल नाहीत."
शाहू महाराजांच्या निधनानंतर त्यांनी दु:खाने आपली हजारो चित्रं पंचगंगेच्या पाण्यात बुडवली किंवा मृत्यूच्या आदल्या दिवशी त्यांनी स्वत:चं स्केच केलं आणि त्याखाली हे माझं शेवटचं चित्रं असं लिहून ठेवलं अशा कथा रेहमानांबद्दल सांगीतल्या जातात. यापैकी ख-या कोणत्या आणि दंतकहाण्या कोणत्या यावर कोणीच काही ठाम सांगू शकत नव्हतं. त्याचा माग काढणं आता कठीण नव्हे अशक्यच होतं.
खुद्द कोल्हापूरात गेल्यावरही लक्षात आलं की जी माहिती आधीच लिहिली गेली आहे त्यात काही भर पडण्याची शक्यता नव्हती. लेख लिहिणा-या सर्वांनीच तसा प्रयत्न केला होता. त्यातच मुळच्या कोल्हापूरच्याच असलेल्या चित्रकार सुखशील चव्हाणांनी एका भेटीत त्यांनी केलेले आबालाल रेहमान यांच्या माहिती संकलनाचे प्रयत्न सांगताना त्यांची कबरही आता उध्वस्त झाली आहे, त्याचे फोटोही घेता आले नाहीत असं सांगीतलं तेव्हा मनाला खरोखरच खिन्नता आली.
-----------
’कला आणि कलावंत’ मधील लेखात पंचगंगेच्या घाटावरच्या एका देवळात बसलेल्या आबालालांचा उल्लेख," वेष बावळट, कपडे फ़ाटकेतुटके, मळकट, दाढी वाढलेली आणि स्वारी कामात दंग, मागे पोरांचा, बघ्यांचा घोळका पण त्याचे त्यांना जराही भान नाही. डोळे उघडे, पण ध्यानस्थ, पाहण्यात व विचारांत गुंग, सृष्टीशी तादात्म्य पावलेले, समोरचा देखावा आणि हाताखालचा कागद एवढ्यातच त्यांची सृष्टी एकवटली होती. डोळे आणि हात एव्हढीच जणी त्यांचे जिवंत अवयव होते. समोरचे पहावे आणि खाली कागदावर उतरावे. कोण घाई! कोण जिवाची धडपड! आकाशात जरा बदल झाला की हातचे पारध सुटल्यासारखे वाटावे!" असा आहे.
-------
आबालाल रेहमान यांचा जन्म नक्की १८५६ ते १८६० च्या दरम्यान तो झाला असावा असे मानले जाते. त्यांचं मुळ नाव अब्दुल अजिज. आबालाल इंग्रजी सहावीपर्यंत शिकलेले, सुशिक्षित, संस्कारी पार्श्वभूमीतून आले होते. मराठी, संस्कृत, अरबी भाषेवर त्यांचे प्रभुत्व होते. वाचनाचा छंद होता. महाभारत, सप्तसिद्धीसारखे ग्रंथ त्यांनी अभ्यासले होते. वडील राजवाड्यावर खासगीत कारकून होते. त्यांचा फ़ारसी भाषेचा मोठा व्यासंग होता. कुराणाच्या हस्तलिखित प्रती ते तयार करीत. आबालालना कुराणाच्या पानांवरची महिरप चितारण्याची गोडी होती. त्यावरील कलाकुसर, नक्षीकाम, वेलबुट्ट्या रंगवताना त्यांना चित्रकलेची गोडी लागली.
कोल्हापूरातले पारसनीस नावाचे गृहस्थ पर्शियन भाषेचे अभ्यासक होते. आबालाल यांच्या वडिलांची इच्छा होती की त्यांच्याकडे जाऊन आबालालांनी पर्शियन भाषा आत्मसात करावी. पारसनीस कोल्हापूरातल्या ब्रिटिश रेसिडेन्ट अधिका-यांना पर्शियन भाषा शिकवायला त्यांच्या बंगल्यावर जात असत. येताजाताना बैलगाडीतून प्रवास करताना आबालालांनाही पर्शियन शिकवावे म्हणून ते त्यांना घेऊन बंगल्यावर जात. ब्रिटिश अधिका-यांची शिकवणी चालू असताना आबालाल बाजूला बसून चित्रं काढत. ब्रिटिश अधिका-यांची त्यांनी त्यावेळी काढलेली रेखाचित्रे त्या अधिका-याच्या पत्नीने पाहिली आणि तिने आपले पोर्ट्रेट त्यांना काढायला सांगीतले. आबालालांनी ते सहजतेने काढले. आबालाल यांचे लहान वय आणि तरीही हातातील इतके सुंदर कसब पाहून ती चकितच झाली. या मुलाला मुंबईला स्कूल ऑफ़ आर्टमधे शिकवायला पाठवण्याचा आग्रहच तिने धरला. तिच्या हट्टाखातर ब्रिटिश रेसिडेन्ट अधिका-याने शाहू महाराजांना विनंती केली की या मुलाच्या शिक्षणाच्या खर्चाकरता महाराजांनी स्टेट स्कॉलरशिप मंजूर करावी. आणि आबालाल रेहमान १८८० साली मुंबईला जे.जे. स्कूल ऑफ़ आर्टमधे दाखल झाले. त्या वातवरणात कलाभ्यास करताना रमले. मन लावून त्यांनी हा अभ्यासक्रम पूर्ण केला.
१८८० ते १८८८ या काळात आबालाल जे.जे. स्कूल ऑफ़ आर्ट मधे होते. या दरम्यान त्यांना अनेक बक्षिसे मिळाली. त्यांच्या कृष्ण-धवल चित्रांना गव्हर्मेन्टचे स्वर्णपदकही मिळाले. या चित्रांपैकी दोन चित्रे अजूनही जे.जे. स्कूल ऑफ़ आर्टच्या चित्रसंग्रहात आहेत. त्यातले त्यांचे सेन्सिटीव्ह लाईन वर्क, शेडींगमधले बारकावे बघणा-याला चकित करुन जातात. १८८८ मधे रेहमानांना व्हाइसरॉयचे सुवर्णपदक मिळाले.
चित्रकार धुरंधर हे आबालाल रेहमानांच्या पुढच्या पिढीतले चित्रकार. तेही मुळ कोल्हापूरचेच होते. धुरंधरांचे वडिल बंधू आबालाल रेहमानांचे स्नेही होते. त्या ओळखीतून त्यांनी आबालालांकडून अनेक वेळा चित्रकलेचे मार्गदर्शन घेतले. १८९० साली धुरंधरांनी जे.जे.मधे प्रवेश घेतला तेव्हा आबालाल तिथे नव्हते. परत कोल्हापूरला गेले होते. मात्र आपण कोल्हापूरचे आहोत हे कळल्यावर स्कूल ऑफ़ आर्टमधील शिक्षक " हे आबालालच्या गांवचे. आबालालची माहिती आहे का?" असे प्रश्न सारखेच विचारीत रहात असे धुरंधर ’कलामंदिरातील एकेचाळीस वर्षे’ या पुस्तकात लिहितात.
आबालाल कोण याविषयी वाचकांना माहिती व्हावी म्हणून धुरंधर लिहितात- "आबालाल रहिमान म्हणून एक विद्यार्थी कोल्हापूर दरबारची शिष्यवृत्ती घेऊन आर्ट स्कूलमधे शिकत होते. थर्ड ग्रेड होताच ते परत कोल्हापूरला गेले. अत्यंत हुशार विद्यार्थी या दृष्टीने स्कूल ऑफ़ आर्टमधे ते चांगलेच चमकले. लाईन ड्रॉइंगमधे, आउटलाइनमधे त्यांचा हात धरणारा दुसरा कोणी नव्हता असे गौरवोद्गार ऐकू येत असत. परंतु परत कोल्हापूरला जाताच प्राप्त झालेल्या प्रतिकुल परिस्थितीमुळे त्यांचे नाव कायमचे झाकले गेले. नाहीतर ते एक अग्रगण्य चित्रकार म्हणून गणले गेले असते."
रेहमानांना पुण्याच्या इंडस्ट्रीयल एक्झिबिशनमधे सुवर्णपदक मिळाले होते आणि तसे तू मिळवून दाखव असे धुरंधरांच्या वडिलांनी त्यांना प्रोत्साहन दिले असल्याचा उल्लेखही या पुस्तकात आहे.
स्कूल ऑफ़ आर्टच्या अभ्यासक्रमात ड्रॉइंगला सर्वात जास्त महत्व होते. साहजिकच आबालाल तिथे शिकत असताना पेन्सिल्स, क्रेयॉन्स तसेच चारकोलच्या वापरात प्रविण झाले. त्यांनी पुढील काळात चित्र काढताना अनेक माध्यमांमधे प्रयोग केले. प्रयोगशिलता त्यांच्या रक्तातच होती. मात्र त्यांचे सर्वात आवडते माध्यम जलरंग होते. सूर्यप्रकाशाचा परिणाम, त्याचे तीव्रतेनुसार, दिवसाच्या वेगवेगळ्या प्रहरी बदलणारे सौंदर्य तत्क्षणी चितारायला त्यांना जलरंगाचे माध्यमच योग्य वाटले.
शिक्षण पूर्ण झाल्यावर आबालाल रेहमान मुंबईला राहीले नाहीत. कोल्हापूरला परत गेले. त्यांचा स्वभाव एकांतप्रिय होता. चित्रकलेची साधना करण्याकरता ते कोटीतीर्थ या निसर्गरम्य, एकांत स्थानी रहायला गेले. तिथे रमणीय, शांत तलाव होता, जंगल होतं, झाडे, पक्षी होते. रेहमानांनी निसर्गाचे बदलते रुप, ऋतू न्याहाळले आणि शांतपणे कागदावर उतरवले. त्यांना ती चित्रं कोणत्या स्पर्धेत पाठवण्याचा, चारचौघात मिरवण्याचा, प्रदर्शने भरवण्याचा ध्यास नव्हता. मनाजोगी चित्रं काढणे हा एकच विचार मनात ठेवून काढलेली ही सर्व चित्र. चारकोल, रंगीत खडू, जलरंग आणि कागद आणि समोरचा निसर्ग एव्हढीच त्यांची सामग्री. प्रसिद्धीपासून दूर रहाणं त्यांनी स्वीकारलं तरी त्यांच्या हातचे कलाकौशल्य लोकांपर्यंत झपाट्याने पोचत होते. कोल्हापूरच्या गुणग्राही राजाने, छत्रपती शाहू महाराजांनी त्यांना दरबारी चित्रकाराची नोकरी देऊ केली. पोटाचा प्रश्न सुटेल म्हणून आबालालंनी ती स्वीकारलीही. दरबारी चित्रकाराच्या या नोकरीचा एक भाग म्हणून त्यांनी शिकारीची, प्राण्यांची अनेक चित्रे काढली, राजराण्यातील व्यक्तींची पोर्टेट्स चितारली मात्र त्यांचा खरा जीव रमला निसर्गाचे विभ्रम टिपण्यात आणि ते आपल्या हातातल्या कागदावर उतरवण्यातच.
रेहमानांची निसर्गचित्रे लहान आकारातली, इंपिरियल साइझ कागदाच्या एक अष्टमांश इतक्याच आकारात बसवलेली आणि तरीही त्यांना हवा तो इफ़ेक्ट ते त्यातून अचूक पोचवतात. त्यांनी काढलेली व्यक्तिचित्रं, चेहरेही वैशिष्ट्यपूर्ण, सुंदर आहेत. चोळी शिवणा-या स्त्रीचे त्यांनी काढलेले चित्र तर सुप्रसिद्धच आहे. शामकांत जाधवांच्या ’रंग चित्रकारांचे’ या कोल्हापूरच्या चित्रकारांची सुंदर व्यक्तिचित्रे शब्दबद्ध केलेल्या पुस्तकाच्या मुखपृष्ठावर ते पहायला मिळेल. नऊवारी साडीचे सारे सौंदर्य या चित्रात इतक्या बारकाईने आणि अगदी कमी रेषांमधे रेखाटलेले आहे.
रेहमानांच्या चित्रांचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे त्यांनी त्याकाळात प्रचलीत असलेली, निसर्गचित्रांमधे बारकाईने तपशील भरण्याची पद्धत टाळली. त्यांच्या चित्रांमधे कधीही त्यामुळेच क्लटर दिसत नाही. निसर्गातला साधेपणा, साधेपणातले निखळ सौंदर्य त्यामुळेच फ़ार प्रभावीपणे त्यांच्या चित्रांमधून आपल्यापर्यंत पोचते. ब्रिटिश चित्रकार कॉस्टेबलच्या रोमॅन्टिसिझमशी त्यांची नाळ याबाबतीत जुळलेली होती.
त्यांची चित्रे एकसाची वाटत नाहीत यामागचे कारण त्यांची प्रयोगशीलता आणि तंत्रप्रविणता होते. इतर कोणा चित्रकारासोबत संवाद नसतानाही त्यांनी आपल्या चित्रांमधे सातत्याने केलेले पॉइंटीलिझम, रंगविभाजनाचे, टेक्सचर्सचे प्रयोग अचंबित करुन टाकणारे आहेत.
कोल्हापूरसारख्या ठिकाणी एकांत स्थळी रहाणा-या आबालालना १९२०-२१ च्या सुमारास ज्या कलामूल्यांचा शोध लागला होता, तो मुंबईतल्या कलाकारांत पूर्णपणे रुजायला १९३५ साल उजाडावे लागले होते. प्रतिभेची केवढीतरी उत्तुंग झेप होती ही.
त्याकाळात कलकत्त्याच्या शांतीनिकेतनमधल्या निसर्गचित्रांचाही बोलबाला भारतात खूप होता. मात्र बंगाल स्कूलच्या तुलनेत आबालाल यांची निसर्गचित्रे अधिक सहज, जास्त नैसर्गिक आहेत असे मत कला-अभ्यासकांनी नोंदवलेले आढळते. दुर्दैवाची गोष्ट अशी की बॉम्बे आर्ट सोसायटीच्या प्रदर्शनांमधे इतरांची चित्रे कायम प्रदर्शित होत राहिली, त्यांना बक्षिसे मिळत गेली आणि आबालाल रेहमान मात्र कधीच त्यात सहभागी न झाल्याने त्यांची चित्रे त्याकाळात आणि नंतरही भारतभर कधीच फ़ारशी प्रसिद्धीप्रकाशात आली नाहीत.
आबालाल रेहमानांची नंतरच्या काळात प्रसिद्धीला आलेली, नावाजली गेलेली चित्रे ही ते कोल्हापूरला परत गेल्यानंतरच्या काळात काढलेली आहेत, त्याची माहिती त्या काळातल्या मुंबईच्या कलाजगताला नव्हती. रेहमानांचे समकालिन असलेले पेस्तनजी बोमनजी, पिठावाला हे चित्रकार मुंबईत त्यावेळी भरपूर नावलौकिक कमावत होते. पोर्ट्रेट पेंटींगमधे त्यांचा जम व्यावसायिकरित्या उत्तम बसलेला होता.
बॉम्बे आर्ट सोसायटीच्या वार्षिक कलाप्रदर्शनांमधे आबालालांची कोणतीच चित्रे याकाळात आली नाहीत. त्यांनी ती पाठवली असती तर सुवर्णपदके निश्चित मिळाली असती.
आबालाल रेहमानांनी चित्रकलेकडे पोट भरण्याचे साधन किंवा व्यवसाय म्हणून बघितले नाही असा उल्लेख त्यांच्यावर लिहिल्या गेलेल्या काही लेखांमधून झाला आहे, पूर्णवेळ चित्र काढत असणारे आबालाल ती केवळ छंद म्हणून निश्चित काढत नसणार, मात्र चित्रे काढण्यामागची त्यांची मुख्य प्रेरणा व्यवसाय ही नक्कीच नव्हती. पंधरा ते वीस हजार चित्रनिर्मिती त्यांच्या हातून झाली त्यावरुन ही प्रेरणाशक्ती खोल आंतरिक स्तरावर जन्मणारी होती हे निश्चित.
रेहमान हे चार भिंतीच्या आत बसून आपली चित्रे रंगवणा-यांपैकी नव्हते. निसर्गाच्या सहवासात, निसर्गाचे तासनतास चितंतन करुन, त्याचे विभ्रम मनात साठवून मग ते कागदावर चितारणारे ते इम्प्रेशनिझमचे सच्चे पुरस्कर्ते होते. आबालाल मास्तरांना शोधायचे तर कुठल्या तरी शेतवाडीत, गाईम्हशींच्या खिल्लारांत. देवालयाच्या समोरच्या पारावर किंवा दगडाच्या ढ्गा-यावर किंवा तळ्याजवळच्या दलदलीत जावे लागते असे त्यांच्या एका चित्रकार शिष्याने लिहिले आहे ते वाचताना निसर्गाच्या साधनेत मग्न असणारा साधू चित्रकार अशीच रेहमानांची प्रतिमा आपल्या नजरेसमोर साकारते आणि त्यातूनच त्यांच्या जिवंत, आगळ्या निसर्गचित्रांच्या प्रेरणास्त्रोतांचा शोध लागतो.
रेहमानांनी काढलेल्या ’रावणेश्वर’, ’संध्यामठ’ किंवा इतर निसर्गचित्रांमधे काहींना सिसले या चित्रकाराच्या रोमॅन्टीसिझमचा प्रत्यय येतो, काहींना टर्नरची अवकाशाची अनुभूती जाणवते. कधी एकाच चित्रात कोरेने चित्रित केलेल्या मंद वा-याच्या हालचालीचा अनुभव येतो, कधी कॉन्स्टेबलला साधलेल्या घनात्म ऐक्याची वेगळीच प्रचिती येते हे अद्भूत आहे असे जे काही तुरळक समीक्षकी उद्गार आबाला रेहमानांच्या चित्रकलेबद्दल काढले गेले आहेत ते खरोखरीच त्यांची तंत्रप्रवीणता आणि कलेची जाण किती पूर्णत्वाला गेली होती त्याचा सार्थ पुरावा आहेत.
------------
आबालाल रेहमानांना लोक आबालाल मास्तर म्हणूनच संबोधत असत. त्यांनाही तसा उल्लेख आवडे. ’ड्रॉइंग मास्तर, कोल्हापूर’ असा रबरी शिक्का त्यांनी बनवून घेतला होता. त्यांच्याकडे चित्रकला शिकायला लहान-मोठे अनेक विद्यार्थी येत. आबालाल मास्तरांकडे शिकलेल्या अनेक विद्यार्थ्यांनी नंतरच्या काळात मोठे नाव कमावले. रावबहादूर धुरंधर, सावर्डेकर, शिरोडकर, इनायतुल्ला, माधवराव बागल, एफ़.ए.शेख, श्री.ना. कुलकर्णी इत्यादी अनेकांनी आपल्याला चित्रकलेकडे वळण्यास आबालाल रेहमान स्फ़ुर्तीदायी ठरले असे कृतद्न्यतेने नमुद केले. धुरंधर, परांडेकर, बाबुराव पेंटर, बागल, दत्तोबा दळवी हे कोल्हापूरचे नावाजलेले चित्रकार आबाला रेहमानांच्या प्रत्यक्ष सहवासात राहून त्यांच्याकडे चित्रकला शिकले होते.
निसर्गवादी चित्रकलेच्या क्षेत्रात कोल्हापूरच्या चित्रकारांचे समृद्ध योगदान आहे. त्याचे बीज रुजवले आबालाल रेहमान यांनी. त्यांनी निसर्गाला आपल्यात रुजवलं, त्याच्या छटा, विभ्रम, प्रत्येक प्रहरातलं रुप त्यांच्या मनावर खोलवर उमटलं, त्यांनी निसर्गाच्या, निसर्गातल्या प्रत्येक गोष्टीला समजून घेतलं आणि मगच कागदावर उतरवलं.
आबालाल रेहमानांनीही मोनेच्या गिव्हर्नीच्या कमळांप्रमाणेच संध्यामठाची दिवसाच्या वेगवेगळ्या प्रहरांमधे, बदलत्या सूर्यप्रकाशात चित्रित केलेली सिरिज केली. इतकच नव्हे तर त्यांनी कोल्हापूर जवळच्या कोटीतीर्थ या ठिकाणी जाऊन तिथल्या निसर्गरम्य एकांतात तलावात पसरलेल्या कमलपुष्पांचा आणि पाण्याचा मनोहारी गालिचाही अशाच त-हेने दिवसाच्या वेगवेगळ्या प्रहरांमधे चित्रित केला. पण आज हे काहीच पहायला मिळत नाही. मोनेची वॉटरलिली सिरिज, किंवा इतर चित्रे जशी जतन करुन म्युझियम्समधे जपून ठेवली आहेत ते भाग्य आबालाल रेहमानांच्या या चित्रांच्या वाट्याला आलं नाही.
आबालाल रेहमानांनी एकुण सुमारे पंधरा ते वीस हजार चित्रे काढली होती. पण त्यांच्या चित्रांचा संग्रह कुठेही एकत्रितपणे नाही, देशाच्या कोणत्याही महत्वाच्या म्युझियममधे त्यांची चित्रं सामान्य लोकांना बघायला मिळत नाहीत. इतक्या प्रचंड संख्येने काढलेली त्यांची बरीचशी चित्रं काळाच्या ओघात नष्ट झाली, खराब झाली.
इंग्रजीमधून आधुनिक भारतीय चित्रकलेचा इतिहास लिहिणा-यांपैकी फ़क्त पार्थ मित्तर यांनी ’आर्ट अॅन्ड नॅशनलिझम’मधे रेहमानांच्या वैशिष्ट्यपूर्ण नॅचरलिस्ट शैलीची आवर्जून दखल घेतली. त्यांच्या समकालीन बंगाली, दक्षिण भारतीय, उत्तरप्रदेशीय चित्रकारांच्या तुलनेत आबालाल रेहमानांची चित्रशैली जास्त सहज आणि नैसर्गिक, बुद्धीवादी होती असा उल्लेख त्यांनी केला आहे.
मात्र इतरांनी -"आबालाल रेहमान हे कोल्हापूरचे आद्य कलावंत, मुंबईतील ’जे जे स्कूल ऑफ़ आर्ट’ मधे जाऊन चित्रकलेचे पद्धतशीर शिक्षण घेतलेले कोल्हापूरचे पहिले चित्रकार" अशा त्रोटक शब्दांमधे माहिती आटोपती घेतली आहे.
भारतीय चित्रकलेच्या इतिहासातला आबालाल रेहमानांचा उल्लेख या माहितीपुरतीच मर्यादित असावा हा त्यांच्यावर किती मोठा अन्याय आहे हे त्यांची चित्रं प्रत्यक्षात पाहिल्याशिवाय कळू शकणार नाही.
अर्थात १८५० नंतरचा आधुनिक भारतीय चित्रकलेचा इतिहास शब्दबद्ध करणा-या थोर कला-इतिहासकारांनी जिथे महाराष्ट्रातल्या समृद्ध कलापरंपरेचा आढावाही जेमतेम एका लहान प्रकरणातच आटोपलेला असतो तिथे कोल्हापूरच्या आद्य कलावंताला आणखी किती जागा दिली जाणार?
मात्र या उपेक्षेचा दोष आपल्याकडेच जातो. योग्य नोंदी, दस्ताऐवजीकरण करण्याची कधी काळजीच न घेतलेल्या, वास्तव घटनांचा मागोवा न घेता केवळ रंजक ऐकीव कहाण्यांवर विश्वास ठेवणा-या, त्यातच जास्त रस असणाते तथाकथीत कलारसिक आहोत आपण.
आद्य इम्प्रेशनिस्ट मोने त्याच्या चित्रांमधल्या जिवंत निसर्गाबद्दल बोलताना म्हणाला होता, " निसर्गाच्या नुसत्या सहवासात असणं पुरेसं नाही. निसर्गाचं प्रदीर्घ चिंतन आणि अवलोकन करावं लागतं. त्यातूनच मग त्याचं रुप साकार होऊ शकतं. समुद्राचं खरं सौंदर्य दाखवायचं तर त्याची प्रत्येक लाट रोज, प्रत्येक प्रहरात त्याच जागी जाऊन रंगवायला हवी, तास न तास निरखत रहायला हवी." मोनेच्या जगप्रसिद्ध झालेल्या चित्रांच्या शैलीचं मर्म, त्याचे परिश्रम यातून जगाला कळले. आबालाल रेहमानांनीही हे असेह प्रयोग त्याच काळात केले, असाच ध्यास घेऊन चित्र रंगवली. मोने गिव्हर्नीच्या त्याच्या घरात, एकांतात राहीला तसेच आबालालही कलासाधनेकरता कोटीतीर्थावर रहायला गेले होते. तिथल्या त्यांच्या वास्तव्यात निसर्गाच्या सहवासात चिंतन करत असताना त्यांनीही त्याच्या मनातले विचार डायरीमधे उतरवले. पण आपल्यापर्यंत ते पोचणार नाहीत, चित्रकलेचम मर्म जाणून घेऊ इच्छिणा-या कलेच्या कोणत्याच विद्यार्थ्यापर्यंत, रसिकापर्यंत ते पोचणार नाहीत. त्यांच्या शैलीचं मर्म, परिश्रम आपल्यापर्यंत पोचू शकणार नाहीत. आबालाल रेहमानांची काळाच्या पुढे असणारी ’चित्रभाषा’ अबोधच राहिलेली आहे.
शर्मिला फडके
No comments:
Post a Comment